कधी कधी मधुमेहात काही लोकांचे स्नायू दुखतात, खांद्यांचा त्रास होतो असं म्हणतात. खरंच हे होतं का?

अगदी खरं आहे. शेवटी स्नायू असोत की हाडं, दुखण्याची संवेदना मज्जातंतूंमार्फत होते आणि मधुमेहात मज्जातंतूंना इजा होते हे सर्वश्रुत आहे. पण मधुमेहात स्नायू दुखण्यामागे केवळ हेच कारण नसते. रक्तातली ग्लुकोज वाढल्यावरही थकल्यासारखं, स्नायू अवघडल्यासारखं वाटतं. स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या चोंदल्या तर त्यांचा रक्तपुरवठा बंद पडतो आणि स्नायूंचा अल्पसा भाग मृत होतो. याला मस्क्युलर इन्फाक्र्शन म्हणतात. स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणात अडथळा व्हायला लागला की स्नायू दुखतात. याशिवाय ‘ड’ जीवनसत्त्व कमी झाल्यावर तसंच कोलेस्टेरॉलसाठी दिल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांनी अंग दुखतं.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?

खांद्याच्या सांध्यात मधुमेहामुळे जे बदल होतात त्याने खांद्यांचा त्रास होतो. यात हात वर उचलणं कठीण होतं. उचलताना चांगलंच दुखतं. आम्ही याला फ्रोझन शोल्डर म्हणतो. एकदा सुरू झाला की भरपूर त्रास देतो. दंडाच्या स्नायूमधलं दुखणं आणि फ्रोझन शोल्डर यात फरक करणं जरुरीचं असतं. खांद्याच्या सांध्यात हात वर-खाली करताना दुखतं तर स्नायूत त्या कुशीवर झोपल्यावर दुखतं. दोहोंचे उपचार पूर्णत: भिन्न आहेत. फ्रोझन शोल्डरमध्ये व्यायामावर भर असतो तर दुखरा स्नायू औषधांमुळे बरा करता येतो.

स्नायूंचे किंवा हाडांचे इतर काही प्रश्न मधुमेहात संभवतात का?

मधुमेहाचा हल्ला शरीरात अनेक ठिकाणी होत असल्याने वेगवेगळे स्नायू तसेच सांधे किंवा हाडं त्रास देऊ शकतात. एकतर मधुमेहात हाडं ठिसूळ होतात. त्यांच्यामधलं कॅल्शियम कमी होतं, ‘ड’ जीवनसत्त्वही कमी पडतं. त्याचा परिणाम हाडं कमजोर होण्यावर होतो. अशी ठिसूळ हाडं पटकन मोडतात. शिवाय अनेकांना पायोग्लिटाझोन नावाचं औषध चालू असतं. त्या औषधाने हाडांच्या मजबुतीवर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच मधुमेहात हाड तुटण्याचा प्रकार लवकर व अधिक प्रमाणात होतो.

सांध्यांची हालचाल करणाऱ्या स्नायूंना मधुमेहाचा फटका बसला की सांधे आपलं काम नीट करू शकत नाहीत. नमस्कारासाठी हात जोडताना दोन्ही हातांचे तळवे एकमेकांशी व्यवस्थित न जुळणं, मनगट नीट न वळवता येणं, मूठ उघडताना हाताची बोटं पटकन सरळ न होणं (ट्रिगर फिगर), पावलाच्या एकंदर जडणघडण बदलणं अशा बऱ्याच समस्यांना मधुमेहींना तोंड द्यावं लागतं. पावलांची जडणघडण बदलल्यावर पुढे मोठे प्रश्न उभे राहू शकतात. पावलांच्या कमकुवत भागांवर अख्ख्या शरीराचं वजन पडलं तर पायाला जखम होते आणि प्रसंगी पाय कापण्यापर्यंत पाळी जाऊ शकते.

असे पाय कापले जाऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे?

मधुमेहात बहुधा पाय कापले जातात ते त्यांचा रक्तपुरवठा कमी झाल्यावर. परंतु पायाला होणाऱ्या जखमा होतात मज्जातंतूंना इजा झाल्यामुळे. अर्थात अशी इजा होण्यात पावलाच्या एकंदर घडणीचा महत्त्वाचा वाटा असतो. आपलं सगळं वजन तोलणारा पावलाचा भाग बहुधा दुर्लक्षित राहतो. किमान जितके आपण आपले हात निरखून पाहतो तितकं पायाकडे लक्ष देत नाही. मधुमेही मंडळीनी हे निश्चितपणे टाळायला हवं. पावलाच्या आकारात पडणारा फरक जेवढय़ा लवकर तुम्ही डॉक्टरांच्या नजरेस आणून द्याल तितकं बरं. कारण पावलाच्या अयोग्य जागी वजन पडायला लागलं की पुढच्या प्रश्नांची मालिका सुरू होते. वैद्यकीय भाषेत याला चेंजिंग प्रेशर पॉइंट असं म्हणतात. हे व्हायला देता नये. दुर्दैवानं तसं झालंच तर त्वरित आपल्या गरजेनुसार बूट बनवून घेऊन पुढचा अनर्थ टाळता येऊ शकतो. इथं गरजेनुसार हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे. बाजारात मधुमेहासाठी म्हणून विकले जाणारे बूट सरसकट सगळ्यांनाच उपयोगी पडत नाहीत हे लक्षात यावं यासाठी हे सांगणं.

– डॉ. सतीश नाईक
dr.satishnaik.mumbai@gmail.com