राजधानी दिल्लीत डेंग्यूची जोरदार साथ आली आहे. महामुंबई परिसरातही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या खासगी दवाखान्यात आणि रुग्णालयात वाढताना दिसत आहे. पाऊस जाता जाता डेंग्यूची साथ पसरते हा नेहमीचा अनुभव. खरे तर डेंग्यू हा जीवघेणा आजार नाही, डेंग्यू प्राणघातक होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे घाबरून जाण्यापेक्षा योग्य पद्धतीने उपचार करणे हाच या आजारावरील मार्ग ठरतो.
आपल्याकडे साधारणपणे डेंग्यूचे चार प्रकार आढळतात. डेंग्यू १, डेंग्यू २, डेंग्यू ३ आणि डेंग्यू ४. यापकी एक आणि तीन प्रकारातील डेंग्यू हा इतर दोघांच्या मानाने कमी घातक असतो. दोन आणि चार क्रमांकाच्या प्रकारावरही उपचार करता येतात. सध्या दिल्लीत या दोन्ही प्रकारांतील डेंग्यूची साथ पसरली आहे.
डेंग्यू ४ या प्रकारात प्लेटलेटचे प्रमाण घसरण्यास सुरुवात होते, डेंग्यू दोन या प्रकारात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्यासोबतच तापाने अंग फणफणते. या प्रकारात अवयव निकामी होऊ शकतात. अर्थातच डेंग्यू २ हा प्रकार सर्वाधिक गंभीर आहे.
डेंग्यूच्या एखाद्या प्रकारातील विषाणूमुळे आजार झाला की त्याविरोधात शरीरात पुढील आयुष्यभर प्रतिकारक्षमता तयार होते. अर्थात पुढच्या वेळी दुसऱ्या प्रकारातील विषाणूमुळे डेंग्यू होऊ शकतो. पुन्हा झालेला डेंग्यू हा अधिक गंभीर स्वरूपाचा ठरू शकतो.
एखाद्या वर्षी डेंग्यूच्या विशिष्ट विषाणूंची साथ पसरली की त्यानंतर एकूण समाजातच त्याविरोधात प्रतिकारक्षमता तयार होते व पुढच्या वर्षांमध्ये या विषाणूमुळे साथ येण्याची शक्यता अगदीच कमी असते. यापूर्वी दिल्लीत दोन आणि चार प्रकारातील डेंग्यूची साथ पसरली होती. त्यामुळे कदाचित यावेळी आणखी वेगळा विषाणू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डेंग्यूबाबत लक्षात ठेवण्यासारख्या बाबी
डेंग्यू हा उपचाराने पूर्ण बरा होतो.
डेंग्यूमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता एक टक्क्यांहून कमी रुग्णांमध्ये असते आणि योग्य निदान व उपचार केले तर एकही मृत्यू होणार नाही.
रक्तस्राव आणि प्लेटलेट्सची संख्या दहा हजारांपेक्षा खाली गेल्याशिवाय प्लेटलेट्स चढवण्याची गरज नाही.
गरज नसताना चढवलेल्या प्लेटलेट अधिक त्रासदायक ठरतात.
यंत्राद्वारे मोजल्या जाणाऱ्या प्लेटलेट्सची संख्या अचूक नसते, त्यात ४० हजापर्यंत फरक पडू शकतो.
प्लेटलेट काऊंटपेक्षा हिमॅटोक्राइट ही अधिक विश्वासार्ह चाचणी आहे. खरे तर बहुतांश वेळा उच्च व कमी रक्तदाबातील फरक पाहून निदान करता येते.
लोकांनी घाबरून जाऊ नये आणि डॉक्टरांवर रुग्णालयात दाखल करण्यासाठी दबाव आणू नये. कदाचित इतर गंभीर रुग्णांना त्यामुळे उपचारांपासून वंचित राहावे लागेल.
डेंग्यूचे बहुतेक रुग्ण तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या औषधांनी बरे होतात व त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते.
डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखीसोबत ताप हे डेंग्यूचे लक्षण आहे. ताप पाच ते सात दिवस राहतो. उपचारांनंतरही काही दिवस ते
आठवडय़ांपर्यंत अशक्तपणा राहतो. सांधेदुखी, अंगदुखी हे स्त्रियांमध्ये अधिक दिसून येतात.
ताप उतरल्यावर आजार अधिक गंभीर झाल्याचे आढळते. तापानंतरचे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात व या काळात भरपूर द्रवपदार्थ तसेच मीठ व साखरेचे पाणी पिणे आवश्यक आहे.
शरीरात रक्तस्राव झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होते. तोंडावाटे किंवा सलाईनद्वारे वेळेत द्रवपदार्थ शरीरात गेल्यास गुंतागुंत टाळता येते.
ओटीपोटात तीव्र वेदना, उलटय़ा, थकवा, तापात सतत चढउतार, रक्तस्राव, यकृताला सूज, मानसिक स्थिती बिघडल्यावरच रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज असते.
भरपूर द्रवपदार्थ हा डेंग्यूवरील उपाय आहे. तापासारख्या लक्षणावर उपचार करण्यासाठी पॅरासिटेमॉल योग्य ठरते. मात्र अॅस्पिरिन किंवा नॉनस्टिरॉइडल अॅण्टिइन्फ्लॅमेटरी औषध देणे टाळावे.
– डॉ. के. के. अग्रवाल,
सरचिटणीस, इंडियन मेडिकल असोसिएशन.