यश पचवू शकणारा माणूस काय वाट्टेल ते पचवू शकतो असं माझं मत आहे. आनंद पेलण्यापेक्षा दु:ख, निराशा, संकटांना झेलणं किंवा पेलणं त्यामानानं सोपं आहे असं म्हणावं लागेल. संकट किंवा दु:ख तुम्हाला प्रयत्न करून, अगदी कठोर परिश्रम करून दूर करता येणं शक्य आहे. बऱ्याचदा काळ तुम्हाला यात मदत करत असतो. परंतु यश वा आनंद यांतून सहीसलामत तरून जाणं सोपं नाही. कारण या गोष्टी येताना मोठी जबाबदारी म्हणून अपेक्षांचं ओझं तसेच अहंकारही घेऊन येतात. आणि हे आपल्याकडे आलंय, हे न समजण्याची बुद्धीसुद्धा घेऊन येतात. एकदा का त्या अहंकाराच्या जाळ्यात माणूस अडकला, की अवास्तव स्वप्नं पडायला लागतात. त्या यशाच्या मृगजळामागे माणूस धावायला लागतो आणि त्याचा शेवट परत दु:खातच होतो. तेव्हा सगळी धुंदी उतरते आणि जाग येते. परंतु तोवर बराच उशीर झालेला असतो, असाच इतिहास आहे. त्या तात्पुरत्या यशाचा अधाशासारखा उपभोग घेण्यातच माणूस गुंतून पडतो. परंतु या गोष्टींची वेळीच चाहूल ओळखून, जबाबदारी लक्षात घेऊन कुठल्याही अवास्तव गैरसमजात न राहता पुढल्या यशाचा मार्ग जो रचतो, तो मग ‘अमिताभ बच्चन’ या नावाचं एक पर्व घडवतो.
अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयाबद्दल सर्व जगाला ज्ञात आहेतच; पण त्यांचा आवाज, देहबोली, हृदयाचा ठाव घेणारी नजर या गोष्टी अभिनयाप्रमाणेच मुलाखत देतानासुद्धा किती खोल आणि योग्य परिणाम साधून जातात हे पहिल्यांदाच मला समजलं. अभिनय करत असताना ते एक भूमिका साकारत असतात. त्यासाठी लेखकांचे कधी परखड, तर कधी भावनाप्रधान संवाद, दिग्दर्शकाचं मार्गदर्शन, सहकलाकारांचं साहाय्य, कॅमेरामनची कुशलता- एकूणच सर्व टीमची साथ असते. अनेक गोष्टींचं साहाय्य मिळत असतं. पण मुलाखत देत असताना ते फक्त अमिताभ बच्चनच असतात. त्या परफॉर्मन्सचे लेखक, दिग्दर्शक, अॅक्टर ते स्वत:च असतात. त्यातही सुयोग्य परिणाम साधण्याचं त्यांचं ते कसब खरोखर वाखाणण्याजोगं आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या काही मुलाखतींचे व्हिडीयोज् माझ्या बघण्यात आले. पहिल्यांदा एक, मग अनेक. ते बघून मी चाट पडलो. त्या मुलाखतींचा नटांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम म्हणून समावेश व्हायला पाहिजे असं तत्काळ माझं मत झालं. या मुलाखती चित्रपटासारख्या रिलीज करून त्याचे मोठय़ा प्रमाणावर शोज् व्हायला हवेत असं मनापासून वाटायला लागलं. कमालीची सावधानता हा त्या मुलाखतीचा गाभा असतो. मुलाखत घेणारा कितीही तरबेज अथवा अनुभवी असो, या महानायकापुढे तो थोडय़ा काळात अगदी पाप्याचं पितर वाटायला लागतो. तर्कशुद्ध विचारांची साखळी एवढय़ा उत्स्फूर्तपणे मनात तयार होण्यासाठी काहीतरी वेगळी बुद्धिमत्ताच असायला हवी. ही मुलाखत असंख्य लोक बघणार असून ते विविध वयोगटातले असणार आहेत, त्यामुळे आपण केलेल्या महत्त्वाच्या किंवा बिनमहत्त्वाच्यासुद्धा विधानाच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे, ही जाणीव मुलाखत देताना क्षणोक्षणी मनात जिवंत ठेवणं, हे कुणा येऱ्यागबाळ्याचं काम नाही. भाषा इंग्रजी असो वा हिंदी- आपण उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचं भान असणं हे भल्याभल्यांना नतमस्तक व्हायला लावणारं कसब आहे. ‘चुकून बोलून गेलो असेन, मला आठवत नाही, बोललो असेन, मला खरं तर तसं म्हणायचं नव्हतं’ असल्या कुठल्याच पळवाटा नाहीत. पुढे जाऊन जर मुद्दा वादग्रस्त होणार असेल तर बरोबर योग्य वेळी त्याची चाहूल लागून त्याला शिताफीने बगल देणं आणि स्वत:चा मुद्दा समोरच्या माणसाच्या गळी उतरवणं- तेसुद्धा कुणालाही न दुखावता किंवा कुणाबद्दलही अर्वाच्य शब्द न वापरता- हे थोर मुत्सद्देगिरीचं लक्षण झालं.
आमच्यासारख्या सामान्य कुवतीच्या अभिनेत्यांबद्दल बोलायचं झालं तर मुलाखत देताना आपण दिसतोय कसे, आणि आपल्याला कुठले प्रश्न विचारले जाणार, याविषयी मनात दडपण असतं. आपलं उत्तर हे एकदम छान आणि मुद्देसूद असलं पाहिजे, कारण ही मुलाखत अनेकजण बघणार असल्याने काही चुकलं तर उगाच हसं व्हायला नको, याचं दुसरं दडपण असतं. आपल्या चेहऱ्यावर यातलं कुठलंही दडपण आलेलं दिसत तर नाहीये ना, याचं तिसरं दडपण असतं. बरं, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सहज सुचलं तर ठीक; नाहीतर ते सुचता सुचता मुद्दा कधी भरकटेल याचा नेम नाही. त्यातून काही प्रश्न असे असतात, की ज्यांची उत्तरं ब्रह्मदेवाला तरी ठाऊक असतील की नाही, कुणास ठाऊक. तुम्हाला ही कलाकृती का करावीशी वाटली? किंवा तुम्हाला अमुक एक गोष्ट कशी सुचली? किंवा- तुमच्या या कलाकृतीमध्ये तमुक एका व्यक्तीची छाप जाणवते? हे खरं तर विचारणाऱ्याचं मत आहे. याचं काय उत्तर असू शकतं? पण हे विधान बऱ्याचदा प्रश्न म्हणून विचारलं जातं. एकदा एका नटाला एका टीव्हीवर मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने काहीतरी थोडासा अभिनयाचा तुकडा सादर करण्यासाठी विनवले. ही गोष्ट खरं तर कुठल्याही नटासाठी बऱ्यापैकी ऑक्वर्ड परिस्थितीत टाकणारी आहे. त्यावेळी त्याने लगेच प्रसंगावधान साधून चतुरपणे ‘तुम्हाला जर कुठल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बातम्या वाचून दाखवा असं विनवलं तर तुम्ही काय कराल?’ असा प्रतिप्रश्न त्या पत्रकाराला विचारून त्याची बोलती बंद केली आणि त्या नटावरचा अवघड प्रसंग टळला. परंतु प्रत्येक वेळी असं चातुर्य आणणार कुठून? विशेषत: जर मुलाखत लाइव्ह असेल तर तो मुलाखतीचा कार्यक्रम नसून कबड्डी, नाहीतर खो-खोचा खेळ चालू असल्याचा अनुभव येतो.
परंतु अमिताभ मात्र कुठल्याच प्रश्नाने कचाटय़ात सापडल्याचे दिसत नाही. आपल्यालाच बघताना असं वाटतं, की आता काय उत्तर देणार या प्रश्नाचं, किंवा आता खरं म्हणजे सरळ अमिताभने दोन थोबाडीतच मारायला हव्यात या मुलाखत घेणाऱ्याच्या. पण खूप आधीच- म्हणजे अगदी बालपणीच त्यांनी सर्व मुद्दय़ांचा तर्कशुद्ध विचार केल्याचा साक्षात्कार होतो. उदाहरणार्थ, त्यांना एका अत्यंत आगाऊ मुलाखतकाराने विचारले की, सलमान खानने केलेल्या दुष्कृत्यावर तुम्ही काय भाष्य कराल? अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी त्याची बाजू घेतली आहे, त्यावर तुम्ही काय म्हणाल? हा खरं तर कात्रीत पकडणारा प्रश्न आहे. परंतु त्यांनी खूप छान उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘फिल्म इंडस्ट्री एका फॅमिलीसारखी आहे. तुमच्या घरातला माणूस कितीही चुकला तरी तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम वाटतंच, हे सत्य आपण मान्य करू या. पण त्याने केलेल्या गुन्ह्यबद्दल भारतीय कायदा जे काही म्हणत असेल त्याचा आदर केलाच पाहिजे. इतर कलाकारांचं म्हणाल तर जोपर्यंत कामाशी संबंध येतो तोपर्यंत सहकलाकार म्हणून ती व्यक्ती चांगली आहे असाच अनुभव सगळ्यांचा असतो. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक जीवनात तो जर चुकला असेल तर माझा अनुभव वाईटच आहे असं खोटंच मी कसं म्हणणार?’ यावर ‘तुम्ही याबाबतीत कुठलाच स्टॅन्ड का घेत नाही? तुम्ही आज अशा पोझिशनवर आहात की तुम्हाला कोणीही विरोध करू धजावणार नाही. पब्लिकचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला आहे..’