वय वाढलेय म्हणून सगळ्या जगापासून निवृत्ती घेणे, एकटे पडणे योग्य नाही, तसेच वय झाल्याचे नाकारणेही अयोग्यच. वयाचे भान असो, आरोग्याची काळजी असो की घरातील कारभार पुढच्या पिढीच्या हातात देणे असो.. वयपरत्वे मेंदूमध्ये होत असलेल्या बदलांमुळे वृद्धापकाळात विचारांची ठेवण बदलणे कठीण होते. मात्र वय वाढल्याचा बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणि नवीन शिकण्यावर परिणाम होत नसल्याने ज्येष्ठांनी प्रयत्नपूर्वक विचारात थोडे बदल केले तर अधिक शांतचित्ताने, व्यापातापाशिवाय आयुष्य जगायला मदत होईल.
वय झाल्याचे स्वीकारणे
काही जण साठीच्या अलीकडेच वृद्धत्वाची काठी घेऊन चालू लागतात. प्रत्येक बाबतीत स्वतंत्रता गमावून बसतात. आता आपल्याला काहीच जमणार नाही, असे ठरवून टाकतात आणि आला दिवस ढकलण्याचा प्रयत्न करतात. काही जण याच्या अगदी उलट वागतात. प्रकृती चांगली असेल तर सत्तरीतही तरतरीत राहणारे आजीआजोबा आजूबाजूला दिसतात. मात्र आरोग्य चांगले असले तरी वयानुरूप शरीराची क्षमता कमी होते. रात्रीची झोप कमी होऊन दिवसातून टप्प्याटप्प्याने झोप घेतली जाते. औषधे सुरू होतात. याचा विचार करून न झेपणारे धाडस आणि त्यातून उद्भवणारी कठीण स्थिती टाळता येईल.
काही ज्येष्ठ मात्र याचा विचार न करता पूर्वीप्रमाणेच तंबाखू, सिगारेट, दारूचे व्यसन, उशिरापर्यंतची जागरण, असंतुलित आहार, नवीन घर बांधण्याचा ध्यास किंवा एखाद्या नवीन उद्योगाला सुरुवात करण्याचा अट्टहास करतात. शरीर पूर्वीप्रमाणे साथ देत नसल्याने अनेकदा या प्रकारातून स्वत:ला व कुटुंबीयांना मनस्ताप होण्याची शक्यता असते. त्यामुळे नवनवीन गोष्टी करण्यातून आनंद मिळवताना शारीरिक क्षमता आणि वय झाल्याची जाणीव ठेवणे गरजेचे ठरते.
प्रत्येक मताचा आदर करण्याची भावना..
वयाने मोठे असल्याने कुटुंबातील प्रत्येकाने आपली आज्ञा पाळावी, असा आग्रह काही ज्येष्ठ करतात. खरे तर आपल्या संस्कृतीत ज्येष्ठांना आदर देण्याची व त्यांच्या मतांचे पालन करण्याची परंपरा आहे. मात्र प्रत्येक बाबतीत ज्येष्ठांना पूर्ण माहिती असेलच असे नाही. माझ्याकडे येणाऱ्या एका रुग्णाला तिची आजी केवळ पांढरे किंवा हलक्या रंगाचेच कपडे घालण्याचीच सक्ती करत होती. हे रंग तिला शोभून दिसतात म्हणे. दुसरीकडे नातवाने व नातसुनेने घर सजवताना मत विचारले नाही म्हणून त्यांच्या घरी कधीही न जाणारे आजोबाही माझ्याकडे आले होते. प्रावीण्य कमावलेल्या विषयात ज्येष्ठांनी जरूर मत द्यावे, त्यांचे ज्ञान कुटुंबाला फायद्याचेच ठरेल, पण काही वेळेला तरुणांना वेगळे
प्रयोग करून पाहायचे असल्याने, स्वत: ज्ञान मिळवायचे असते.
टोकाची विचारसरणी
लहानपणाच्या संस्कारातून, अनुभवातून ज्येष्ठांची विचारसरणी पक्की झालेली असते. स्वदेशी, पर्यावरणप्रेम याबाबत आदर असण्यात काही गैर नाही. मात्र कुटुंबातील लहानमोठय़ांची आवड वेगळी असते. ती समजून बदलण्याचा आग्रह करणे योग्य. मात्र स्वदेशी प्रेमापोटी घरातील कोणाचाच वाढदिवस साजरा होऊ न देणे किती योग्य? मासिक पाळीमध्ये कोणत्याही वस्तूला हात न लावण्याच्या आग्रहामुळे नातीला तिच्या मैत्रिणींनाच घरी आणण्यावर एका आजीने बंदी घातल्याचे उदाहरण माझ्याकडे आहे.
सतत गतकाळाशी तुलना करणे
आमच्या वेळी बाई, असलं काही नव्हतं.. हे पालुपद प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी आळवलं जातं. काही वेळा त्यात गंमत असते. गतकाळातील सुंदर आठवणी असतात. मात्र जुन्या प्रथांना कवटाळून ‘आमच्या वेळी पुरुष असली बायकी कामं करत नसत’, ‘घरातली कामं करायला नोकरांना ठेवायची पद्धत नव्हती’, ‘आम्ही घर सांभाळून नोकरी केलीय, पण स्वयंपाकाला कोणी ठेवलं नाही’, ‘मुलांना शिकवायला कशाला हव्यात शिकवण्या..’ असे टोमणे मारले जातात. बदलत्या कालानुरूप बदलत असलेल्या घराला असे मागे न्यावे का..
काळाशी सुसंगत वागायला शिकावे
जग झपाटय़ाने बदलत असते. नवनवीन तंत्रज्ञान येत राहते. गेल्या दशकभरात मोबाइल, टीव्ही-रिमोट, ओव्हन, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, इंटरनेट.. अशा अनेक नव्या बाबी आल्या. नवीन तंत्रज्ञानाशी नव्या पिढीप्रमाणे पटापट जुळवून घेता येणार नाही, हे अगदीच मान्य. मात्र त्यातच स्वत:ला सोयीच्या ठरतील, आयत्या वेळी उपयोगी पडतील अशा सुविधा शिकायला संकोच का करावा.. बरे, आपल्या शेजारचे अनेक आजी-आजोबा सराईतपणे मोबाइल, टीव्ही, इंटरनेट, मायक्रोवेव्ह, उद्वाहन चालवायला शिकत असतील तर ‘हे आम्हाला जमणार नाही, नकोच ती कटकट..’ असे म्हणून जगापासून स्वत:ला तोडून घेऊ नका.
– डॉ. वाणी कुल्हळी
 vanibk@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा