मधुमेह आणि आहार नियोजन या विषयावर चर्चा करताना मधुमेह ज्या टप्प्याटप्याने वाटचाल करतो, त्याचा विचार करणे गरजेचे आहे. मधुमेह अंगणात (पहिली पायरी), मधुमेह उंबरठय़ावर (दुसरी पायरी) आणि मधुमेह घरात (तिसरी पायरी) या तीन टप्प्यातला हा प्रवास आहे. मधुमेहाच्या तीन पायऱ्यांचे गुणविशेष पाहू या..
पायरी क्रमांक १ : मधुमेहाची जोखीम जास्त असलेली व्यक्ती (बठे काम करणारी, व्यायामाचा, शारीरिक हालचाली यांचा अभाव असलेली, असंतुलित आहार घेणारी आणि ज्यांच्या कुटुंबात मधुमेह आनुवंशिक आहे.)
पायरी क्रमांक २ : पूर्वावस्थेतील मधुमेह (जेव्हा रक्तातील साखर सामान्यपेक्षा जास्त परंतु मधुमेहाचे वादातीत निदानासाठी आवश्यक पातळीच्या खाली असते)
पायरी क्रमांक ३ : मधुमेहाचे ठामपणे निदान झालेली व्यक्ती
या तिन्ही टप्प्यावर आहाराच्या नियोजनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आहाराच्या मूलभूत तत्त्वात जरी फार काही फरक पडत नसला तरी पायरीनुसार थोडा बदल करता येतो.
पायरी क्रमांक १ : आपल्याला होत असलेल्या आजारांचे प्रमाण जास्त असण्याची कारणे जरी अनेक असली तरी हे टाळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने जीवनशैलीतील बदल ही सर्वाधिक महत्त्वाची व प्रमुख बाब आहे. परंतु याची सुरुवात विकार झाल्यानंतर केल्यास त्याचा उपयोग फक्त रोगनियंत्रणापुरताच मर्यादित आहे. जर रोगाची शक्यता गृहीत धरून जीवनशैलीत जर बदल केले तर ते अत्यंत प्रभावी रोगप्रतिबंधक उपाययोजना म्हणून वापरता येईल. परंतु हे साध्य करायचे तर आपल्याला आपल्या जीवनशैलीमधील त्रुटींकडे आणि चुकीच्या गोष्टींकडे डोळसपणे पाहणे आवयक आहे आणि याची सुरुवात निश्चितपणे अगदी लहानपणापासून करायला हवी. जीवनशैलीत बदल करताना आपला आहार निश्चितपणे समतोल असावा याबद्दल कुणाचेही दुमत नाही. परंतु प्रत्यक्षात शीतपेयांचे अतिसेवन व सतत होणारा जंकफूडचा मारा आहाराचा समतोल बिघडवून टाकतो. शीतपेयांमध्ये असलेली साखर, कॅफीन व त्याची आम्लता याला आहारमूल्याच्या दृष्टीने कवडीची किंमत नाही. जी गत शीतपेयांची, तीच गत अत्यंत लोकप्रिय अशा खाद्यपदार्थाची. सॅण्डविच, पीझ्झा, पावभाजी, समोसा, बटाटावडा, शेवपुरी, बर्गर, दाबेली, डोनट, क्रिमरोल्स अशा विविध प्रकारची अतिचविष्ट चॉकलेट बिस्किटे हे सर्व खाद्यपदार्थ उष्मांकाच्या दृष्टीने अतिमंद असले तरी आहारमूल्यांच्या बाबतीत फार दरिद्री आहेत. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारमूल्यांचे हे दारिद्य््रा आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
दुसरी आणि तिसरी पायरी आहार नियोजनाच्या बाबतीत समान आहे. बरीच मंडळी काठावरच्या मधुमेहाकडे फार गांर्भीयाने बघत नाही ‘अभी दिल्ली दूर है’ अशा भाम्रक कल्पनेत रमलेली असतात. मधुमेहाचे निदान झाल्याबरोबर सर्वप्रथम मनात विचार येतो तो पथ्यांचा. मधुमेहाचा व साखरेचा थेट संबंध असल्यामुळे गोड पदार्थावर पहिला घाला पडतो. बहुतेक जण साखर असलेल्या पदार्थाच्या बाबतीत जागरूकता दाखवतात, पण आहारातील इतर घटकांच्या बाबतीत थोडेसे बेफिकीर असतात. जिभेचे चोचले पुरविणाऱ्या असंतुलित आहार पद्धतीत रमल्याने आहारातील पथ्ये नको वाटतात आणि मग जाचक वाटणाऱ्या पथ्यांना पर्याय सुचवणाऱ्या पळवाटा सुरू होतात.
आजच्या आधुनिक युगात मधुमेहाला, विशेषत: ‘टाइप दोन’ प्रकारचा म्हणजेच प्रौढावस्थेत येणाऱ्या मधुमेहाला आपली जीवनपद्धती बऱ्याच प्रमाणात जबाबदार असते. आपल्या जीवनपद्धतीत विशेषत: आहारात मधुमेहाला पूरक गोष्टींची रेलचेल असल्यास त्यात बरेच बदल करावे लागतात. काहीजण पथ्याच्या बाबतीत टोकाची भूमिका घेतात आणि त्यामुळे ते सतत र्निबधाच्या टांगत्या तलवारीखाली जगतात आणि ताणवग्रस्त होतात. मधुमेह झालेल्या व्यक्तीला साखर, ग्लुकोज, गूळ, मध, मदा हे पदार्थ टाळणे अत्यावश्यक आहे. आहार अत्यंत मोजका व संतुलित असण्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक मधुमेही व्यक्तीला त्याचे वय, वजन, याचे प्रमाण व मधुमेहाचा प्रकार यानुसार आहार ठरवावा लागतो. रुग्णाला किती उष्मांकाचा आहार द्यायचा हे एकदा ठरले म्हणजे त्याची विभागणी चार ते पाच भागात केली जाते.
खाद्यपदार्थाची अदलाबदल
मधुमेहात आहार एकसुरी होऊ नये यासाठी खाद्यपदार्थाची अदलाबदल करता येते. ज्या पदार्थापासून समान कॅलरीज मिळतात आणि ज्यांचे मुख्य अन्नघटक जवळपास सारखे असतात अशा पदार्थाची यादी केल्यास रोजच्या जेवणात विविधता आणता येईल. उदाहरणादाखल काही पदार्थाची अदलाबदल करता येईल, हे बघुया..
२५ ग्रॅम वजनाची एक पोळी अंदाजे ८० कॅलरीज देते. जर आपल्याला पोळीच्या ऐवजी दुसरा पदार्थ खायचा झाल्यास एका पोळीच्या बदल्यात आपण एक छोटी वाटी भात किंवा एक मध्यम आकाराची इडली अथवा २५ ग्रॅम मका पीठ, बाजरी पीठ यापासून तयार केलेली भाकरी घेता येईल आणि ‘अ’ प्रकारचे समीकरण मांडता येईल. आपल्या डॉक्टरांना याविषयी अधिक सविस्तर माहिती विचारा व तुम्हाला आखून दिलेल्या आहारात अधूनमधून बदल करा.
आहारात तंतूचे महत्त्व
तंतू किंवा चोथा (फायबर) हा पदार्थातील पचन न होणारा भाग. उदा. गव्हाच्या पिठातील कोंडा. तंतू जास्त असलेल्या अन्नपदार्थाचा मधुमेहात मात्र उपयोग होतो. तंतूमुळे अन्नरस शोषून घेण्याची प्रक्रिया मंदावते व पर्यायाने जेवणानंतर झपाटयाने वाढणाऱ्या साखरेच्या पातळीला खीळ बसते. तंतूचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थामुळे कोलेस्टेरॉल पण कमी होते. तंतू सर्व धान्यामध्ये, पालेभाज्यांमध्ये, कडधान्यांमध्ये असते. मेथीचे बी (मेथ्या) मधुमेहात उपयुक्त आहे. मेथ्याचा आपल्या आहारात नियमित वापर करावा. मेथ्याची पावडर गव्हाच्या पिठात मिसळून ठेवल्यास त्याची कडू चव फार जाणवत नाही. मोड आणलेल्या मेथ्यांच्या वेगवेगळया पाककृती करता येतील. मधुमेहाच्या आहाराची आखणी करताना
कल्पकतेला बराच वाव आहे. त्याचा उपयोग करून रोज रुचकर, स्वादिष्ट; पण संतुलित असा बेत आखायला हरकत नाही.
– डॉ. राजेंद्र आगरकर
sphdindia@gmail.com