असं विचारल्यावर ‘पब्लिक’ म्हणजे काय, हे त्यांनी बोफोर्सचं उदाहरण देऊन सांगितलं. ते म्हणाले, ‘ज्यावेळी मी शूटिंगच्या वेळी अपघात होऊन हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंज देत होतो, त्यावेळी संपूर्ण देशातील जनता माझ्या आयुष्याकरता प्रार्थना करत होती. कुठे कुठे तर लोकांनी यज्ञ केले. माझ्या नावाने पूजाअर्चा केल्या. माझ्यासाठी नवस बोलले गेले. पण जेव्हा बोफोर्स प्रकरण झालं तेव्हा खऱ्या-खोटय़ाची शहानिशा न करता माझ्यावर चिखलफेक करणारे, मला विनाकारण देशद्रोही ठरवणारेही हेच लोक होते. त्यामुळे माझ्यामागे या देशाची जनता ठामपणे उभी आहे, या गैरसमजात मी न राहता माझ्या बुद्धीला जे पटेल त्यावरच विश्वास ठेवणार. लंडनच्या कोर्टात मी बोफोर्ससंबंधी केस जिंकून आल्यानंतरही एका वर्तमानपत्रात माझ्याविषयी वाईटसाईट छापून आलं. त्यानंतर मी स्वत: त्या वर्तमानपत्राच्या संपादकांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. सर्व खुलासा केला. आणि त्याच वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी संपादकांचा माफीनामा छापून आला.’ एवढय़ा गंभीर मुद्दय़ाला कुठेही बावचळून न जाता ज्याप्रकारे त्यांनी सांभाळून घेतलं त्याला जवाब नव्हता. आई-बापाने मुलांसमोर, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर आणि आता अभिनेत्याने पब्लिकसमोर चुकायचं नसतं, हेच खरं. नवोदित कलाकारांबद्दलही त्यांना उत्सुकता आहे. त्यांच्या उत्तम कामाविषयी कौतुक आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांची खुल्या मनाने प्रशंसा करण्याचीही त्यांची तयारी आहे. ‘तनु वेड्स् मनू’ या चित्रपटात कंगना राणावतचा डबल रोल आहे. दोन्हीही भूमिका तिने एकदम अव्वल साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी कंगनाला दोन फुलांचे बुके पाठवले. ‘एक तुझ्यासाठी आणि दुसरा बुके दुसरा रोल करणाऱ्या नटीसाठी- जिचं नाव मला माहीत नाही..’अशी चिठ्ठीही बरोबर पाठवली. ही अशी निखळ आणि मनस्वी प्रशंसा ऐकून मलाच एकदम गहिवरून आल्यासारखं झालं; तिथे कंगना राणावतचं काय झालं असेल, विचार करा. फक्त तत्कालीन कलाकारांचंच नाही, तर सद्य:स्थितीतलं सामाजिक भानसुद्धा या महात्म्याला आहे. अनेक शेतकरी कुटुंबांच्या कर्जमुक्तीसाठी साहेबांनी सढळ हाताने मदत केली आहे; जेणेकरून त्या घरातल्या कर्त्यां व्यक्तीने आत्महत्या नको करायला. आणि तेही कुठे त्याविषयी चर्चा घडवून न आणता! पाय जमिनीवर, डोकं आकाशात आणि अवघा आसमंत व्यापून टाकणारं व्यक्तिमत्त्व अशी उंची गाठणारा असा उंच अभिनेता न होणे.
दुसऱ्या एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही जेव्हा उमेदवारी करत होता तेव्हा अनेक निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी तुमचे अपमान केले. चित्रपटातून काढून टाकण्याइतपत तुम्हाला अपमानित केलं गेलं, निराश केलं गेलं, तरीही तुम्ही त्याच दिग्दर्शक-निर्मात्यांबरोबर नंतरच्या काळात काम केलंत. यावर त्यांनी दिलेलं उत्तर हे प्रत्येक कलाकाराने हृदयावर कोरून घ्यावं असं आहे. ते म्हणाले, ‘मी जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा मी नवीन होतो. माझी वेळ, काळ, परिस्थिती तशीच होती, की माझा कुणीही अपमान करावा. त्यात त्या लोकांचा दोष नव्हता, तर माझ्या परिस्थितीचा दोष होता. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज कुणी असं करणार नाही.’
