दूषित पाण्यासोबतच अन्नपदार्थामुळे होणाऱ्या पोटदुखीमुळे अनेकजण त्रस्त असतात. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अन्नपदार्थावाटे होणाऱ्या संसर्गाची आणि त्यामुळे जगभरात होत असलेले आजार-मृत्यू यासंबंधी गेल्याच आठवडय़ात अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार दरवर्षी भारतात १५ कोटी लोकांना दूषित अन्नपदार्थाचा त्रास होतो. असुरक्षित व दूषित अन्न खाल्ल्याने सुमारे १ लाख ७५ हजार माणसांचा मृत्यू होतो. महत्त्वाचे म्हणजे दूषित अन्नपदार्थाचा त्रास हा पाच वर्षांखालील मुलांना सर्वाधिक प्रमाणात होतो. या वयोगटातील साडेपाच कोटी मुलांना आजार होतात आणि त्यातील ३२ हजार मुले दगावतात, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जुलाब, उलटय़ा ही प्राथमिक स्वरूपातील लक्षणे असतात, मात्र काही वेळा दूषित अन्नपदार्थामुळे कर्करोग, मूत्रपिंड, यकृत, मेंदू यांना हानी पोहोचण्यापर्यंत त्रास होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संसर्गाचे प्रकार किती?
पाच वर्षांखालील मुलांना कोणतीही वस्तू उत्सुकतेने तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे जेवणासोबतच हात तोंडात घालणे, कडक वस्तूंचा चावा घेणे, कापड तोंडात टाकणे असे प्रकार ते करत राहतात. यात तोंडावाटेच संसर्ग होत असल्याने ते दूषित अन्नपदार्थाच्या गटातच मोडते. दूषित अन्नातून वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. विषाणू, जीवाणू, जंतू तसेच रसायने अन्नावाटे पोटात गेल्यावर त्यामुळे मुलांना त्रास होतो. या वयात मुलांची वाढ वेगाने होत असते. त्याचप्रमाणे त्यांच्या हालचालीही जास्त असतात. त्यामुळे वजनाच्या तुलनेत ते अधिक जेवतात. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, कच्ची फळे अन्नात जास्त असतात. या दोन्हीतून संसर्गाची अधिक शक्यता असते. मुलांची प्रतिकारक्षमताही तुलनेने कमी असल्याने त्यांना पटकन त्रास होतो व वेळीच लक्ष दिले नाही तर त्रास वाढू शकतो.

संसर्गाची लक्षणे
: दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यावर जुलाब, उलटय़ा सुरू होतात. साधारण सहा महिन्यांपर्यंत मूल आईच्या दुधावर वाढत असते. दुधात प्रतिजैविके असल्याने या काळात मूल सहसा आजारी पडत नाही. मात्र सहाव्या महिन्यानंतर नवीन पदार्थ देण्यास सुरुवात होते. काही वेळा नवीन पदार्थाचा मुलांना त्रास होतो.
: काही वेळा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यावर त्रास सुरू होतो. अन्नपदार्थामधून विषाणूसंसर्ग झाला असला तर उलटय़ा, पाण्यासारखे शौच होण्याचे प्रकार सुरू होतात. या प्रकारात प्रतिजैविके देऊन उपयोग होत नाही. मुलांना एखादी उलटी, जुलाब झाला तरी त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण एकदम कमी होते. त्यामुळे ती मलूल होतात. त्यांच्या शरीरातील पाण्याची कमतरता तातडीने भरून काढण्याची गरज असते.
: एका पेलाभर पाण्यात चमचाभर साखर व चिमूटभर मीठ टाकून घरच्याघरी जलसंजीवनी तयार करता येते. ती थोडय़ा थोडय़ा वेळाने मुलांना द्यावी. साधारण वयाच्या दोन वर्षांपर्यंत विषाणूसंसर्ग होतो. त्यानंतर जीवाणूंसंसर्गाची शक्यता अधिक असते.
: मुलांना खूप तीव्र ताप असेल, शीवाटे रक्त जात असेल तर त्याला जीवाणूसंसर्ग झाल्याचे समजावे. अशा वेळी डॉक्टर प्रतिजैविके देतात. याशिवाय भाज्या, फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खताद्वारे जंतूसंसर्गही होऊ शकतो. भाज्या, फळे स्वच्छ धुतली नाहीत तर हा त्रास होतो.

दूषित अन्नपदार्थाचा धोका कसा टाळावा?
जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.
: हात स्वच्छ धुवा. भाज्या, फळे स्वच्छ धुऊन घ्या. अन्न ठेवण्याची, शिजवण्याची भांडी, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा.
: मांसाहारी पदार्थाचे नियमित सेवन करणाऱ्यांनी कच्चे व शिजवलेले मांस पदार्थ वेगवेगळे ठेवावेत. पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवा.
: सर्व पदार्थ नीट शिजवा. ७० अंश से. तापमानावर किमान ३० सेकंद पदार्थ शिजला तरी त्यातील बरेचसे विषाणू, जीवाणू, जंत मरतात. थंड करून साठवलेले पदार्थ खातानाही पुन्हा गरम करा.
: पदार्थ योग्य तापमानात साठवा. सामान्य तापमानाला दोन तासांपेक्षा अधिक काळ पदार्थ ठेवला की तो दूषित होण्याची क्रिया सुरू होते. शीतकपाटामध्येही एका दिवसापेक्षा अधिक काळ पदार्थ ठेवू नका.
: स्वच्छ पाणी वापरा. अन्नपदार्थासाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या, फळे, इतर पदार्थ स्वच्छ असावेत. दूध पाश्चराईज्ड असावे. रेडी टू इट पदार्थाची एक्स्पायरी डेट पाहून घ्या.

सतत संसर्ग झाल्यास..?
स्वच्छतेबाबत आता जनजागृती झाली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा मुलांमधील दूषित घटकांमुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण कमी आहे. मात्र तरीही अजूनही आर्थिकदृष्टय़ा निम्न गटात मुलांना हा त्रास होतोच. मुलांना दूषित पाणी किंवा अन्नपदार्र्थामुळे संसर्ग झाल्यास ते अशक्त होतात. वारंवार हा त्रास होत राहिल्यास त्यांची प्रतिकारक्षमता कमी होते व त्यामुळे कोणत्याही आजाराची लागण पटकन होऊ शकते. सतत आजारी राहणाऱ्या मुलांचे कुपोषण होते. शारीरिक, बौद्धिक वाढ खुंटते.

– डॉ. मंदार पवार
mandarpawar@hotmail.com>

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on the risk of contaminated food