दोषा: कदाचित् कुफ्यन्ति जिता लंघनपाचन:।
ये तु संशोधन: शुद्धा: न तेषां पुनरुद्भव ।।
आयुर्वेदातील शोधनचिकित्सा म्हणजेच पंचकर्माची महती सांगणारे सूत्र वाग्भटाचार्यानी अगदी मार्मिकपणे सांगितले आहे. याचा अर्थ, लंघन म्हणजे लघु आहार, शरीरात हलकेपणा निर्माण करणारा विहार, अन्नाचे पचन करणारी पाचक औषधे अशा चिकित्सेच्या साहाय्याने प्राकृतावस्थेत आलेले दोष पुन्हा डोके वर काढून आजाराचा पुनरुद्भव करू शकतात, परंतु शोधनचिकित्सेने म्हणजेच पंचकर्मानी शरीराबाहेर काढून टाकलेले दुष्ट दोष पुन्हा व्याधी निर्माण करू शकत नाहीत. या सूत्राचा तंतोतंत अनुभव आम्ही आमच्या रुग्णालयात कॅन्सर रुग्णांत पंचकर्म चिकित्सा करताना घेतला. २००५ मध्ये लहान आतडे, गर्भाशय, यकृत व उदरपोकळीत पसरलेला मेटास्टॅटिक कार्सनिॉइड कार्सनिोमा झालेल्या ऑस्ट्रेलियातील स्टेला मॅडम आमच्या रुग्णालयात २००७ मध्ये पंचकर्म चिकित्सेसाठी प्रविष्ट झाल्या. तत्पूर्वी त्यांचा केवळ लहान आतडय़ातील टय़ूमर लॅप्रोस्कोपिक सर्जरीने काढून टाकला होता व केमोथेरॅपी किंवा रेडिओथेरॅपी देणे सयुक्तिक नसल्याने त्याही चिकित्सा पद्धतींचा त्यांनी अवलंब केला नव्हता. ५० वर्षांच्या स्टेला मॅडम या दुर्धर आजाराशी सामना करीत असूनही शरीराने व मनाने चांगल्याच कणखर होत्या. त्यामुळे आम्ही त्यांना २१ दिवसांची पंचकर्मातील बस्ति चिकित्सा दिली. काहीही खाल्ल्यावर पोटात होणारे गॅसेस, उजव्या बाजूला पोटात जाणवणारा जडपणा, अपचन, मंदावलेली भूक व अनुत्साह या गेले दोन वर्षे सतावणाऱ्या तक्रारी बस्ति चिकित्सेने लक्षणीयरीत्या कमी झाल्या. त्यामुळे आयुर्वेदावरील विश्वास दृढ झालेल्या स्टेला मॅडम दरवर्षी आमच्या रुग्णालयात येऊन बस्ति चिकित्सा घेत आहेत. जोडीला नियमित आयुर्वेदिक औषधे, शाकाहार, व्यायाम व सकारात्मक दृष्टिकोन यांचे पालन यांच्या जोरावर त्या आजपर्यंत स्वस्थ जीवन जगत आहेत.
आयुर्वेदाने कोणत्याही आजाराची चिकित्साशोधन, शमन, रसायन, पथ्यकर आहार-विहार, मानस चिकित्सा व काही आजारांत दैवी उपक्रम अशी समुदायात्मक सांगितली आहे. कुलपाच्या सेव्हन लीव्हर्सप्रमाणे या सर्व चिकित्सा पद्धती एकत्रितरीत्या दुर्धर आजाराशीही सामना करण्यास समर्थ ठरतात. यापकी पंचकर्म ही रुग्णाचे बल चांगले असल्यास सर्वात प्रथम करण्यास योग्य अशी चिकित्सा पद्धती आहे. वमन म्हणजे आयुर्वेदिक औषधांचे चाटण किंवा काढय़ाच्या मदतीने उलटी करविणे, विरेचन म्हणजे रेचक आयुर्वेदिक औषधे देऊन जुलाब करविणे, बस्ति म्हणजे तेल, तूप किंवा काढय़ांचे गुदमार्गाने एनिमा देणे, नस्य म्हणजे नाकात औषधी तेल, तूप किंवा वनस्पतीच्या रसांचे थेंब सोडणे व रक्तमोक्षण म्हणजे शिरेतून किंवा जलौकांद्वारे दूषित रक्ताचे निर्हरण करणे या ५ चिकित्सा उपक्रमांना पंचकर्म किंवा शोधनचिकित्सा म्हणतात. हे पाचही उपक्रम तात्काळ फळ देणारे व आशुकारी असले तरी ते दुधारी अस्त्रांप्रमाणे असल्याने अयोग्य प्रकारे दिले गेल्यास विपरीत परिणामही करू शकतात. म्हणून अतिशय अनुभवी व शास्त्राचा प्रगाढ अभ्यास असलेल्या वैद्यांनीच या चिकित्सा पद्धतींचा वापर करणे योग्य ठरते. त्यात कॅन्सरसारख्या व्याधीत ज्यात रुग्णाचे बल आजाराने व त्याच्या चिकित्सेने अतिशय कमी झाले असते अशा वेळी अतिशय सतर्कतेने पंचकर्म करणे योग्य ठरते.
शरीरातील नाभीच्या ऊध्र्व भागातील अवयवांत होणाऱ्या व्याधींमध्ये तसेच कफप्रधान विकारांत वमन, नाभी आसमंतातील अवयवांच्या विकारांत व पित्तप्रधान व्याधींमध्ये विरेचन, नाभिच्या खालच्या भागातील अवयवांत होणारे व्याधी व वातप्रधान विकार यांत बस्ति, शिरस्थानातील अवयवांशी संबंधित व्याधींत नस्य व पित्त – रक्तदुष्टीच्या व्याधींत रक्तमोक्षण या चिकित्सा उपयुक्त ठरतात.
आपल्या शरीरातील श्वसन, अन्नसेवन, चलन – वलन, बोलण्याची क्रिया, विशिष्ट क्रमाने होणारे अन्नपचन, मल-मूत्र विसर्जन या सर्व हालचाली, हृदयाच्या स्पंदनापर्यंत सर्व गतिमान हालचाली या वातदोषाच्या नियंत्रणाखाली होतात. म्हणूनच वातदोष हा वात-पित्त-कफ या तीनही दोषांचा राजा आहे. शरीराचे व्यापार प्राकृत ठेवणे व विकृत होऊन व्याधी निर्माण होणे याला महत्त्वाचे कारण वातदोषच असतो. म्हणूनच ‘वातं स्नेहेन मित्रवत् ।’ या उक्तीप्रमाणे आपण जसे मित्राला प्रेमाने जपतो, तसेच वातदोषाला स्निग्ध गुणाने जिंकणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदीय संहितकारांनी तेल हे वातदोषाच्या चिकित्सेतील श्रेष्ठ शमन औषध व बस्ति चिकित्सा ही श्रेष्ठ शोधनचिकित्सा सांगितली आहे व त्यालाच परमषध म्हटले आहे. पित्त आणि कफ या दोनही दोषांना प्राकृतावस्थेत ठेवण्याचे सामथ्र्य प्राकृत वातदोषात व त्याच्यात विकृती निर्माण करण्याचे सामथ्र्य विकृत वातदोषात असल्याने वातदोषाच्या बस्ति चिकित्सेला कोणत्याही आजाराची अर्धी चिकित्सा म्हटले आहे.
बस्ति प्राधान्याने तिळतेल, औषधांनी सिद्ध केलेली दशमूळ तेल, सहचर तेल अशी तेले किंवा औषधांनी सिद्ध केलेली यष्टिमधु घृत, त्रिफळा घृत अशा तुपाचे दिले जातात, ज्याला अनुवासन बस्ति किंवा स्नेहबस्ति म्हटले जाते. तसेच औषधांनी सिद्ध केलेल्या काढय़ात मध, तेल व संधव योग्य प्रमाणात घालून दिल्या जाणाऱ्या बस्तिला निरुह बस्ति म्हणतात. शरीरात अधिक काळापर्यंत राहून शरीराचे तर्पण करीत असल्याने स्नेहबस्तिला अनुवासन बस्ति व शरीरातील दूषित दोषांचे तात्काळ निर्हरण करीत असल्याने काढय़ाच्या बस्तिला निरुह बस्ति म्हणतात. बस्ति चिकित्सा देण्यापूर्वी रोज रुग्णाच्या संपूर्ण शरीरास किंवा पोट-पाठ व मांडय़ांना किंचित गरम तेलाने मसाज म्हणजे बाह्य़ स्नेहन व औषधी काढय़ांच्या वाफेचा शेक म्हणजे स्वेदन करणे आवश्यक असते. सामान्यत: अनुवासन व निरुह बस्ति एकाआड एक दिले जातात. सलग ७ दिवस दिल्या जाणाऱ्या बस्ति उपक्रमास योगबस्ति, सलग १४ दिवसांच्या बस्ति उपक्रमास कालबस्ति व २१ दिवसांच्या उपक्रमास क्रमबस्ति म्हटले जाते. निरुह बस्ति कोणकोणत्या औषधांच्या काढय़ाने द्यायचा, अनुवासन बस्तिसाठी कोणते औषधी तेल अथवा तूप वापरायचे, रुग्णाला ७, १४, २१ यापकी किती दिवस बस्ति द्यायचे या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निश्चिती रुग्ण व त्याचा आजार यांचा सखोल अभ्यास करूनच तज्ज्ञ वैद्य करतात. बस्ति चिकित्सा सकाळी करणे योग्य असून निरुह बस्ति रिकाम्या पोटी व अनुवासन बस्ति काही तरी खाऊन लगेचच दिला जातो. बस्ति दिल्यानंतर विशेषत: निरुह बस्तिनंतर ४-५ वेळा मलप्रवृत्तीचे वेग येतात. त्यामुळे बस्ति उपक्रम चालू असताना थकवा भरून काढण्यासाठी पथ्यकर आहार व पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे रुग्णालयात प्रविष्ट होऊनच बस्ति उपक्रम देणे योग्य ठरते.
