आपण जाड आहोत, हे आरशात पाहून समजतेच. पण फक्त शारीरिक जाडीवरून स्थूलता व तिचे योग्य मापन होत नाही. बीएमआय हा सार्वत्रिक वापरला जाणारा निकष असला तरी लहान मुले, किशोरवयीन मुले-मुली, स्त्रिया यांच्यासाठी स्थूलतेच्या इतर निकषांकडेही पाहणे गरजेचे आहे. आजारांच्या दृष्टीने पाहायचे झाले तर पोटाचा घेर हा भारतीयांसाठी बीएमआयपेक्षाही महत्त्वाचा ठरणारा आहे.
स्थूल व्यक्ती कोण हे साधारणत: नजरेने समजत असले तरी जाड दिसणारी प्रत्येक व्यक्ती स्थूल असेलच असे नाही. एखादा पहेलवान किंवा व्यावसायिक व्यायामपटू किंवा कुशिंग सिन्ड्रोमसारखा आजार असलेली व्यक्ती स्थूल वाटू शकते. त्यामुळेच नेमके किती जाड म्हणजे स्थूल हे शास्त्रीय पद्धतीने निश्चित करणे गरजेचे असते व त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अर्थातच बदलत्या जीवनशैलीमुळे स्थूल व्यक्तींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे, हेदेखील अगदी खरे आहे.
स्थूलता मोजण्याची इतर परिमाणे
’बहुतांश लोकांना बीएमआयचा निकष लागू पडतो. त्यातून शरीरातील चरबीचे प्रमाण समजू शकते. मात्र काही जणांना इतरही निकष लावण्याची गरज आवश्यक पडते. लहान बालके तसेच किशोरवयीन मुलांमध्ये बीएमआयचा निकष पुरेसा नाही. वजन आणि वयाच्या प्रमाणाचा निकष मुलांमधील स्थूलता मोजण्यासाठी वापरला जातो. वयानुसार वजनाच्या प्रमाणात ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक पुढे जाणारी मुले ही जाड ठरतात तर ८५ ते ९५ टक्क्य़ांमधील मुले ही काळजी न घेतल्यास जाड होण्याचा धोका असतो. किशोरवयीन मुलगे व मुलींमधील चरबीचे वेगवेगळे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार विविध वयोगटातील मुलांची स्थूलता मोजली जाते. वय समान असले तरी मुलगे व मुलींमधील सामान्य वजनाचे प्रमाण वेगळे असते.
’स्त्रियांच्या बाबतीत बरेचदा मासिक पाळी अनियमित असल्याचा स्थूलतेशी संबंध असतो. एवढेच नव्हे तर स्थूलतेमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वही येते. पोटाचा घेर वाढणे हे इंश्लुलिनची पातळी वाढण्याशी संबंधित असते व त्यामुळे स्थूल स्त्रियांमध्ये हार्मोनच्या पातळीत चढउतार होण्याचीही शक्यता असते.
’पोटाचा घेर, सीआरपी आणि होमा-आयआर अशा विविध चाचण्यांमधून चयापचय आजार नसल्याची खात्री केली जाते. ट्रायग्लीसराइड्स आणि लो हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन (एचडीएल) कोलेस्टेरॉल आणि थायरॉइड हार्मोन्स हेदेखील चाचणीद्वारे पाहिले जातात. शरीरातील साखरेची पातळीही मोजली जाते. शरीरातील चरबीचे प्रमाण, ग्लिसमिक निदर्शक पाहूनही स्थूलतेचे योग्य प्रमाण शोधता येते.
मध्य स्थूलता म्हणजे काय?
कंबरेजवळ गोळा झालेली चरबी ही मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. कंबरेचा घेर ३५ इंचापेक्षा (८० सेंमी) जास्त असलेल्या स्त्रिया व ४० इंचापेक्षा (१०२सेंमी) जास्त असलेल्या पुरुषांमध्ये हृदयविकाराची अधिक शक्यता असते. बीएमआयप्रमाणेच कंबरेचा घेरही वर्षांतून एकदा मोजण्याची गरज आहे. कंबरेचा घेर हा भारतीयांमध्ये स्थूलत्वाचे अधिक योग्य मापन करू शकतो व त्यामुळे स्थूलत्वामुळे येणाऱ्या आजारांची गंभीरता अधिक नीट समजू शकते.
वैद्यकीय स्थूलता
शरीरातील चरबीच्या अतिरिक्त प्रमाणावरून हा आजार ओळखला जातो. वैद्यकीय स्थूल असलेल्या व्यक्तींमागे सवयी, वारसाहक्काने मिळालेल्या शरीरातील जीन्स आणि वातावरणही महत्त्वाचे ठरते. फक्त आहार हे एकमेव कारण नसते. मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकार, आकडी, ठिसूळ हाडे, पित्ताशय आजार, झोपेचे व श्वसनेचे विकार, पीसीओडी, विविध प्रकारचे कर्करोग यासाठी स्थूलता कारणीभूत असल्याचे दिसते.
आजाराव्यतिरिक्तचे स्थूलतेचे परिणाम
स्थूल व्यक्तींना आजारांची जोखीम तर असतेच शिवाय त्यांना मानसिकदृष्टय़ाही त्रास सहन करावा लागतो. शरीराची प्रतिमा ही महत्त्वाची मानली जात असल्याने शाळा, कार्यालय आणि सामाजिक सोहळ्यांमध्येही स्थूल व्यक्तींना टक्केटोमणे खावे लागतात.
स्थूलतेवर मात कशी कराल?
’आरोग्य व्यवस्थापनाला महत्त्व द्या. तुमच्या गरजा आणि ध्येयानुसार उपचारांची दिशा ठरते. तुमच्या डॉक्टरांना विचारण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
’नेमके काय खाल्ल्याने किंवा कोणत्या सवयींमुळे माझे वजन वाढत आहे?
’वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणती आव्हाने आहेत?
’स्थूलता वाढण्यामागे काही आजार आहे का?
’मी आहारतज्ज्ञांकडे जाण्याची गरज आहे का?
’वजन व्यवस्थापनातील तज्ज्ञ समुपदेशकाची मला गरज आहे का?
’स्थूलता कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज आहे का?
स्थूलता मोजण्याचे परिमाण
बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हे स्थूलत्व मोजण्याचे परिमाण जगभरात मान्यता पावलेले आहे. वजनाला उंचीच्या (मीटर)वर्गाने भागले की बीएमआय मिळतो. खाली बीएमआयनुसार स्थूलता मोजण्याचे निकष आहेत.
– डॉ. रेखा भातखंडे