माझ्या ‘सोशल स्टेटस’वर किती ‘कमेंट्स’ आल्या.. किती जणांनी माझ्या नव्या छायाचित्राला ‘लाईक’ केले.. ‘फ्रेंड्स’पैकी आत्ता ‘ऑनलाइन’ कोण आहे.. अशा गोष्टींचा क्षणाक्षणाला विचार करण्याची सवय लागते, तेव्हा आपण समाजमाध्यमांच्या म्हणजेच ‘सोशल नेटवर्किंग’च्या व्यसनाच्या दिशेने पाऊल टाकले आहे, असे समजावे. एका अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार इतर प्रकारच्या व्यसनांप्रमाणेच सोशल नेटवर्किंगचे व्यसन असणाऱ्यांच्या मेंदूत ‘डोपामिन’ या रसायनाची मात्रा वाढलेली आढळते. फेसबुक किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर गेल्यावर त्यांना किंचित ‘रिलॅक्स’ झाल्यासारखे वाटते आणि सोशल मीडियावर सतत पुन:पुन्हा जात राहावे, अशी अस्वस्थता वाटत राहते.
मोबाइलवर सतत ‘सोशल’ राहण्याचे व्यसन साधारणपणे पौगंडावस्थेत म्हणजे साधारणपणे वयाच्या १४व्या वर्षांपासून लागण्याची शक्यता अधिक असते. या व्यसनाची काही शारीरिक लक्षणेही लगेच दिसू लागतात. डोके दुखणे, डोळे जळजळणे आणि दुखणे आणि पोट दुखणे ही या व्यसनाची साधारणपणे दिसणारी शारीरिक लक्षणे आहेत. निद्रानाश किंवा शांत झोप न लागणे हे आणखी एक महत्त्वाचे लक्षण दिसून येते. काही अवधीनंतर दिसू लागणाऱ्या लक्षणांमध्ये कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, एकंदर आत्मविश्वास आणि समाजात प्रत्यक्ष मिसळण्याची क्षमता या गोष्टी कमी होत गेल्याचे आढळते. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही क्रियेवर प्रतिक्रिया देण्याची व्यक्तीची मूळची पद्धत बदलते. या व्यक्तिंच्या जीवनात आकडय़ांचे महत्त्व अचानक वाढते. किती ‘लाइक्स’, किती ‘कमेंट्स’, किती ‘फ्रेंड रिक्वेस्ट्स’ अशी समीकरणे सतत अस्वस्थ करू लागतात. या आकडय़ांचा परिणाम त्यांच्या तात्कालिक भावनिक स्थितीवर होऊ लागतो. शालेय वयात लागलेल्या याप्रकारच्या व्यसनात मूल साध्या गोष्टीवरही एकदम वैतागणे, लहानशा गोष्टीसाठी अतिरेकी हट्ट करू लागणे आणि मुख्य म्हणजे शालेय शिक्षणात त्यांची मुळात असलेली कामगिरी खालावणे या बाबी प्रामुख्याने दिसतात.
ही अवस्था येण्याआधीच पालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते. मुले घराबाहेर पडल्यावर त्यांना एखादा निरोप द्यायला किंवा ती वेळेवर घरी न आल्यास चौकशी करायला त्यांच्याकडे असलेल्या मोबाइलचा उपयोग होतो. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाइल देऊच नका, असे सांगणे अव्यवहार्य ठरेल. मात्र हा फोन केवळ पलीकडच्या माणसाशी बोलणे आणि वेळेला मेसेज पाठवणे या कारणांपुरताच मर्यादित राहावा. फोन ‘बेसिक’ स्वरूपाचा आणि अत्याधुनिक ‘फंक्शन्स’ची कमतरता असलेला असेल तर त्यातील इंटरनेटच्या वापरावर निश्चितपणे मर्यादा येतील. घरात असताना मुलांसह घरातील सर्वानीच आपापले फोन ठराविक जागी आणि सहज लक्ष जाऊ शकेल अशा ठिकाणी ठेवावेत, असा नियमही घालून घेता येईल. यामुळे मूल घरी असताना त्याच्याकडून होणारा इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर टाळता येईल. अर्थातच हा नियम घरातील सर्वानाच तितक्याच काटेकोरपणे लागू होणे गरजेचे.
मोठय़ा वयात या व्यसनाची जाणीव होऊन व्यक्तीने स्वत:च व्यसन सोडायचा निर्णय घेतला तर ते एका झटक्यात पूर्णपणे सोडून देणे सर्वात फायदेशीर ठरते. सोशल नेटवर्किंग एकदम बंद करता येणे शक्य नसेल तर त्यासाठी दिवसाचा ठराविक वेळ ठरवून घ्यावा. महत्त्वाचा संवाद व्हॉट्स अ‍ॅप किंवा फेसबुकवरून न करता थेट फोन करून किंवा मोबाइलवर मेसेज पाठवून करणे हाही एक नियम घालून घेता येईल. आपल्या ‘सोशल’ मित्रपरिवारालाही आपण ठराविक वेळतच ‘ऑनलाइन’ राहणार आहोत याची कल्पना द्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा