Ganesh Chaturthi 2022: कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीकरांनी यंदाच्या गणेशोत्सवाचे निमित्त साधले आहे. बालाजी आंगन काॅम्पलेक्सच्या पुढाकाराने २०२२ च्या गणेशोत्सवात देखाव्यासाठी ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल’ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यंदा या गृहसंकुलाच्या गणेशोत्सवाचं सातवं वर्ष आहे. कॅन्सरविषयी जनजागृती आणि टाटा मेमोरीयल रुग्णालयाचा देखावा साकारण्यात तेजस सौंदणकर, दिव्यांश सिंघ, स्वप्नील घाडी, राहुल दळवी, मंगेश तेली यांच्यासह त्यांच्या टीममधील कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
बालाजी गृहसंकुलाच्या या अभिनव उपक्रमाविषयी माहिती देताना गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रवीण केळुस्कर सांगतात, “सालाबादप्रमाणे यंदा गणपतीच्या देखाव्यातून सामजिक संदेश देण्याचा मंडळाचा मानस होता. या वर्षी आम्ही कॅन्सर या आजारावर आरास उभी करून कॅन्सर बदल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असताना या आजारावरचे उपचार मर्यादित हॉस्पिटलमध्ये होतात. मुंबईतील टाटा हाॅस्पिटल मागील कित्येक वर्ष कॅन्सर रुग्णानं जीवनदान देण्याचे काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर सर जेआरडी टाटांच्या विचारांना मानवंदना म्हणून आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटल ची प्रतिकृती देखाव्यामध्ये केली आहे. हा देखावा उभा करण्याची संकल्पना ही रुपेश राऊत, अभिजित बिल्ले, सुशांत भोवड, ओमकार वायंगणकर यांची आहे.”
गणपतीच्या देखाव्यात अवतरले टाटा मेमोरियल हॉस्पिटल
१९४१ सली सुरू झालेल्या या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने लाखो कॅन्सर या आजाराने बाधीत रुग्णांना जीवनदान दिलं आहे. कॅन्सरचे उपचार समान्य माणसांना परवडतील असे हे एकमेव हॉस्पिटल अहे. कल्याण डोंबिवलीत अशा एका हॉस्पिटलची खरच खूप गरज आहे. जेणेकरून भविष्यात कसारा-कर्जत-नाशिकडून येणाऱ्या रुग्णांसाठीसाठी हे एक मध्य ठिकाण बनेल, अशी माहिती गणेशोत्सव समिती प्रमुख केळुस्कर यांनी दिली.