मधुमेहात रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण अचानक वाढलं तर काय अनर्थ होऊ शकतो?
मधुमेह हा दीर्घकालीन आजार आहे; परंतु अचानक तुमची शुगर वाढली तर प्रसंगी जिवाशी खेळ होऊ शकतो. डायबेटिक किटो असिडोसीस, हायपर ओस्मोलर नॉन किटोटिक कोमा हे आजार सर्वश्रुत आहेत. दोन्हीमध्ये रक्तातली ग्लुकोज खूपच जास्त असते. याशिवाय इतर अनेक छोटेमोठे प्रश्न उभे राहू शकतात. जसं फंगल इन्फेक्शन वगरे.
हे किटो असिडोसीस काय प्रकरण आहे?
शरीरात जेव्हा अचानक इन्शुलीनचं दुíभक्ष्य येतं, तेव्हा हा प्रश्न येतो. शरीरातल्या बहुसंख्य पेशी उर्जेसाठी ग्लुकोजवर अवलंबून असतात. पण आणिबाणीच्या वेळची सोय म्हणून इतर प्रकारची उर्जा चालवून घेण्याची क्षमतादेखील त्या राखून असतात. रक्तातून ग्लुकोज पेशीमध्ये जायला इंश्युलीन लागतं. इंश्युलीनचा पुरवठा थांबला म्हणजे पेशींना ग्लुकोज मिळायचं बंद होतं. अशावेळी चरबी किंवा स्निग्ध आम्ल ही पर्यायी उर्जाव्यवस्था वापरली जाते. समस्या ही आहे की स्निग्ध आम्ल उर्जेसाठी वापरली गेली की त्यातून रक्तातील आम्ल वाढतं. ही उर्जा वापरली जात असताना त्या रासायनिक क्रियेचा भाग म्हणून कीटोन्स नावाचं रसायन तयार होतं. त्यात रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण खूपच जास्त झाल्यानं ती ग्लुकोज लघवीमधून बाहेर फेकली जाते. लघवी जास्त होते. शरीरातली पाण्याची मात्रा घटते आणि पुढच्या अनर्थाला सुरुवात होते.
याची लक्षणं काय असतात?
वैद्यकीय दृष्टीनं ही इमर्जन्सी आहे. पेशंटला त्वरित मदत आणि उपचार मिळाले नाहीत तर त्यांच्या जीवावर बेततं. इंश्युलीन नसणं हाच मूळ प्रश्न असल्यानं डायबेटिक किटो असिडोसीस हा आजार बहुदा टाईप वन मधुमेहात दिसतो. टाईप टू मधुमेहात हे क्वचित घडतं. किंबहुना अनेक वेळेला टाईप वन मधुमेहाचं निदान डायबेटिक किटो असिडोसीसनंच थेट आयसीयुत होतं. मुलांना मधुमेह झाल्याचं लक्षात येण्याआधीच किटो असिडोसीस झालेलं असतं. अशा मुलांना अचानकपणे खूप लघवी व्हायला लागते, तहान लागायला लागते. कुठलातरी संसर्ग होतो आणि कडेलोट होतो. टाईप वन मधुमेही मुलांच्या अचानक पोटात दुखू लागणं आणि वांत्या होणं ही मुख्य लक्षणं दिसतात. ही लक्षणं वैशिष्ट्यपूर्ण नसल्यानं बऱ्याचदा निदानाला उशीर होतो. तोपर्यंत मुलं बेशुद्ध झालेली असतात.
दुर्दैवानं आपल्या देशात थोडं गोंधळाचं वातावरण आहे. अनेक लोकांमध्ये इंश्युलीनबद्दल गरसमज आहेत. वैद्यकीय ज्ञानाचा अभाव आहे. शास्त्राच्या जाणीवा पुरेशा प्रगल्भ झालेल्या नाहीत. त्यामुळं कोणीतरी सांगितलं म्हणून इंश्युलीन बंद करून तोंडी औषध दिलं जातं आणि ही टाईप वन मधुमेहाची मुलं मोठ्या संकटात सापडतात. कृपया असं करू नका. मुलांच्या जीवाशी खेळू नका.
यावर उपाय आहेत का?
उपाय जरूर आहेत. पण त्यासाठी रुग्णांना रुग्णालय गाठावं लागतं. सर्वात उत्तम उपाय म्हणजे मुलं तुमची नजर चुकवून इंश्युलीन घेण्याचं थांबवत नाहीत ना, इंजेक्शन दुखतं म्हणून, शाळेत लाज वाटते म्हणून किंवा कॉलेजमध्ये मित्रमत्रिणींसमोर वाईट दिसतं म्हणून एखादा डोस देखील चुकवायला देऊ नका. गावाला जाताना प्रवासातसुद्धा इंश्युलीन घ्यायचं असतं हे लक्षात असू द्या. आजारी असताना विशेषत संसर्ग झालेला असताना इंश्युलीनचा डोस वाढवावा लागतो.
हायपर ओस्मोलर नॉन किटोटिक
कोमाचा अर्थ काय?
बहुदा टाईप टू मधुमेहात हा प्रकार होतो. यात इंश्युलीन अगदीच नसतं असं नाही. थोडंतरी इंश्युलीन असल्यामुळं शरीराला उर्जेच्या पर्यायी व्यवस्थेची गरज पडत नाही. उर्जेसाठी चरबी वापरली न गेल्यानं किटोन्स बनत नाहीत. बाकी सगळी चिन्ह आणि लक्षणं सारखीच असतात. उपायही बहुतांशी सारखेच असतात. केवळ रक्तात किटोन्स अधिक आहेत की नाहीत या एकाच फरकावर दोहोंपकी एकाचं निदान होतं. रक्तातली ग्लुकोज आत्यंतिक वाढलेली असते. ती लघवीवाटे बाहेर फेकता फेकता शरीरातलं पाणी खूप कमी होतं. रक्तातल्या क्षारांमध्ये उलथा पालथ होते. यातही जीवाला धोका असतो. सुदैवानं या आजाराचं प्रमाण किटो असिडोसीस पेक्षा कमी असतं.
dr.satishnaik.mumbai@gmail.com