अंगात येणे म्हणजे काय?

हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. अंगात येणे हा मानसिक आजार आहे की नाही हे खूप लोकांना जाणून घ्यायचे असते. महाराष्ट्रात खूप ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळतो. अंगात येते तेव्हा काय होते ते गावातील प्रत्येक व्यक्ती आणि शहरातील बहुतेक व्यक्तींना माहीत आहे. यात त्या व्यक्तीचे लक्ष दुसरीकडे केंद्रित होते. व्यक्ती सतत विशिष्ट हातवारे करते किंवा शब्द बोलत राहते, जणू तंद्री लागलेली आहे. व्यक्तीचा आवाज, हावभाव बदलतात आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वच बदलून जाते. त्या व्यक्तीचा ताबा कुणी दुसऱ्याने घेतल्यासारखे होते. त्या व्यक्तीला अनेकदा घाम फुटतो. काही वेळानंतर ही स्थिती निघून जाते. अंगात आलेली व्यक्ती मग खूप दमलेली दिसते.

हे कुठे घडते?

स्त्री-पुरुष, लहान-मोठे अशा कोणाच्याही अंगात आल्याचा प्रकार दिसतो. सर्व धर्माच्या व्यक्तींमध्ये दिसते. मात्र विशिष्ट परिस्थितीतच हे घडते. साधारण धार्मिक विधी किंवा उत्सवाच्या वेळेला हे घडते. शहरात कमी तर गावाकडे जास्त प्रमाणात हा प्रकार दिसतो. श्रद्धा व्यक्त करण्याचा हा खूप वर्षांपासून सुरू असलेला मार्ग आहे. अनेकदा अंगात येणाऱ्या व्यक्तीला मुद्दामहून बोलावले जाते; त्यातून काही खासगी आणि सामाजिक प्रश्न (उदा- पावसाबद्दल) विचारणा केली जाते. समाजाला आणि साधारण व्यक्तीला त्याचा मानसिक आधार मिळतो आणि ती त्या समाजाची पद्धत असते. बहुतेक वेळेला त्या गावातील देव किंवा कुणी थोर व्यक्ती त्यांच्या अंगात येतात. मग हा प्रकार आजाराचा नाही. काही व्यक्ती उगीच खोटे वागून समाजाचे शोषण करतात. अंधश्रद्धा वाढवून त्याचा फायदा घेण्याचा आणि फसवणुकीचा हा प्रकार असतो. या व्यक्तीचा इतरांना त्रास होतो, ती त्या समाजाचा भाग क्वचितच असतात आणि ते इतर फसवे प्रकार करत असतात.

मग मानसिक आजार कसे ओळखायचे?

अंगात येणाऱ्या व्यक्तीला जर त्या प्रकारचा त्रास होत असेल, तर ते मानसिक आजाराचे लक्षण आहे. त्या व्यक्तीला असे वाटते की ‘मला हे नको आहे, पण तरीही असे घडत आहे.’ दुसरे म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबात किंवा समाजात ही पद्धत नसेल, तर ते मानसिक आजाराचे लक्षण ठरते. बऱ्याच वेळेला व्यक्तीवर कसले तरी दडपण, भीती किंवा दबाव असतो जो तो बोलू शकत नाही किंवा त्यातून सुटू शकत नाही. मग त्याच्या अंगात आले की तो ही सर्व सुप्त भावना व्यक्त करू शकतो. असे करून त्याचे म्हणणे मांडू शकतो.

मानसिक आजारात असे का घडते?

स्क्रिझोफ्रेनियामध्ये आपल्यावर मनाविरुद्ध कुणीतरी नियंत्रण ठेवत आहे असे वाटते, त्यामुळे अंगात येते. अतिनराश्य किंवा उन्मादात दैवीशक्ती किंवा देवांबरोबर संपर्कअसल्याचा भास होतो, त्यामुळे अंगात येते. काही वेळेला चरससारख्या अमली पदार्थामुळेही असे घडते. मानसिक आजार झाल्यामुळे तणाव सहन करण्याची क्षमता कमी होते. त्यावेळेला असे घडू शकते. या परिस्थितीत आपले लक्ष योग्य ठिकाणी केंद्रित करून त्याचे नियंत्रण ठेवणे जमत नाही. दबावाखाली असलेल्या व्यक्तीची इच्छा असते की त्यालाही किंमत मिळावी, मान मिळावा. वारंवार ही इच्छा दाबून ठेवल्यावर एखाद्या दिवशी देवी, किंवा कुटुंबातील कुणी थोर अंगात आल्याचे त्यांना अनुभवायला येते, हे मुद्दामहून घडत नाही. सुप्त इच्छा बाहेर पडण्याचे मार्ग असतात. मग घरातील इतर जण त्यांना नमस्कार करतात, घाबरतात आणि त्यांचा मानही वाढतो.

याबद्दल काय करावे?

धार्मिक विधी असेल आणि कुणाचे त्यात नुकसान नसेल तर त्यात हस्तक्षेप करू नये. पण अंगात आलेल्या व्यक्तीची मारहाण किंवा त्यांच्याकडून इतरांचे कशाही प्रकारचे शोषण होत असेल तर ते थांबवले पाहिजे. वर नमूद केलेल्यापकी लक्षणांमुळे मानसिक आजाराचा संशय येत असेल तर, तपासून घ्यावे. नुकते सुरू झाले असेल तर लवकर आराम मिळतो. मानसिक आजाराची औषधे द्यावी लागतात. त्या व्यक्तीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन जरुरी आहे. अंगात येण्याचे प्रमाण शहरीकरणामुळे आणि समाजातील बदलांमुळे कमी होत आहे. पण याला विचित्र प्रकार न समजता केवळ एक पद्धत किंवा मानसिक आजाराचे लक्षण  म्हणून समजून घ्यावे.

डॉ. वाणी कुल्हळी, vanibk@rediffmail.com 

 

Story img Loader