गोड व त्यातही चिकट पदार्थामुळे दात किडतात हे खरे आहे पण आता वैज्ञानिकांनी अशी कँडी शोधली आहे जी गोडही आहे व दातांची झीजही रोखते. अर्थातच ही कँडी शर्करामुक्त असून त्यामुळे दातांच्या खोबणींमध्ये जीवाणू वाढण्याचे प्रमाण कमी होते. ‘बर्लिन बायोटेक फर्म ऑरगॅनोबॅलन्स’च्या ख्रिस्तीन लँग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कँडी तयार केली आहे. त्यात काही मृत जीवाणूंचा वापर केला असून ते दातातील जिवाणूंना जाऊन चिकटतात व दातांना कीड लागण्यापासून वाचवतात. ज्यांनी ही कँडी सेवन केली त्यांच्या दातात हानिकारक जीवाणूंचे प्रमाण कमी झाले असे ‘मेडिकल एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा जीवाणू दाताच्या पृष्ठभागास चिकटतात व त्यामुळे आम्ल तयार होऊन दाताचे इनॅमल विरघळते व त्यामुळे दात किडतात, त्यात खोबणी तयार होतात. ‘म्यूटन्स स्ट्रेप्टोकोकाय’ या जिवाणूमुळे दात किडतात. तर ‘लॅक्टोबॅसिलस पॅराकेसी’ या जीवाणूंमुळे म्यूटन्स स्ट्रेप्टोकोकाय जीवाणूंची संख्या कमी होते. परिणामी दातातील खोबणी कमी होऊन दात किडण्याची प्रक्रिया कमी होते असे संशोधकांचे मत आहे.लॅक्टोबॅसिलस पॅराकेसी जीवाणूंच्या पृष्ठभागावरील साखर म्यूटन्स स्ट्रेप्टोकोकाय जीवाणूंना बांधून ठेवते, त्यामुळे ते पुन्हा दातांना चिकटू शकत नाहीत. लँग व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्करा मुक्त कँडी तयार करताना लॅक्टोबॅसिलस पॅराकेसी हे जीवाणू मृत स्वरूपात वापरले. या कँडीचा प्रयोग ६० जणांवर केला असता तीन चतुर्थाश लोकांमध्ये म्यूटन्स स्ट्रेप्टोकॉकाय जीवाणूंचे लाळेतील प्रमाण कमी झाले. दोन मिलीग्रॅम कँडी सेवन करणाऱ्यात हे प्रमाण खूपच कमी झाले. मृत जीवाणूंचा वापर करून जिवंत जिवाणूंचा काटा काढण्याचा हा फंडा वेगळाच आहे.
‘ड’ जीवनसत्व मेंदूसाठी गरजेचे
‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असलेल्या आहारामुळे मेंदूची हानी होते असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. केंटकी विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या प्रयोगातून असे दिसून आले की, हाडांच्या आरोग्यासाठी ड जीवनसत्व आवश्यक असतेच पण ते मेंदूसह इतर अवयवांच्या ऊतींसाठीही गरजेचे असते. मध्यमवयीन उंदरांना कमी ड जीवनसत्व असलेला आहार दिला असता त्यांच्या मेंदूत मुक्त कणांची (फ्री रॅडिकल्स) निर्मिती झाली व मेंदूतील अनेक प्रथिनांची हानी झाली. त्यांच्या बोधनक्षमतेत कमतरता दिसून आली आणि त्यांची स्मृतीही कमी झाली. ड जीवनसत्वाच्या कमतरतेने मध्यमवयीन ते वयस्कर लोकांमध्ये ‘ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस’ दिसून आला, असे संशोधनातील प्रमुख अॅलन बटरफील्ड यांनी म्हटले आहे. मेंदूतील मुक्तकणांचा नाश व्हायचा नसेल तर ड जीवनसत्व आवश्यक असते त्यामुळे रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला पुरेसे ड जीवनसत्व मिळत आहे की नाही याचा अंदाज घ्यावा तसेच गरज असल्यास ड जीवनसत्व पूरक म्हणून घ्यावे. रोज १० ते १५ मिनिटे सूर्यस्नान करणे आवश्यक आहे, त्यामुळे त्वचेखाली ड जीवनसत्व तयार होते व परिणामी मेंदूचे रक्षण होण्यास मदत होते असेही ‘फ्री रॅडिकल बायॉलॉजी अँड मेडिसिन’ या नियतकालिकात म्हटले आहे.
व्यायामाने कमी होतो विसरभोळेपणा
नियमित व्यायाम केल्याने विसरभोळेपणा किंवा स्मृती कमी होण्याची शक्यता कमी होते असे पस्तीस वर्षांच्या अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. पुरेसा व्यायाम, धूम्रपान न करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, आरोग्यास पूरक आहार, कमीत कमी मद्य सेवन या पाच गोष्टींच्या आधारे विसरभोळेपणावर मात करता येऊ शकते. याचाच अर्थ रोगमुक्त जीवनशैली स्मृती चांगली ठेवण्यासाठी महत्वाची आहे. ज्यांनी त्यांच्या जीवनशैलीत असे बदल केले त्यांच्यात विसरभोळेपणाची शक्यता ६० टक्क्य़ांनी कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले.
व्यायाम केल्याने नुसता विसरभोळेपणाच नव्हे तर मधुमेह, ह्रदयविकार व पक्षाघात या रोगांवरही फायदा होतो. विसरभोळेपणा किंवा डिमेन्शिया असलेल्या लोकांचे प्रमाण २०५० मध्ये १३५ दशलक्षपर्यंत जाण्याची शक्यता आहे असे ‘अल्झायमर डिसीज इंटरनॅशनल’ या संस्थेने म्हटले आहे. कार्डिफ विद्यापीठाच्या वैद्यक शाखेचे प्रा. पीटर एलवूड यांच्या मते आपल्या जीवनशैलीत बदल केला तर डिमेन्शियावर मात करता येते. वैद्यकीय उपचारांइतकाच फायदा जीवनशैलीत बदल केल्याने होतो. वयाच्या पस्तीशीतच जीवनशैलीत चांगले बदल केले तर डिमेन्शिया १३ टक्क्य़ांनी कमी होतो तर मधुमेहाचे प्रमाण १२ टक्क्य़ांनी ह्रदयविकाराचे प्रमाण ६ टक्क्य़ांनी
कमी होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2013 रोजी प्रकाशित
दातांची झीज रोखणारी कँडी
गोड व त्यातही चिकट पदार्थामुळे दात किडतात हे खरे आहे पण आता वैज्ञानिकांनी अशी कँडी शोधली आहे जी गोडही आहे व दातांची झीजही रोखते.

First published on: 21-12-2013 at 03:50 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candy that prevents tooth decay