प्राप्त परिस्थितीत आपलं स्थान काय, याची समज कदाचित प्रत्येकालाच असते. परंतु आहे तशी क्लिष्ट परिस्थिती स्वीकारण्याचं धाडस किती जणांकडे असतं? या अशा नैराश्यात्मक वातावरणात ‘सुपरस्टार’ हे पद खेचून मिळवण्याची धडाडी कितीजण दाखवत असतील? त्यांच्या या सुपरस्टारपदाविषयीसुद्धा त्यांना प्रश्न विचारला गेला, की तुम्ही आधीच्या सुपरस्टारला डावलून हे मिळवलंत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावर ते म्हणाले, ‘सुपरस्टार एकच झाला, आणि शेवटपर्यंत एकच असेल- तो म्हणजे राजेश खन्ना. त्यांनी हे पद निर्माण केलं. ते शेवटपर्यंत त्यांच्याबरोबरच राहणार. मी एक सामान्य कलाकार आहे.’ आता जी गोष्ट सगळ्या जगाला ठाऊक आहे, ती त्यांना ठाऊक नसणार का? पण सर्वोच्च स्थानावर पोहोचून असं जाहीर विधान करायचं तर त्याला असामान्य विनम्रता आणि दूरदर्शीपणा पाहिजे. त्यांच्या या विधानामुळे पृथ्वीतलावरच्या कुणालाही त्यांच्याविषयी आदरच वाटणार. याउलट, राजेश खन्ना सुपरस्टार असताना ‘ऐसे कई सारे अमिताभ आये और चले गये. लेकिन मुझे कभी कोई छू भी नहीं सकता..’ असा त्यांचा अहंकार होता. हा अहंकारच त्यांना महागात पडला असं म्हणतात. आज सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाची पंच्याहत्तरी आली तरी चाहत्यांचा नट किंवा व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयीचा आदर सूतरामही कमी झालेला नाही. सर्वात बिझी अॅक्टर म्हणून आजही त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्यावर अनेक टीका झाल्या, अनेक ताशेरे ओढले गेले. बॅन्करप्ट व्हायची वेळ आली. परंतु त्यातून बाहेर पडून पुन्हा तेच अढळ स्थान प्राप्त करण्याची ताकद त्यांच्याकडे होती. ती ताकद म्हणजे त्यांच्या कामावर असलेला त्यांचा असामान्य फोकस. स्वत:च्या कामाविषयी एवढा आत्मविश्वास आणि उत्कट प्रेम असल्याशिवाय असं कुणी अशा झंझावातात टिकून राहूच शकत नाही, हेच खरं. त्यांच्या यशाचं श्रेयसुद्धा ते स्वत:कडे घेत नाहीत. त्याविषयी ते म्हणतात, ‘नव्याण्णव टक्के भाग्य आणि एक टक्का माझी मेहनत. माझ्यापेक्षा जास्त मेहनत तर स्टेशनवरचा हमाल करत असेल. पण त्याच्या नशिबी मला जे नट म्हणून मिळालं ते नाही. मला मेहनत करत राहिलं पाहिजे. बाकी माझा रस्ता माझं भाग्य ठरवेल.’ यश मिळेपर्यंत मेहनत सर्वजणच करतात, परंतु यश मिळाल्यानंतरही एवढी मेहनत आणि प्रयत्न करणारे अगदी मोजकेच असतील. त्यांच्या यशाचं आणखी एक रहस्य जे सर्वाना माहीत आहे, ते म्हणजे वेळ पाळणं. उमेदवारीच्या काळात वेळ पाळणं हे सर्वजणच करतात. असं पद आणि अशी परिस्थिती असतानाही वेळेच्या बाबतीत त्यांनी कधी हेळसांड केली नाही. अगदी नजीकच्या काळात त्यांच्याबरोबर शूटिंग करण्याचा प्रसंग आला. त्यांची गाडी स्टुडियोत येताना दिसली की इतर कुठेही खात्री न करताही आपल्या घडय़ाळात नऊ वाजल्याची वेळ सेट करून घेता येईल. आयुष्यभर त्यांनी वेळेला सांभाळलं म्हणून आजही त्यांना वेळ सांभाळत आहे. त्यांच्या चित्रपटातलीच त्यांची वाक्यं त्यांच्याबाबतीत किती खरी आणि अभिमानास्पद वाटतात. ‘हम जहां खडे होते है लाईन वहीं से शुरू होती है!’ हे वाक्य तंतोतंत कुणाला शोभून दिसत असेल तर ते नाव आहे-अमिताभ बच्चन. असंख्य नट तुमच्यामागे लाइन लावून उभे आहेत. परंतु येत्या हजार वर्षांत तुमच्यापर्यंत कुणी पोहोचू शकेल अशी शक्यताच नाही.
निखिल रत्नपारखी nratna1212@gmail.com
अमिताभ
अभिनेत्याने पब्लिकसमोर चुकायचं नसतं, हेच खरं. नवोदित कलाकारांबद्दलही त्यांना उत्सुकता आहे.
Written by निखिल रत्नपारखी
Updated:
आणखी वाचा
First published on: 12-06-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व गाजराची तुतारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh