डॉ. सतीश नाईक – dr.satishnaik.mumbai@gmail.com
वयस्कर माणसांमध्ये मधुमेह असला तर काही वेगळे प्रश्न असतात का?
निश्चितच. एकंदरीतच कुठल्याही आजाराला वयस्कर माणसांची शरीरं थोडय़ा वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत असतात. शरीराच्या मंदावलेल्या प्रक्रिया, एकाच वेळी अनेक आजारांशी त्यांची चाललेली झुंज, त्यासाठी घेतली जाणारी अनेकविध औषधं, वयानुसार कमी दिसणं, कमी ऐकू येणं, आकलनशक्ती कमी होणं, आर्थिक जुळवाजुळव करताना नाकीनऊ येणं, एकटेपणातून निर्माण झालेल्या मानसिक गोष्टी, दात नसल्याने कोिशबिरी किंवा फळं खाणं कठीण जाणं, एकटं राहात असताना जेवण बनवण्यात चालढकल करणं, तोल जाऊन पडण्याची भीती, त्यातून होणाऱ्या जखमा अथवा आधीच ठिसूळ झालेली हाडं मोडणं अशा कित्येक समस्या त्यांना भेडसावत असतात. अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर वैद्यकीय प्रश्नांसोबत त्यांना इलाजाशी संबंधित इतर अनेक छोटय़ा-मोठय़ा बाबींशी देखील झुंजावं लागतं.
त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची असते ती मूत्रिपडाची कार्यक्षमता. कारण अनेक औषधं मूत्रातून शरीराबाहेर फेकली जात असतात. वयानुसार मूत्रिपडाचं काम खूपच मंदावतं. त्यामुळे औषधांचा डोस देताना खबरदारी बाळगावी लागते. इथं एक महत्त्वाची गोष्ट मुद्दाम नमूद केली पाहिजे.
साधारण मूत्रिपडाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आपण ‘सिरम क्रियेटिनीन’ नावाची तपासणी करतो. ती सामान्य आली की समाधान पावतो. परंतु हे योग्य नाही. सिरम क्रियेटिनीनचे निष्कर्ष वयाशी जोडले गेले पाहिजेत. यासाठी ईजीएफआरचे त्रराशिक मांडले गेले पाहिजे तरच आपल्याला वयस्करांच्या मूत्रिपडाच्या कार्यक्षमतेचा अचूक अंदाज घेता येतो. औषधांचे डोस या त्रराशिकाशी जोडले तरच ज्येष्ठांना द्यायच्या औषधांचा योग्य निर्णय घेता येतो हे पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे.
अधूनमधून वृत्तपत्रांत मधुमेहाचा, त्याच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांचा आणि कर्करोगाचा संबंध जोडला जातो. त्याबद्दल नेमकं काय? खरंच असं काही होतं की..?
मधुमेह हा अत्यंत मोठा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे त्यावर सतत संशोधन चालू असतं, नवी औषधं येत असतात. त्यांची चर्चा सुरू असते. अनुभवांची देवाणघेवाण होत असते. काही जुन्या औषधांबद्दल नवी माहिती प्रकाशित होत असते. सगळीच माहिती जशीच्या तशी स्वीकारण्यात अर्थ नसतो. तुमचे डॉक्टर या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून तुमच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ असतात. त्यामुळे मनात शंका असली की केवळ कुठल्याही बातमीने विचलित न होता थेट तुमच्या डॉक्टरांशी बोलणं सर्वोत्तम. तरीही कर्करोगाचा विषय निघालाच आहे तर थोडं अधिक सांगणं आवश्यक वाटतं. मधुमेहासाठी जी औषधं वापरली जातात त्यात पायोग्लिटाझोन नावाच्या औषधासोबत एक चिठ्ठी तुम्हाला दिली जाते. त्यात या औषधामुळे मूत्राशयाचा कर्करोग होण्याची भीती असते, असं नमूद केलं गेलेलं असतं. त्यामुळे तुमच्या मनात शंका-कुशंका येऊ शकते. किंबहुना बरेच पेशंट हे औषध बंद करण्याची मागणीही करतात. त्याबद्दल थोडा खुलासा आवश्यक आहे. जर्मनी आणि फ्रान्समध्ये जेव्हा काही मृत व्यक्तींचा आणि त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा पाठपुरावा केला गेला तेव्हा या व्यक्तींमध्ये पायोग्लिटाझोन हे औषध चालू असल्याचं दिसलं. या गोष्टीला साहजिकच सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. त्यातून या दोन देशांत आणि भारतात त्यावर अल्पकाळासाठी बंदीही आली. इतर अनेक देशांना हा निष्कर्ष तेवढा पटला नाही. त्यांनी हे औषध आणि त्याची विक्री तशीच चालू ठेवली. कालांतराने बऱ्याच मोठय़ा प्रमाणात संशोधन केल्यावर ही भीती बहुतांशी अनाठायी असल्याचं दिसलं. तरीही सावधगिरीचा इशारा म्हणून अशा प्रकारची चिठ्ठी औषधासोबत दिली जाते. याला ‘ब्लॅक बॉक्स वॉर्निग’ असं म्हणतात. तसं हे औषध अल्पमोली आणि बहुगुणी आहे. शिवाय आपल्या देशात ज्या प्रकारचे मधुमेही पेशंट आहेत त्यांच्यामध्ये याचा खूपच चांगला उपयोग असल्याचं अनुभवाला आलेलं आहे. म्हणून यावर सरसकट बंदी घालणं बरोबर ठरलं नसतं. वयस्कर माणसांमध्ये कर्करोगाचं प्रमाण अधिक असल्यानं विशिष्ट वयानंतर दिलं जाऊ नये. त्याचा डोस कमी ठेवावा, ज्यांच्या कुटुंबात मूत्राशयाचा कर्करोग असल्याचा इतिहास आहे त्यामध्ये हे देण्यात येऊ नये आणि ज्यांच्यामध्ये हे सुरू आहे त्यांना जरा जरी संशय असेल तरी त्यांच्या मूत्रिपडाची नीट तपासणी करून घ्यावी असे संकेत आहेत.