मतिमंदत्व ही फार मोठी समस्या आहे. बुद्धीची वाढ खुंटली असेल किंवा मंदावली असेल, तर मुलांच्या या अवस्थेला मतिमंदत्व म्हणतात. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. मतिमंदत्वाची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात माहिती देणारा लेख
आयुष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जी वैचारिक, निर्णय घेण्याची तसेच नियोजन करण्याची क्षमता लागते, त्याला बुद्धी म्हणतात. १८ वर्षांच्या आधी बुद्धीची वाढ खुंटली किंवा मंदावली तर त्या अवस्थेला ‘मतिमंदत्व’ म्हणतात. व्यक्तीचे कालक्रमानुसारचे वय आणि तिचा बुद्धीचा विकास या दोन्हीमधले अंतर जितके जास्त तितके मतिमंदत्वाचे प्रमाण जास्त असते. मंदबुद्धीचे प्रमाण प्रखर असले तर त्याची लक्षणे जन्मत: किंवा जन्मानंतरच्या काळातच दिसून येतात. बहुतेक वेळेला गर्भावस्थेत आईचे किंवा अर्भकाचे आरोग्य असमाधानकारक असते आणि प्रसूतीवेळी त्रास होतो. बाळाला इतर काही अपंगत्व, आजार (उदा. फिट्स) असू शकतात. बाळाचा विकास विलंबाने होत जातो. वयाप्रमाणे मुलाचे बोलणे, चालणे आणि समज विकसित होत नाही. मंदत्वाचे प्रमाण कमी असले तर मूल शाळेत सर्वसाधारणपणे जाते. पण इतर मुलांच्या मानाने त्याला जास्त शिकवावे लागते, जास्त सराव करावा लागतो आणि अभ्यास लक्षात राहत नाही. मुलांचा अभ्यास संपत नाही आणि ती मागे पडत जातात. अभ्यासात मदत म्हणून पालक मुलांसाठी शिकवणी लावतात. त्यांच्या आवडीचे खेळ, उपक्रम कमी किंवा बंद करतात. दमदाटी करून किंवा अतिलाड करून त्यांच्याकडून जास्तीतजास्त अभ्यास करून घेतात. असे केल्याने मुलाला अभ्यासाबद्दल तिटकारा निर्माण होतो आणि ती पालकांपासून दुरावतात. थोडय़ा दिवसांनंतर मुलाच्या क्षमतेपेक्षा अभ्यास वाढल्यामुळे त्याला पुन्हा अपयश येते. या स्थितीत मुलांमधील न्यूनगंड वाढीस लागतो.
कारणे काय?
प्रमाणबद्ध चाचण्यांमधून कालक्रमानुसारच्या वयाच्या तुलनेने त्याच्या बुद्धीचा विकास किती आहे हे मापले जाते आणि मुलाचा बुद्धय़ांक मोजला जातो. ७०पेक्षा कमी असले तर मंदबुद्धी असल्याचे कळून येते. ५० ते ७० मध्ये सौम्य प्रमाणाचे मतिमंदत्व तर ५०पेक्षा कमी म्हणजे प्रखर मंदत्व असे त्याचे वर्गीकरण आहे. गर्भावस्थेत, प्रसूतीच्या वेळी अथवा जन्मानंतर मेंदूला इजा होणे किंवा आनुवंशिकतेमुळे मतिमंदत्व येऊ शकते. पण बहुतेक वेळेला मंदबुद्धीचे नेमके कारण सांगणे अशक्य असते, विशेषत: सौम्य मंदतेच्या बाबतीत. तरीही पालकांच्या आणि मुलाच्या सर्व चाचण्या करणे महत्त्वाचे. यामधून कारण लक्षात आले तर पुढच्या मुलात/ पिढीत ते टाळता येते. गर्भधारणेमध्ये स्त्रीला फॉलिक अॅसिड घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मतिमंदत्वाच्या अनेक तक्रारी कमी होऊ शकतात.
काय करावे?
मंदबुद्धी असलेल्या मुलाला लवकरात लवकर आणि जमेल तितकी वष्रे सर्वसाधारण शाळेतच पाठवावे. त्याला नेमकी कशी मदत करावी याबद्दल मार्गदर्शन घेत राहावे. मुलांना स्वत:ची कामे करायला शिकवण्याकडे जास्त लक्ष द्यावे. त्याला आवडेल आणि जमेल अशा गोष्टी शिकवाव्या. सर्वाना त्याच्यासाठी तडजोड करायला सांगण्यापेक्षा इतर लोकांशी जुळवून घेण्याचे त्याला शिकवावे. नोकरी, आíथक स्थैर्य, लैंगिकता, लग्न याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन योग्य नियोजन करता येते. मंदबुद्धीमध्ये बुद्धी आपोआपच हळूहळू वाढत असते, बुद्धी वाढण्याकरिता अद्याप कुठलेही औषध निर्माण झालेले नाही. त्यामुळे त्यामागे धावू नये. बुद्धीचा जास्तीतजास्त आणि योग्य वापर करायला शिकवण्याकडे भर द्यावा.
उपचार आणि उपाय मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक सांगू शकतात. नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पालकांना सल्ला देऊन उपचार, पूजा, नवस करण्याचा हट्ट करू नये. पालकांना वेळ द्यावा, धीर द्यावा, मदत करावी आणि त्यांनी विचारले तरच सल्ला द्यावा. मुलाला मतिमंदता आहे, हे कळल्यावर पालक मनाने उद्ध्वस्त होतात. या स्थितीत बाळाच्या अपंगत्वाची किंवा त्याच्या कारणांची सारखी चर्चा करून त्यांचे दु:ख वाढवू नये. विशेषत: आई, बाबा किंवा इतर कुठल्या नातेवाईकाला जबाबदार धरून डिवचू नये. कुठलेही समारंभ झाले तर त्या बाळाला आवर्जून बोलवावे आणि आपल्या मुलांना त्याच्याशी नीट वागायला प्रवृत्त करावे.
समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि मुलाचे आरोग्य चांगले राहिले तर मतिमंद मुलाचे पालक समाधानी होऊ शकतात. मुलाची बुद्धी कमी असली तरी ते मूल योग्यरीत्या वाढू शकते. मतिमंदत्वामध्ये बुद्धीचा कमीपणा असला तरी माणुसकीचा नसतो.
डॉ. वाणी कुल्हळी -vanibk@rediffmail.com