झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या किंवा चुकीच्या औषधांमुळे मृत्यू या घटना बातम्यांचा विषय ठरतात. मात्र या टोकाच्या घटना बाजूला ठेवल्या तरी रोज अगदी सहजपणे पोटात ढकलली जाणारी औषधे अनेक बरे-वाईट दुष्परिणाम शरीरावर घडवत असतात. जीवनदान देणारी औषधे नेमकी विष केव्हा ठरतात, हे सांगणारा लेख..
‘प्रत्येक औषध हे विष होऊ शकते, त्याचा डोसच याबाबतीत निर्णायक ठरतो,’ वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञ पॅरासेल्सस यांनी १५ व्या शतकात केलेले हे वक्तव्य. याचा व्यापक अर्थ घेतला तर असे म्हणता येईल की औषध चुकीच्या मात्रेत, चुकीच्या प्रकारे घेतले तर ते विषही ठरू शकते. औषधांच्या दुष्परिणामामुळे मृत्यू हे मृत्यूच्या सर्व कारणांमधील चौथ्या क्रमांकावरचे कारण आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण एचआयव्ही, रस्ते अपघात, श्वसनसंस्थेचे आजार अशा कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा औषध दुष्परिणामांनी होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त आहे.
औषध दुष्परिणाम म्हणजे काय?
औषधाने होणाऱ्या दुष्परिणामामुळे आजारा बरा होतो, नियंत्रणात राहतो. हा औषधाचा अपेक्षित परिणाम आहे. पण कोणतेही औषध हे सर्वगुणसंपन्न नसते. केवळ असा परिणाम करून ते थांबत नाही तर इतर अनेक परिणाम ते करत असते. यातील काही निरुपद्रवी असतात. जसे की आयर्न टॉनिकमुळे (लोहयुक्त औषधे) शौचास काळे होते. पण अनेकदा हे परिणाम कमीअधिक घातक असतात. यांनाच ढोबळमानाने साइड इफेक्ट्स म्हणतात. काही साइड इफेक्ट्स लगेच दिसतात तर काही औषधाच्या दीर्घ सेवनांतर दिसतात. काही ओव्हरडोसमुळेच होतात तर काही नेहमीच्या दिल्या जाणाऱ्या डोसमध्येही होतात. साइड इफेक्ट्स सर्वच रुग्णांमध्ये दिसतात, असेही नाही. वेदनाशामके उपाशीपोटी घेतल्याने पोटात जळजळ, सर्दी/अॅलर्जीवरील औषधांनी झापड येणे, सल्फासारख्या काही औषधांनी त्वचेवर पुरळ येणे, असे काही साइड इफेक्ट्स आपल्या ऐकीवात असतील किंवा काहींनी अनुभवलेही असतील. औषधांची चुकीची निवड, चुकीचा डोस/कालावधी, औषध घेण्याची चुकीची पद्धत, अनेक औषधे (व अनेक पॅथींचीही) एकत्र घेणे, बनावट औषधे अशा अनेक कारणांनी दुष्परिणाम हे अधिकाधिक घातक होत असतात. हे टाळण्यासाठी डॉक्टर्स, रुग्ण, परिचारिका, औषध कंपन्या, औषध विक्रेते यांनी संयुक्त जबाबदारी घ्यायला हवी.
दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावे?
‘पॉप अप पिल्स’चा हा जमाना. मूत्रपिंड निकामी होण्याचे जे प्रमाण अलिकडे वाढले आहे त्याचे एक महत्त्वाचे कारण वेदनाशामक औषधांचे दीर्घकालीन सेवन. लोक वर्षांनुवर्षे स्वमनाने आयबुप्रोफेन, अॅस्पिरिन, डायक्लोफेनॅलसारखी वेदनाशामके घेत असतात व पुढे त्यांचा दुष्परिणाम मूत्रपिंड गमावण्यापर्यंत होवू शकतो याची सुतराम कल्पना त्यांना नसते. बॉडी बिल्डिंगच्या नादात स्टिरॉइड्सची इंजेक्शने, गोळ्या स्वमनाने, जिममध्ये सांगितल्याने घेताना युवक दिसतात. त्यामुळे तरुण वयातच हाडे पोकळ होतात, उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. अॅसिडिटीसाठी कायम जेल्युसील, रॅनटॅक, ओमेझ यांसारख्या औषधांचा मारा पोटावर करणारे अनेक असतात. मग पचनसंस्थेचे कामच बिघडून जाते. आपातकालीन गर्भनिरोधके वारंवार वापरून हार्मोनल संतुलन बिघडवून घेणारे अनेक रुग्ण दिसतात.
