मधुमेही माणसांसाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? मधुमेह कधी तरी पूर्ण बरा होण्याची शक्यता कितपत आहे?
यातल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. मुळात मधुमेह हा वयानुरूप येणारा आजार आहे. जसे माणसांचे सांधे थकतात, धावण्याची, काम करण्याची ताकद कमी होते, तशाच इन्श्युलिन बनवणाऱ्या बीटा पेशींची क्षमतादेखील मंदावत जाते. आपण आपल्या वागण्याने बीटा पेशींना वेळेआधीच म्हातारं करतो आणि मधुमेहाला निमंत्रण देतो. वय कमी करणं कुणाच्याच हातात नाही. त्यामुळं मधुमेह पूर्ण बरा होण्याची शक्यता निदान नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाही.
रुग्णाचं आयुष्य सुखकर होईल, असे अनेक शोध लवकरच येऊ घातले आहेत. जेवल्यावर अन्न पचतं, अन्नातून आलेली साखर रक्तात पोहोचू लागली की त्यानुसार नेमकं-अगदी मायक्रो युनिट इतक्या सूक्ष्म प्रमाणातसुद्धा इन्श्युलिन बनवण्याची क्षमता असते. वैद्यकाला ही पातळी अजून गाठता आलेली नाही. परंतु त्या दिशेनं दमदार पावलं मात्र उचलली जात आहेत. इन्श्युलिन पंप आता उपलब्ध झाले आहेत. सध्या ते बरेच महाग आहेत. शिवाय त्यात काही समस्या आहेत. जवळच्या भविष्यात या समस्या सुटतील, किमतीही खाली येतील अशी नक्कीच खात्री आहे. याशिवाय मधुमेहाविषयी, त्याच्या एकंदर स्वरूपाविषयी अधिकाधिक माहिती समोर येते आहे. या माहितीचा उपयोग करून नवनवी औषधं बाजारात येत आहेत. दुर्दैवानं बहुतांशी औषधं या घडीला महाग आहेत. काहींच्या किमती अवाच्या सवा आहेत. आतापर्यंतचा अनुभव पाहता त्या कमी होतील असं म्हणायला वाव आहे.

मधुमेह का होतो यावर काही संशोधन चालू आहे का?
यावर पूर्वीपासूनच संशोधन सुरू आहे. माणसाच्या जीन्सचा आलेख मांडला गेल्यावर, त्याच्या जीनोमचा पूर्ण उलगडा झाल्यापासून तर या शोधमोहिमेला अधिकच वेग आला आहे. प्रश्न हा आहे की मधुमेह कुठल्याही एका जीन्सच्या बिघाडामुळं होत नाही, अनेक जीन्सच्या गुंतागुंतीच्या गोंधळाशी त्याचा संबंध आहे. म्हणूनच या रोगाच्या मुळाशी पोचण्यात आपण पूर्ण यशस्वी झालेलो नाही. पुढच्या काळात यात निश्चितच बदल होईल. एकदा का मूळ सापडलं की मग उपचार सापडायला फार वेळ लागणार नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत तीन गटांतली अकरा बारा औषधं आधीच बाजारात आली आहेत. त्यांचा शोध लागल्यापासून फारच कमी काळात ती भारतात उपलब्ध होताना दिसताहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मधुमेह होऊ नये म्हणून एखादे औषध येण्याची कितपत शक्यता आहे?
औषध घेऊन मधुमेह न होण्याचा प्रयत्न करणं आणि औषध घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करणं यात गुणात्मक फरक तो काय? त्यापेक्षा मधुमेह न व्हावा यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं जास्त सयुक्तिक नाही का? हे बदल म्हणजे खाण्यापिण्यात काळजी घेणं किंवा नियमित शारीरिक श्रम करणं होय. यातला नियमित हा शब्द खूपच महत्त्वाचा. अनेकदा लोक बी पेरायच्या आधीच फळं मोजायचा विचार करू लागतात. अगदी लहानपणापासून त्याची सुरुवात करून पुढच्या आयुष्यात अत्यंत काटेकोरपणे ही जीवनशैली जपायला हवी. आताशा बऱ्याच लोकांना याची जाणीव व्हायला लागली आहे. त्यासाठी प्राथमिक शाळेतूनच मुलांच्या प्रबोधनाचा विचार सुरू झाला आहे. शालेय शिक्षणात लांब पल्ल्याच्या आजारांविषयी धडा असावा, मुलांना खेळांची मदाने मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत यासाठी बऱ्याच सामाजिक संस्था आग्रही आहेत. ‘स्मार्ट’ म्हणजे सोसायटी फॉर मेडिकल अवेअरनेस रिसर्च ट्रीटमेंट नावाच्या संस्थेनं लहान मुलांना एकूणच वैद्यकीय दृष्टीनं साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या कामाला यश मिळालं तर नक्कीच मधुमेह कमी होईल. फक्त या संस्थांना लोकांनी पुरेसा प्रतिसाद द्यायला हवा.

Story img Loader