कॅन्सर हा व्याधी पेशींची अनियंत्रित व विकृत वाढ झाल्यामुळे होत असल्याने वातदोषाची विकृती हे सर्व प्रकारच्या कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे केमोथेरॅपी – रेडिओथेरॅपी – शस्त्रकर्म या आधुनिक चिकित्सा पध्दतींनंतर कॅन्सरचा पुनरुद्भव म्हणजे रिकरन्स किंवा मेटास्टॅसिस होऊ नये यासाठी बस्ति चिकित्सा महत्त्वपूर्ण ठरते. त्यातही प्राधान्याने वातदोषाच्या आधिपत्याखाली असलेल्या अवयवांतील कॅन्सरमध्ये म्हणजे लहान आतडी, मोठी आतडी, गुद, पौरुष ग्रंथी, वृषण, स्त्रीबीजकोश, गर्भाशय, गर्भाशयमुख, वृक्क, बस्ति या अवयवांच्या कॅन्सरमध्ये, वातवह संस्थेच्या म्हणजे नव्र्हस सिस्टीमच्या मस्तिष्क, मज्जारज्जू, नेत्र या अवयवांच्या कॅन्सरमध्ये, त्वचेच्या कॅन्सरमध्ये तसेच अस्थीमध्ये पसरलेल्या कॅन्सरमध्ये दूषित दोषांचे शरीराबाहेर निर्हरण करून, अवयवाची शुद्धी करून कॅन्सर पुन्हा उद्भवू नये म्हणून व्याधी व रुग्णबलानुसार दरवर्षी एकदा किंवा दोनदा बस्ति उपक्रम करणे हितकर ठरते. यामुळे केवळ वातशमन, जाठराग्नी व धातूंच्या अग्नींचे दीपन एवढेच कार्य होते असे नाही, तर चरकाऱ्यांनी दिलेल्या समर्पक उपमेप्रमाणे झाडाच्या मुळाशी घातलेले खत किंवा पाणी जसे संपूर्ण झाडाला टवटवी देते, त्याचप्रमाणे गुदमार्गाने दिलेला बस्ति संपूर्ण शरीराचे आरोग्य सुदृढ ठेवते. म्हणूनच केवळ कॅन्सर झाल्यावरच नव्हे, तर कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊच नयेत म्हणून प्रत्येक स्वस्थ व्यक्तीने दरवर्षी वर्षांऋतूत म्हणजे पावसाळ्यात विधिवत् बस्ति चिकित्सा घेण्याचा संकल्प करावा. हाच बस्तिमहिमा!
वैद्य स. प्र. सरदेशमुख
bsdtdadar@gmail.com
कॅन्सर आणि आयुर्वेद
आयुर्वेदातील शोधनचिकित्सा म्हणजेच पंचकर्माची महती सांगणारे सूत्र वाग्भटाचार्यानी अगदी मार्मिकपणे सांगितले आहे. याचा अर्थ, लंघन म्हणजे लघु आहार, शरीरात हलकेपणा निर्माण करणारा विहार, अन्नाचे पचन करणारी पाचक औषधे अशा चिकित्सेच्या साहाय्याने
आणखी वाचा
First published on: 18-11-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurvedic treatment for cancer