एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत. ३१ डिसेंबरला आणि नववर्षांत छान ‘फिट’ दिसायचे ‘लक्ष्य’ ठेवून तरुणांबरोबर मध्यमवयीन वर्गही ‘जिम’कडे वळतो आहे. मुळात नाचता नाचता व्यायाम होऊन जाणार ही संकल्पनाच आकर्षक आणि मजेशीर वाटावी अशी आहे. या व्यायामप्रकारांनी शरीराला नेमका कसा व्यायाम होतो ते जाणून घेऊया एरोबिक्स ट्रेनर डॉ. पलक कुलकर्णी यांच्याकडून..
एरोबिक्स
सत्तरच्या दशकातच परदेशात एरोबिक्स लोकप्रिय होऊ लागले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या गरजेनुसार इतर प्रकार शोधून काढायला सुरुवात केली. ‘झुंबा’ची सांगितली जाणारी जन्मकथाही मजेशीर आहे. ज्या व्यक्तीने हा झुंबा शोधला तेही एरोबिक्स ट्रेनर होते. एका दिवशी त्यांची एरोबिक्सची सीडी विसरली आणि लॅटिन प्रकारच्या डान्स सीडीवरून व्यायामप्रकार घेतले गेले आणि त्यातून झुंबा आला असं म्हटलं जातं. पण झुंबा असो की बॉलीवूड डान्स. सगळ्याचा पाया एरोबिक्स हाच!
एरोबिक्स म्हटलं की म्हणजे तालबद्ध कवायत डोळ्यासमोर येते. पण उगीचंच कशाही उडय़ा मारणे किंवा इकडे-तिकडे वळून व्यायाम करणे म्हणजे एरोबिक्स नव्हे. हा प्रकार खूप व्यवस्थित आणि विचारपूर्वक ठरवलेल्या ‘स्टेप्स’वर करायचा असतो. रोज तेच तेच करायचा कंटाळा येऊ नये म्हणून सतत वेगवेगळ्या ‘काँबिनेशन्स’मध्ये हालचाली केल्या जातात. त्यामुळे आज एरोबिक्समध्ये नवीन काय करणार याची उत्सुकता टिकून राहते.
एरोबिक्समध्ये ‘फ्लोअर एरोबिक्स’ व ‘बेंच एरोबिक्स’ असे दोन प्रकार आहेत. फ्लोअर एरोबिक्समध्ये सुरुवातीला ‘वॉर्म अप’ व्यायाम करावे लागतात. यातही नुसते कसेही हात-पाय हलवून चालत नाही. वॉर्म अपच्याही ठरलेल्या स्टेप्स असतात. त्यालाच जोडून ३० ते ४० मिनिटे पोटावरील स्नायूंना (अॅब्ज) तसेच कमरेखालच्या व वरच्या शरीराला व्यायाम दिला जातो. एरोबिक्समध्येसुद्धा बॉलीवूड डान्सच्या काही स्टेप्स करता येतात. ते करताना लोकांना मजा येते. व्यायामाची क्षमता म्हणजे ‘स्टॅमिना’ कमी असणाऱ्यांना या प्रकाराने सुरुवात करता येईल.
जे लोक खूप वर्षांपासून एरोबिक्स करत आहेत त्यांना मात्र बेंच एरोबिक्स हा प्रकार अधिक आवडतो असं दिसून येतं. यातही वॉर्म अप असतोच. पण प्रत्यक्ष व्यायाम ‘बेंच’वर म्हणजे ठरावीक उंचीच्या मोडय़ांवर साधारण ३० मिनिटांसाठी असतो. कमरेखालचे आणि वरचे शरीर व हृदय यांच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे. यात बेंचच्या स्टेप्स चढणे व उतरण्यात पायांचाही खूप वापर होतो.
झुंबा आणि बॉलीवूड डान्स
झुंबा या प्रकारात एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर ठरावीक पद्धतीने बसवलेल्या नृत्यासारख्या स्टेप्स केल्या जातात. यातली संगीत व गाणी ठरलेली असतात. संगीत हेच झुंबाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संगीताच्या तालावर पाय आपसूक थिरकायला लागतात आणि नाचायचा हुरूप येतो. ७-८ वर्षांपूर्वीपासून झुंबा आपल्याकडे आला आणि हळूहळू लोकप्रियही होऊ लागला.
बॉलीवूड डान्समध्येही वॉर्म अप चुकत नाही. पुढची ३० ते ४० मिनिटे व्यायाम करायचा असल्याने तो गरजेचा असतो. यात रोज हिंदी चित्रपटातील वेगळे गाणे घेऊन त्यावर शरीराला व्यायाम होईल अशा प्रकारे नाचाच्या स्टेप्स बसवल्या जातात. यातला कोणताही नाच शिकणे व करणे अवघड नसते हे महत्त्वाचे.
गटाने करायच्या व्यायामात अनेकांना नवे मित्र भेटतात हे देखील व्यायाम लोकप्रिय होण्यामागचे कारण असू शकेल. एकटय़ानेच चालायला किंवा पळायला जाणे किंवा एकटय़ानेच जिममध्ये जाऊन व्यायाम करणे अनेकांना कंटाळवाणे वाटते आणि थोडय़ा दिवसांनी ‘जिम’चा उत्साहसुद्धा कमी कमी होत जातो. याउलट संगीताच्या तालावर नाचण्याचा कंटाळा येत नाही, शिवाय बरोबरीच्या गटातले सगळेच नाचत असतात. त्यामुळे नव्याने आलेल्या व्यक्तीचा उत्साह टिकतो.
फायदा काय?
एरोबिक्स, झुंबा आणि बॉलीवूड डान्स या तिन्ही व्यायामांमध्ये नाचताना इतर कोणताही विचार मनात येत नाही. कारण इतर विचार करताना नाचाच्या स्टेप्स हटकून चुकतात, त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्यावेच लागते. या सर्व व्यायामप्रकारांमध्ये शेवटी ‘कूल डाऊन’ व्यायाम तसेच स्नायूंचे व शरीराला चांगल्या प्रकारे ताण देण्याचे (स्ट्रेचिंग) व्यायाम केले जातात. असा हा ५५ मिनिटे ते १ तासाचा ‘वर्कआऊट’ असतो. या व्यायाम प्रकारांना जिमच्या भाषेत ‘कार्डिओ-रेस्पिरेटरी वर्कआऊट’ असे संबोधले जाते. त्यामुळे शरीराला होणारे फायदे असे.
* हालचाली करताना शरीराला चांगला रक्तपुरवठा व्हावा लागत असल्यामुळे अर्थातच हृदयाचे काम वाढते. प्राणवायू अधिक घ्यावा लागतो त्यामुळे श्वासोश्वासही वाढतो. ३ ते ४ महिने सातत्याने हे व्यायाम केल्यानंतर शरीराचा ‘स्टॅमिना’ वाढल्याचे जाणवू लागते.
* नाचात पाय आणि हाताच्या हालचाली खूप असतात. पुन:पुन्हा झालेल्या एकाच प्रकारच्या हालचालींमुळे स्नायूंना उत्तम व्यायाम होतो आणि स्नायू पिळदार होतात. (स्नायूंचे टोनिंग)
* नाचताना घाम खूप येतो आणि शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
* शरीरात स्त्रवणाऱ्या संप्रेरकांची यंत्रणा, चयापचय क्रिया सुधारते, चांगली भूक लागू लागते.
* इतर कोणताही विचार न करता तासभर पूर्ण लक्ष देऊन नाचाचा व्यायाम करताना अक्षरश: प्राणायाम केल्यावर जसा शांत अनुभव मिळतो तसाच अनुभव येतो. हलके, ताजेतवाने वाटू लागते.
* उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हे व्यायाम करता येतात. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यायामांनी काही प्रमाणात कमी करता येतात.
* एरोबिक्स व नाचाच्या व्यायामात सांध्यांनाही चांगला व्यायाम होतो. भविष्यात संधिवात, हाडे ठिसूळ होणे या गोष्टी टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
* चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजन कमी व्हायला याची मदत होते. पण अर्थात वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीच्या आहाराचाही मोठा भाग असतो. कमी झालेले वजन कमी राखण्यासाठी हे व्यायाम व जोडीने ‘वेट ट्रेनिंग’सारखे इतर व्यायामही सुचवले जातात. व्यक्तीला मुळात ज्या कारणासाठी व्यायाम करायचा आहे ते लक्षात घेऊन नाचाबरोबर इतर प्रकारच्या व्यायामांचा योग्य मेळ घालता येतो.
– संपदा सोवनी