निरोगी पेशींपासून यकृताचा कर्करोग नुकताच सुरू झालेल्या पेशी ओळखण्याची नवीन चाचणी वैज्ञानिकांनी तयार केली आहे. यात कर्करोगग्रस्त पेशी किंचित लाल-तपकिरी रंगाच्या दिसतात. निरोगी पेशी व कर्करोगग्रस्त पेशी यातील फरक ओळखणे कठीण जात असल्याने यकृताच्या कर्करोगाचे निदान अवघड बनते, असे जॉर्जिया रिजेन्टस युनिव्हर्सिटीतील मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितले. यकृताचे निदान फार लवकरच्या पातळीवर करण्यासाठी सध्या तरी कुठलीही चाचणी उपलब्ध नाही, आता हे निदान चटकन करणारी चाचणी आम्ही विकसित केली आहे. यकृताचा कर्करोग हा चोरपावलाने येतो त्यामुळे तो ओळखता येत नाही. यकृताच्या भागाचे प्रत्यारोपण किंवा कर्करोगाच्या पेशींना जाळणे हे उपाय यात असतात पण ते यशस्वी होतात असे नाही. पोटात दुखणे, वजन कमी होणे अशी लक्षणे यात दिसतात पण तोपर्यंत वेळ खूप निघून गेलेली असते. बायोजेनेक्स या कॅलिफोर्नियातील कंपनीबरोबर कोल्हे काम करीत आहेत. त्यात त्यांनी कर्करोगाच्या पेशी वेगळ्या कशा असतात याचा शोध घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक छोटे उपकरण वापरले आहे ते कर्करोगग्रस्त पेशी लाल-तपकिरी रंगात दाखवते. यात मीर २१ हा एमआरएनए ओळखला जातो, जो यकृताच्या कर्करोगात सापडतो. निरोगी पेशीत सापडत नाही. आरएनए हा प्रथिनांना नियंत्रित करतो तर मायक्रो आरएनए (एमआरएनए) तसे करीत नाही. या उपकरणामुळे मायक्रो आरएनएला रंगीत रूपात वेगळे दाखवले जाते. आतापर्यंत कर्करोग असलेल्या १० व कर्करोग नसलेल्या १० रुग्णांवर या उपकरणाचा वापर बायोप्सीत केला आहे. अजून २०० जणांवर त्याचे प्रयोग केले जाणार आहेत.

Story img Loader