मधुमेहात संसर्गाचा धोका अधिक असतो का?

या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही अशा थेट शब्दात देता येत नाही. कारण अशी अनेक मधुमेही माणसं भेटतील की ज्यांना काही लागलं तर त्यांच्या जखमा बऱ्या होण्यास फारसा वेळ लागत नाही आणि अशीही भेटतील की ज्यांच्या लहानशा जखमा उग्र रूप धारण करतात व महिनोन्महिने ठीक होत नाहीत. परंतु या विषयातल्या एकंदर संशोधनाचा धांडोळा घेतला तर सामान्य माणसांमध्ये आणि मधुमेहींमध्ये संसर्गाच्या प्रकारात व स्वरूपात खूप फरक असल्याचं दिसत नाही.
अर्थात हे विधान तसं ढोबळ आहे. कारण अगदी मधुमेहातच दिसणारे असे काही वैशिष्टय़पूर्ण संसर्ग आहेत. पुरुषांमध्ये लघवीच्या जागी कात्रे पडणं किंवा स्त्रियांमध्ये
त्या जागी कंड सुटणं हे बऱ्याचदा रक्तातली साखर बरीच वाढली असल्याचं लक्षण समजलं जातं. त्याशिवाय
एक विशिष्ट फोड, ज्याला डॉक्टर कारबंकल म्हणतात, तो सुद्धा मधुमेहातला खास संसर्ग समजला जातो. झारीसारखे अनेक छेद असलेला फोड आला की त्या व्यक्तीला मधुमेह आहेच असं समजावं इतकं त्या फोडाचं मधुमेहाशी घट्ट नातं आहे.

पण साधारण कुठले संसर्ग अधिक प्रमाणात आढळतात?

बहुधा लघवीतील संसर्ग मधुमेहात जास्त आढळतात. तेदेखील अधिकतर स्त्रियांमध्ये दिसतात. विशेष म्हणजे प्रत्यक्ष लघवीत संसर्ग असतानाही इतरवेळी दिसणारी लघवीत जळजळ होण्यासारखी लक्षणं प्रत्येक वेळी दिसतातच असंही नाही. नियंत्रणात असलेली साखर अचानक वाढलेली आढळली तर स्वतहूनच लघवी तपासून घेणं योग्य ठरतं.
मधुमेहात लघवीच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण यात आधीच मूत्रिपडावर ताण असतो. संसर्गामुळे मूत्रिपडावर जास्तच परिणाम होतो आणि प्रसंगी मूत्रिपड निकामी होण्याचा धोका असतो. शिवाय संसर्गासोबत चक्क वायू बनवणाऱ्या जंतूंचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. त्यावेळी तर जीवालाही धोका होऊ शकतो. असाच त्रास पित्ताशयालाही होऊ शकतो. तिथंही वायू निर्माण करणाऱ्या जंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
क्षयरोगाचं प्रमाण मधुमेहात थोडंसं वाढतं आणि त्यावर नियंत्रण मिळवताना दमछाक होते.
सतत झाकलेल्या राहणाऱ्या जागी दमट हवामानात फंगस किंवा बुरशीचे संसर्ग होतात. जांघ, काख अशा ठिकाणी हे संसर्ग दिसतात. खासगी जागी कंड सुटायला लागला की तो बुरशीचा संसर्ग आहे असं समजायला हरकत नाही. पुरुषांमध्ये शिश्नावरची त्वचा मागे खेचता येत नाही, जबरदस्तीने त्वचा मागे खेचायला गेल्यास वेदना होते. स्त्री-पुरुष संबंधांच्या वेळी त्रास होतो. स्त्रियांमध्येही असा कंड सुटू शकतो. बुरशी इतर ठिकाणीही संसर्ग इन्फेक्शन करू शकते. नाकात दिसणारा म्युकोर मायकोसिस असो किंवा कानाचा वाढत जाणारा संसर्ग असो मधुमेहात हे संसर्ग वाढतात एव्हढं नक्की.
याव्यतिरिक्त मधुमेह अनियंत्रित झाल्यावर अनेकदा स्नायूंमध्ये अथवा शरीरात खोलवर संसर्ग होतो. अचानक ठणका मारायला लागतो. ताप येतो. पायाचे संसर्ग मधुमेहात गंभीर रूप धारण करतात. प्रसंगी पाय कापावादेखील लागतो.

यावेळी काय केलं पाहिजे?

मुळात मधुमेहात आपल्या शरीरात अनेक ठिकाणी रोगजंतूंना पोषक वातावरण मिळतं, त्यांची जलद वाढ होते. शिवाय खूप दिवसांपासून तुम्ही मधुमेहानं ग्रासलेले असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खालावलेली असते. ज्यांची मूत्रिपड निकामी झालेली आहेत त्यांच्या बाबतीत तर ती जास्तच कमजोर असते. म्हणूनच इन्फेक्शन होऊ नये याची खास काळजी घेतली पाहिजे. पायाची स्वतच नियमित पाहणी केली पाहिजे. तिथं जराशी जखम आढळली तर त्यावर त्वरित इलाज केला पाहिजे. कधी कधी हे संसर्ग एका रात्रीत अख्ख्या पायात पसरू शकतात, अतिशय गंभीर रूप धारण करू शकतात. म्हणूनच जरासुद्धा वेळ वाया न दवडणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही संसर्गाला कमी लेखू नये. संसर्ग नियंत्रणात आणताना कित्येकदा डॉक्टर इंश्युलीन वापरतात. तसा अलिखित नियमच आहे. त्याला निष्कारण विरोध करू नये. इंश्युलीनशिवाय अनेक वेळेला क्षयरोगदेखील काबूत येत नाही. संसर्ग होऊ नये यासाठी लस घेणं चांगलं. फ्लू, न्यूमोनियाच्या लस घ्या असं डॉक्टर सांगत असतील तर ते मनावर घेणं आवश्यक आहे.

dr.satishnaik.mumbai@gmail.com

Story img Loader