‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून!’ असं म्हणतात ते अगदी तंतोतंत खरं आहे. या म्हणीतल्या दुसऱ्या भागाचा- म्हणजेच ‘घर पाहावे बांधून’ या प्रकाराचा नजीकच्या काळात मला एक भयावह अनुभव आला. हा अनुभव एवढा क्लेशकारक होता, की आम्हाला वाटलं- शत्रूवरसुद्धा अशी वेळ येऊ नये. आम्हाला भेटलेल्या माणसांनी देवानं दिलेली बुद्धी किती चुकीच्या पद्धतीनं वापरता येऊ शकते आणि त्यातून नसलेले प्रॉब्लेम क्रिएट करून विनाकारण किती नुकसान होऊ शकतं, याचं वेळोवेळी प्रात्यक्षिक करून दाखवलं. माझी खात्री आहे की, या मूर्खाना बुद्धी देऊन आपण खूप मोठी चूक केली याबद्दल विश्वाची निर्मिती करणाऱ्या परमेश्वरालाही पश्चात्ताप झाला असेल. आणि या बेअक्कल लोकांच्या नादी लागल्यामुळे आम्हालाही!
तर सुरुवात अशी झाली.. एक दिवस मी आणि बायको सकाळी कॉफी घेत असताना अचानक चर्चेच्या ओघात घराचा विषय निघाला. आमच्या एका जवळच्या मित्राने कसे आमरण प्रयत्न करून मुंबईत स्वत:चं घर घेतलं याविषयी आम्ही कौतुकानं भरभरून बोलत होतो. खरं म्हणजे आत्ताच्या काळात मुंबईमध्ये स्वत:चं घर घेणं ही गोष्ट सोपी नाही. त्याला आलेल्या अडचणी, संकटं, त्यावर त्यानं केलेली मात आणि त्याच्या पदरी पडलेलं यश हे खरोखरच कौतुकास्पद होतं. नजीकच्या काळातली अशी काही उदाहरणं आम्ही आठवू लागलो. अजून दोन-चार नावं चर्चेत आली. आणि ध्यानीमनी नसताना अचानक एकाच वेळी माझ्या आणि बायकोच्या मनात विचार आला- आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे? चर्चा आता त्या दिशेला वळली. साहजिकच सुरुवातीला पैशाचा विचार समोर आला आणि इथेच घर घेण्याविषयी विचार बारगळतोय की काय असं वाटायला लागलं. पण बँक आपल्याला मदत करू शकेल! किती लोन मिळू शकेल याचा अंदाज बांधला आणि परत एकदा हुरुप आला. म्हणून मग लगेच त्याच दिवशी एका नामवंत बिल्डरच्या एका प्रकल्पाला भेट द्यायला गेलो. पण त्या घरांच्या किमती ऐकून आपल्या स्वत:च्या मालकीची वास्तू आपल्यापासून कोसो दूर असल्याचा प्रत्यय आला. परत एकदा विचार डगमगायला लागले. पण यावेळी मात्र आम्ही पक्का निश्चय केला. अडचणी तर येणारच; पण काहीही झालं तरी खचायचं नाही. काहीतरी मार्ग शोधायचाच. आर या पार. सुरुवातीला लहान घरापासून प्रारंभ करू; जे आपल्या बजेटमध्ये असेल. ठीक आहे!
मग आता तशा घरांचा शोध सुरू झाला. आमच्या एका ओळखीच्या एजंटला आमच्या घराबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या आणि त्याच्या निरोपाची वाट बघायला लागलो. दुसऱ्या बाजूला उगाच वेगवेगळ्या घरांमध्ये केलेल्या इंटिरिअर डिझाइनचे फोटो इंटरनेटवर शोधून शोधून पाहायला लागलो. आपलं संभाव्य घर कसं सजवायचं हे स्वप्नात वगैरे नाही, तर प्रत्यक्ष लॅपटॉपवर आम्ही बघत होतो. त्या क्षणी अस्तित्वात नसलेल्या आमच्या घरासंदर्भात सुरुवातीला मतभेद आणि नंतर भांडणं व्हायला लागली. पण या सगळ्या प्रक्रियेची मजा मात्र वाटत होती. मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. (या सगळ्याला काही बेअक्कल कीटक सुरुंग लावणार आहेत याची पुसटशीही कल्पना तेव्हा नव्हती.) आणि एक दिवस आमच्या एजंटचा फोन आला. एक-दोन घरं त्यानं आम्हाला दाखवली. पण एकही पसंत पडेना. पुढच्या आठवडय़ात भेटू, अजून घरं दाखवतो, असं म्हणून तो निघून गेला. बापरे! अजून एक आठवडा दम धरवेना. मग त्या काळात बँकेसंबंधीचं काम उरकून घ्यायचं ठरलं. त्यासाठी पुण्याला गेलो. दीर्घ चर्चेअंती बँकेने आवश्यक ते लोनही द्यायचं कबूल केलं. कल्पनेतल्या गोष्टी प्रत्यक्षात आकार घ्यायला लागल्यावर येणारं टेन्शन हवंहवंसं वाटायला लागलं. एरवी त्यानं जीव नकोसा होऊन जातो. आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी घेऊन मुंबईला परतलो. आठवडा उलटून गेला तरी एजंटचा फोन येईना आणि तो फोनही उचलेना.
एक गोष्ट इथे मला सांगावी लागेल, की घर या संबंधातल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत असल्याने अगदी क्षुल्लक गोष्टींबद्दलही मी अनभिज्ञ होतो. त्यामुळे कुठल्या गोष्टीला किती वेळ लागू शकतो आणि त्यासाठी आपण किती संयम ठेवायला पाहिजे याचा मी अंदाज करू शकत होतो; जो चुकू शकत होता. पुढच्या पाच दिवसांत परत एजंटचा फोन आला. ‘एक फ्लॅट आहे, पण टॉप फ्लोअर आहे.’ पावसाळ्यात छत गळणं किंवा उन्हाळ्यात खूप उकडणं या समस्येमुळे आम्हाला टॉप फ्लोअर अजिबात नको होता. ‘पण बघून तर घ्या एकदा. मी घरमालकाला बोलावून घेतो. पसंत पडला तर आजच व्यवहार पक्का करून टाकू,’ असं तो म्हणाला आणि आम्ही फ्लॅट बघायला गेलो. त्या फ्लॅटमध्ये आम्ही प्रवेश केला आणि काय झालं माहीत नाही. ‘हेच आमचं घर’ असं मला आणि बायकोला एकदम वाटून गेलं. हॉलच्या खिडकीतून बाग दिसत होती. बागेच्या समोर मंदिर होतं. बेडरूमच्या खिडकीतून डोंगर दिसत होता. दूरदूपर्यंत झोपडपट्टीचा मागमूसही नव्हता. मी म्हणालो, ‘येस! एकदम पसंत!’ व्यवहार पक्का झाला आणि मी टोकन अमाऊंट देऊन टाकली.
आता सगळ्या प्रोसेसमधून फ्लॅटचा ताबा मिळायला अजून दोन-अडीच महिने लागणार होते. रजिस्ट्रेशनसाठी कागदपत्रं गेली आणि घराच्या किमतीच्या अर्धी रक्कम मी घरमालकांकडे सुपूर्द केली. घरात काय काय सुधारणा करायच्या यासंबंधी आमच्यात अखंड चर्चा घडत होत्या. कुठल्याही अडचणींशिवाय आम्ही निम्मा मार्ग पार केला होता. याबद्दल आम्हाला आश्चर्यही वाटत होतं आणि त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे वारंवार आभार मानत होतो. घर ताब्यात मिळायच्या वेळेस (आपल्या) घरात रिनोव्हेशनचं काम पूर्ण झालेलं असेल तर वेळ वाचेल या उद्देशाने घरमालकांकडून त्यासाठी रीतसर परवानगी मिळवली. त्यांनीही सोसायटीला तसं पत्र देऊन कळवलं. घरात तोडफोडीचं काम सुरू झालं. किचन, बाथरूम, टॉयलेट नवीन टाइल्स बसवण्यासाठी सज्ज झाली. काही ठरावीक उद्देशाने बेडरूममधला पोटमाळा अर्धा तोडला.. आणि आमच्या स्वप्नांना लागणाऱ्या सुरुंगाची वात पेटली. इथे सोसायटी, सोसायटीचे नियम व तिच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा माझा पहिल्यांदा परिचय झाला. पोटमाळा तोडल्याची बातमी वायुवेगाने सोसायटीभर पसरली. सोसायटीच्या तथाकथित सेक्रेटरींनी काम ताबडतोब बंद करण्याचा हुकूम सोडला. ‘मेन स्ट्रक्चरला तुम्हाला धक्का लावता येणार नाही..’ अशी मोघम कल्पना मला दिली गेली होती. पण बेडरूममधला पोटमाळा हा मेन स्ट्रक्चरचा भाग असतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी मी संबंधित मित्रांना फोन केले. त्यांच्याकडून पोटमाळा मेन स्ट्रक्चरचा भाग नसतो अशीच माहिती मिळाली. आता मला आणि घरमालकाला या सो-कॉल्ड गुन्ह्यच्या चौकशीसाठी कमिटी मेंबरपुढे हजर व्हायचे होते. हा गुन्हा जवळजवळ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याच्या लायकीचा आहे असं चित्र आमच्यासमोर उभं केलं गेलं. बेडकासारख्या चेहऱ्याची आणि आकाराची एक व्यक्ती मी जणू त्यांच्याच घराची नासधूस केल्यासारखी उगीचच मोठय़ा आवाजात बोलत होती. मला एक गोष्ट कळत नव्हती, की माझ्या घरात मी काय करावं याचा निर्णय देणारे हे लोक कोण? तो पोटमाळा पुन्हा बांधून द्यावा लागणार हे उघडच होतं. पण अजूनही बऱ्याच नरकयातना वाटय़ाला येणार आहेत हे कमिटी मेंबरच्या आवेशावरून मला कळलं. तोडलेल्या भागाचं स्ट्रक्चरल इंजिनीयरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करायचं असं ठरलं. अर्थातच सर्व खर्च माझा. ही गोष्ट मी आमच्या एजंटच्या कानावर घातली. आमचा एजंट मात्र देवमाणूस निघाला. त्याने या प्रकारात लक्ष घालायचं आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं कबूल केलं. इंजिनीयरने ठरल्याप्रमाणे सविस्तर ऑडिट रिपोर्ट दिला आणि कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं नमूद केलं. पण तरीही कमिटीचा निर्णय होत नव्हता. मेंबर्स विनाकारण वेळ घेत होते. सोसायटीत हा असा तोडफोडीचा पायंडा पडू नये म्हणून मला धडा शिकवण्यासाठी हे सर्व चाललेलं होतं, हा एक नवीन दृष्टिकोन मला कळला. वेळ जात होता, पण मला बरं वाटत होतं. अशा शिस्तप्रिय सोसायटीमध्ये मी राहायला येणार म्हणून अभिमान वाटायला लागला होता.
पण या अभिमानाचं संतापात रूपांतर व्हायला फार वेळ लागला नाही. मी त्यांना वारंवार विनंती करत होतो- ‘बाकी काम चालू राहू दे. माझं वेळेचं आणि पैशाचं खूप नुकसान होत आहे. शेवटी मी इथेच राहायला येणार आहे. त्यामुळे मी सर्व फॉरमॅलिटीज् पूर्ण करीनच.’ पण ते कामही सुरू होऊ देईनात, काही निर्णयही घेईनात. आणि स्ट्रक्चरल इंजिनीयरच्या रिपोर्टमध्येसुद्धा आता त्यांना त्रुटी दिसायला लागल्या होत्या. इथपर्यंत दीड महिना उलटून गेला होता. त्यातच अध्यक्ष १५ दिवसांसाठी बाहेरगावी निघून गेले. म्हणजे ते येईपर्यंत काम ठप्प. माझे हातच नाही, तर मी अख्खा दगडाखाली गेलो होतो. घरमालकाला मी बऱ्यापैकी पैसे दिले होते; जे काही लाख रुपये होते. पण घरमालक संत माणूस होता, ही त्यातल्या त्यात मनाला दिलासा देणारी गोष्ट होती. १५ दिवसांनी सोसायटीचे बेजबाबदार, निर्बुद्ध अध्यक्ष आले. पहिल्यांदा पोटमाळा बांधा, त्यानंतर बाकी काम सुरू करा- असा निर्णय झाला. स्ट्रक्चरल इंजिनीयरने दोन पद्धतीने हे काम करता येईल हे रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं. त्यांच्या देखरेखीखाली काम पूर्ण झालं. पण प्रत्यक्ष काम करताना अधिक चांगली आणि जास्त सुरक्षित पद्धत वापरली गेली. ज्यासाठी त्या महामूर्खानी दोन महिने वेळ काढला, ते काम दीड तासात पूर्ण झालं. मला त्या मूर्खाची मनस्वी चीड यायला लागली. माझ्या मनात खूप गलिच्छ शिव्या येत होत्या. प्रत्येकाला कल्पनेत समोर उभं करून मी त्या देतही होतो. मी जरासा समाधानी होतो की आता कमिटी मेंबर्सनी हे काम एकदा बघितलं की मग आपला अडसर दूर होईल.
‘पण आम्हाला बांधकामाची ही पद्धत सांगितली का नाही?’ याकरता ते अक्कलशून्य विकृत कीटक अडून बसले आणि परत एकदा त्यांनी काम थांबवलं. आता त्यांनी आमच्याकडून एक बॉन्ड लिहून घ्यायचं ठरवलं; ज्यात भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानीची जबाबदारी माझी राहील असा मुद्दा होता. मी तो सही करून दिला. तरीही निर्णय होईना. मी वारंवार माफी मागून, ते म्हणतील त्या गोष्टी कबूल करूनही त्यांचं समाधान होईना. शेवटी २५ हजार रुपये दंडही माझ्याकडून वसूल करायचा ठरला. आणि त्याक्षणी मी निर्णय घेतला. ज्या सोसायटीबद्दल मला आधी अभिमान वाटला होता, तिथे यापुढे चुकूनही पाऊल ठेवायचं नाही. आपल्याला कितीही आर्थिक नुकसान सोसावं लागलं तरी चालेल; पण या सडक्या आणि किडक्या बुद्धीच्या लोकांचा सहवास आपल्याला नको. त्यांना कुठलंही काम होऊच द्यायचं नव्हतं. फक्त वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून हातात आलेल्या सावजाला छळण्याचा आणि त्यातून स्वत:चा फुटकळ, मूर्ख अहंकार सुखावण्याचा विकृत आनंद त्यांना मिळवायचा होता. वर ते मराठी असल्याचा स्वाभिमान मिरवायला तयार! मला याचंच आश्चर्य वाटत होतं, की ते सर्व कष्टकरी, नोकरी करणारे लोक होते. कष्ट करून, प्रयत्न करून मिळवलेल्या स्वत:च्या पहिल्या घराचा आनंद काय असतो, हे प्रत्येकाला माहीत असेल. तो आनंद, ते समाधान आपल्या मूर्ख आणि बिनडोक अहंकारापायी कुणाकडून तरी आपण हिरावून घेत आहोत असं कुणालाच कसं वाटलं नाही? की त्यांना त्याच गोष्टीतून आनंद मिळत होता, कोण जाणे. शेवटी त्या घरात केलेली तोडफोड, तो पोटमाळा मी स्वत:च्या खर्चाने बांधून देऊन त्या वास्तूवर उदक सोडले. यानिमित्ताने एक धडा मिळाला.. स्वत:च्या मालकीचं घर घेताना भावनिक गुंतागुंत होता कामा नये. शेवटी काहीही झालं तरी तो एक व्यवहार आहे; जो चतुराईने आणि तर्कबुद्धीनेच केला जातो.
निखिल रत्नपारखी nratna1212@gmail.com