शरीरासाठी नियमित आरामदायी झोप अत्यावश्यक आहे. झोपल्यावर शरीराच्या सर्व क्रिया मंदावतात, अवयवांना आराम मिळतो आणि त्यांची दुरुस्तीदेखील होते. नीट झोप झाली नाही तर चिडचिडेपणा, थकवा, अंगदुखीसारखा त्रास होतो. या स्थितीत व्यक्तींची एकाग्रता, चपळता आणि विचारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांच्या कामात चुका होतात आणि अपघातही घडू शकतात. सततच्या अनियमित झोपेमुळे मेंदूचे आणि मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये झोप नीट न झाल्यामुळे चंचलपणा, बुद्धीचा खुरटलेला विकास आणि वागणुकीतले त्रास निर्माण होतात.

झोप म्हणजे काय?
शरीराच्या इतर क्रियांप्रमाणेच झोप ही क्रिया आहे. मानेच्या भागातील पेशींमध्ये झोपेचे संकेत निर्माण होतात. तेथून मज्जारज्जूद्वारे शरीरातील सर्व अवयवांना मंदावण्याचे संकेत जातात. मेंदूच्या इतर भागांनाही हे संकेत जातात. त्यानंतर झोपेचा पहिला प्रकार म्हणजे ‘स्लो वेव स्लीप’ची सुरुवात होते. साधारण तासाभराने दुसरा प्रकार सुरू होतो. यामध्ये डोळ्यांची बुब्बुळे हलतात म्हणून त्याला ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ किंवा ‘आरईएम’ म्हणतात. या दरम्यान मांसपेशीतील ताण वाढतो आणि शरीराच्या काही हालचाली होतात. या झोपेच्या टप्प्यात शरीर आणि अवयव नेहमीपेक्षा जास्त उत्तेजित होतात. हा टप्पा मेंदूच्या आरामासाठी महत्त्वाचा असतो. रात्रभर हे दोन प्रकार आलटून-पालटून घडतात. स्लो वेवचा कालावधी कमी होत जातो आणि आरईएमचा वाढत जातो.
चांगली झोप म्हणजे काय?
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे झोपेच्या बाबतीत लागू पडते, तरीही साधारण दर २५ तासांमागे सहा ते आठ तास झोप प्रौढ व्यक्तीसाठी गरजेची आहे. झोपायला गेल्यावर अध्र्या तासात शांत झोप लागली पाहिजे आणि आपोआप जाग आली पाहिजे. जाग आल्यावर आराम वाटला पाहिजे व दिवसाची सुरुवात करण्याचा उत्साह जाणवायला हवा. आपल्या झोपेबद्दल त्यांना समाधान वाटले पाहिजे.
झोपेतील नैसर्गिक बदल कोणते?
काही व्यक्तींना तीन ते चार तास तर काहींना नऊ ते दहा तास झोप लागते. या टोकाच्या गरजा क्वचित असतात, पण त्या सातत्याने लहानपणापासून दिसून येतात. काही व्यक्ती सूर्यास्ताबरोबर झोपतात आणि सूर्योदयाच्या आधी उठतात तर काही मध्यरात्रीनंतर झोपून सकाळी उशिरा उठतात. काही व्यक्तींना दुपारी झोपावे लागते. झोपेत बडबडणे, चालणे, दात खाणे, स्वप्न पाहणे हे सर्व कमी-जास्त प्रमाणात होत असते. नवजात शिशु दिवसभर झोपत असतो. साधारण तीन ते पाच महिन्यांमध्ये ते रात्री जास्त व दिवसा कमी झोपू लागते. तीन वर्षांचे होईपर्यंत मुलांना दिवसभरात दोन तीन डुलक्या व रात्री जास्त वेळेची झोप लागते. शाळेतील मुलांना सात ते नऊ तास झोप लागते. पौगंडावस्थेत झोपेची गरज आणखीनच वाढते. त्यानंतर प्रौढपणात सहा ते आठ तास झोप पुरते. वृद्धपणी झोपेचे तास तेवढेच राहतात, मात्र झोपेतून सतत जाग येते आणि दिवसा डुलक्या येऊ लागतात.
झोपेचा त्रास म्हणजे काय ?
झोप चांगली येते की नाही हे फक्त संबंधित व्यक्तीच सांगू शकते. व्यक्ती पलंगावर डोळे मिटून पडलेली असते म्हणून त्यांना झोपेच्या तक्रारी नसतात, असे नाही. झोपेच्या त्रासाची अनेक कारणे असतात. बहुतेक वेळेला झोप कशी असावी व ती कशी सांभाळावी हे माहिती नसल्याने झोपेच्या तक्रारी निर्माण होतात. झोपेच्या तक्रारींचे दुसरे मोठे कारण म्हणजे मेंदूचे आणि मानसिक आजार, शारीरिक आजार आणि परिसरातील गोंधळ. यामुळे लहान मुलांनाही झोपेच्या तक्रारी उद्भवतात.
झोपेच्या त्रासावर उपाय काय ?
झोप कमी किंवा जास्त करण्यासाठी किंवा त्याची वेळ बदलण्यासाठी कुठलीही गोळी, काढा किंवा अंमली पदार्थाचा वापर करू नये. झोपेची तक्रार असली तर आपली अपेक्षा आणि नैसर्गिक झोपेबद्दलची माहिती योग्य आहे का, ते तपासून पाहा. लहानपणापासूनच्या झोपेच्या प्रकृतीप्रमाणे दिनक्रम नियोजित करा. महत्त्वाकांक्षा किंवा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी झोपेची ठेवण बदलू नका. झोपेची जागा शांत आणि आरामदायी असली पाहिजे. झोपेच्या दोन तास आधी व्यायाम, जेवण, मनस्ताप होईल असे वाचन किंवा चर्चा, चहा-कॉफी आणि अंमली पदार्थ टाळा. टीव्ही, मोबाइलपासून किमान तासभर दूर राहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप कधीही लागली तरी विशिष्ट वेळेलाच उठण्याची सवय करा. त्यामुळे चांगली झोप सातत्याने येते.
झोप सांभाळण्यासाठी सर्व बाबी सांभाळूनही त्यातून समाधान मिळत नसेल तर वैद्यकीय सल्ला घ्या. कारण झोपेचे त्रास इतर कुठल्या तरी आजाराचे लक्षणही असू शकते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader