अमेरिकेत बरेच लोक स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी ‘िगकगो बिलोबा’ हे पूरक औषध घेतात. असे असले तरी त्यामुळे स्मृतीशी संबंधित डिमेन्शियासारख्या रोगांना अटकाव होत असल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यातच आता या पूरक औषधाने कर्करोग वाढीस लागत असल्याचे पुरावे मात्र मिळाले आहेत. अमेरिकी वैज्ञानिकांनी गिंकगो बिलोबाच्या पहिल्या विषशास्त्रीय अभ्यासाचे निष्कर्ष जाही केले असून अमेरिकेत सर्वाधिक विक्री असलेल्या या पूरक औषधाने प्रयोगशाळेत प्राण्यांना कर्करोग व नाकात गाठी झाल्याचे दिसून आले. नॅशनल टॉक्सिकॉलॉजी प्रोग्रॅमच्या सिंशिया रायडर यांनी सांगितले की, गिंकगो बिलोबाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. माणसातही त्यामुळे कर्करोग होतो हे अजून सिद्ध झालेले नाही. उंदरामध्ये त्यामुळे यकृताचा व थायरॉइडचा कर्करोग होतो. गिंकगो बिलोबा मिसळलेली पेयेही अमेरिकेत उपलब्ध आहेत. माणसात त्याचा वापर ३० ते १२० मिलीग्रॅम इतकाच केला जात असल्याने त्याचा काही अपाय होण्याची शक्यता नाही, असा दावा औषध कंपन्यांनी केला आहे.