नशेसाठी कोडीनयुक्त कफ सिरपचा वापर सर्वश्रुत आहे. झोपेच्या गोळ्या किंवा नैराश्यावरील औषधे रुग्ण अनेकदा स्वमनाने चालू ठेवतात. (डॉक्टरांनी काही काळासाठीच दिलेली असतात). यांचा परिणाम मेंदूवर, श्वसनसंस्थेवर होत असतो. याच औषधांच्या अनेक गोळ्या एकावेळी घेतल्याने विषबधा होऊन मृत्यू झाल्याच्या घटना आपण वाचतोच.
वरील उदाहरणादाखल उल्लेख केलेली सर्वच औषधे ही गुणी आहेत, पण त्याचा डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय केला जाणारा अतिरेकी वापराने रुग्ण दुष्परिणाम ओढवून घेताना दिसतात.
औषधांचा वापर, हाताळणी
इन्सुलिन इंजेक्शन घेतले किंवा मधुमेहासाठी गोळी घेतली पण लगेच पुरेसे काही खाल्ले नाही, मग काय होते? औषधाचा अगदी अपेक्षित दुष्परिणाम म्हणजे रक्तशर्करा सामान्य पातळीपेक्षाही कमी होऊन हायपोग्लायसेमिया होतो व त्यामुळे अगदी शुद्धही हरपू शकते. काहीवेळा रुग्ण औषधाचा डोस घ्यायला विसरल्याने नंतरच्या डोसवेळी डबल डोस घेतात. त्यामुळेही दुष्परिणाम होतात. गर्भारपणी बाळावर विपरीत परिणाम होतात व जन्माला येणाऱ्या बाळामध्ये मतिमंदत्व, हाडांची अपुरी वाढ, हृदयदोष असे दुष्परिणाम दिसतात. अनेक औषधांमध्ये आपसात आंतरक्रिया होते व दुष्परिणाम दिसतात. त्यामुळे नेमकी कोणती औषधे आपण घेत आहोत याची कल्पना उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांना देणे जरूरीचे असते. नुसत्या औषधांमध्येच आंतरक्रिया होत नाहीत तर औषधे व अन्न यांच्यातही होतात. अनेक औषधे व मद्य यांच्यातील आंतरक्रियेमुळे आजाराची तीव्रता वाढते. उच्च रक्तदाबाचे किंवा मधुमेहाचे औषध घेतले व मद्याचा प्यालाही रिचवला तर अनुक्रमे रक्तदाब किंवा रक्तशर्करा सामान्य पातळीपेक्षा कमी होते. झोपेच्या गोळ्या, अॅलर्जीवरील औषधे यासोबत अल्कोहोलचे सेवन झाल्यास मेंदूवर त्याचा एकत्रित परिणाम होऊन रुग्ण बेशुद्धही होऊ शकतो. घरात लहान मुलांच्या हाताशी लागेल अशी औषधे ठेवल्यासही अनेक विषबाधेच्या घटना घडतात. घरातील वडीलधारी मंडळी घेत असलेल्या लोहाच्या लालचुटुक गोळ्या मुलांना आकर्षित करतात. शिवाय त्या शुगर कोटेडही असतात. अशा गोळ्या खाल्ल्याने मुलांना आयर्न पॉयझनिंग होते. उलटय़ा, पोटदुखी, आकडी येणे, शुद्ध हरपणे असे परिणाम दिसतात व ती एक मेडिकल इमर्जन्सी ठरते. औषधांचा वापर अधिक जबाबदारीनेच व्हायला हवा. प्रिस्क्रिप्शन औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लिहून दिलेल्या डोसमध्ये व कालावधीसाठीच घ्यायला हवीत. औषध विक्रेत्यानेही रुग्ण समुपदेशन केल्यास व प्रिस्किप्शननुसारच विक्री केल्यास सेल्फ मेडिकेशनला आळा बसू शकेल. एकंदर औषधांविषयीचे अज्ञान व कॅज्युअल दृष्टीकोन यामुळे औषधांचा गैरवापर होतो.
कधी अमृत, कधी विष!
झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या किंवा चुकीच्या औषधांमुळे मृत्यू या घटना बातम्यांचा विषय ठरतात.
आणखी वाचा
First published on: 28-01-2014 at 06:09 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Any medicine can be poisonous for health