‘आरोग्याचे जतन’ या मुख्य हेतूने सण-उत्सवादी योजना आपल्या चतुर पूर्वजांनी केल्या आहेत, ज्यातला एक सणांचा राजा म्हणावा असा सण म्हणजे दिवाळी! दिवाळीच्या सणाचा इतिहास पुराणकाळाच्याही मागे जाऊन पोहोचतो. उपनिषद काळामधील गृहसंस्कारातल्या ‘पार्वण, आश्वयुजी व आग्रयण’ या पाकयज्ञांचे एकीकरण आणि रूपांतर होऊन आपण ज्याला दीपावली म्हणतो, तो सण अस्तित्वात आला असावा, असे प्रसिद्ध वेदाभ्यासक ऋग्वेदी म्हणतात. या पाकयज्ञांमध्ये नवीन धान्याची खीर, नवीन भातांचे पोहे वा पोह्य़ांचा गोड पदार्थ अशी मिष्टान्ने बनवली जात. सुप्रसिद्ध जगप्रवासी आल्बेरुनीच्या ११व्या शतकातील भारतदर्शनामध्ये दिवाळीमधील उत्सवाचे वर्णन आहे, जे आपल्या दिवाळ फराळाची निदान एक हजार वर्षांची परंपरा सिद्ध करते. प्रत्यक्षात आज आपण जो फराळ बनवतो, त्या फराळामधील विविध खाद्यपदार्थाचे उल्लेख ज्या क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल आदी पाकशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये सापडतात, ते साधारण ११व्या शतकामधले रचलेले ग्रंथ आहेत. या प्राचीन ग्रंथांमध्ये दिवाळी फराळाला बनवले जाणारे जे खाद्यपदार्थ आहेत ते पुढीलप्रमाणे : अपूप(अप्पे/घारगे), शालिपूप (अनारसे), शंखपाला (शंकरपाळे), सम्पाव(सारोटी), मधुशीर्षक(खाजे), शष्कुली(करंजी), चणकपुरीका(बेसनाच्या तिखट पुऱ्या), मुद्गलड्ड (मुगाचे लाडू), सेविका(शेवया), चक्रिका(चकली) वगरे वगरे! दिवाळीचा फराळ हे त्या आहारपरंपरेचा परिपाक आहे.
सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे. दिवाळी प्रसिद्ध आहे फराळासाठी! रुचकर स्वादाचे, वेगवेगळ्या आकाराचे, विविध रंगरूपाचे एकाहून एक सरस असे जिभेला लालसावणारे फराळाचे पदार्थ हे आपल्या दिवाळसणाचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. दिवाळसण हा आश्विन महिन्यात येतो, जो निसर्गसौंदर्याच्या आविष्काराचा आणि धान्याच्या संपन्नतेचा काळ असतो. हे धान्य मिळवण्यासाठी काबाडकष्ट करावे लागणारा शेतकरी मागच्या चार महिन्यांतल्या पर्जन्यकाळामधील कृषीकार्याने थकून गेलेला असतो आणि आता त्या कष्टाचा आनंद घेण्यासाठी आतुर झालेला असतो. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही विचार करता हा विसर्गकाळ आहे, जेव्हा निसर्गात होणारे बदल शरीरबल वाढवण्यास पोषक ठरतात. वास्तवात दिवाळी हा थंडीतला सण. थंडीतले निरोगी वातावरण, त्यात धनधान्य मुबलक अशा वेळी बलवर्धन करणाऱ्या आहारसेवनाचा विचार पूर्वजांनी केला, हे स्वाभाविकच म्हणायला हवे. अन्न उपलब्ध असताना शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा हा विचार मानवाने प्राण्यांच्या निरीक्षणातूनच केला असावा. अन्न उपलब्ध आहे, तेव्हा शरीरामध्ये त्या अन्नाचा (आणि तत्जन्य चरबीचा) पुरेसा साठा करून ठेवायचा, जेणेकरून नंतर उन्हाळ्यामध्ये जेव्हा अन्नाचे दुíभक्ष्य होईल, तेव्हा त्या शरीरावर साठवलेल्या चरबीच्या साठय़ावर शरीराला गुजराण करता येईल, हा त्या अतिमात्रेमध्ये पौष्टिक अन्नसेवनाचा मूळ हेतू.
सोळाव्या शतकात जगाच्या सफरीवर निघालेले युरोपीय व्यापारी आपल्या सोबत जे पदार्थ घ्यायचे त्यातले प्रमुख पदार्थ म्हणजे रिफाईन केलेली पांढरी साखर, गव्हाचे रिफाइंड पीठ (मदा) व पॉलिश केलेला पांढरा तांदूळ. या स्वच्छ साखरेची व मऊमुलायम मद्याची संपूर्ण जगाला अशी काही भुरळ पडली की २० व्या शतकापर्यंत त्याची मुख्य बाजारपेठ बनला भारत. गेल्या संपूर्ण शतकामध्ये दर दशकागणिक गुळाची जागा घेतली साखरेने आणि तांदूळ, गहू, मूग आदी धान्यांच्या पीठाची जागा घेतली मद्याने. मदा व साखरेमुळे खाद्यपदार्थ बनवणे सोपे झाले, ते अधिक आकर्षक दिसू लागले आणि खाताना तर असे खुसखुशीत की जीभ एकदम तृप्त. मात्र चार इंच जीभ ही पाच फूट देहाला नेहमीच अडचणीत आणते. आज आपल्या घराघरांतून स्थूलत्त्वजन्य आजार वाढले आहेत. त्यामागे इतर कारणे असली तरी मागील तीन-चार दशकांमध्ये आपल्या म्हणजे समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह-हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्त्व आदी विकारांमागे साखर व मदा हे एक महत्त्वाचे कारण आहे, असे अनेक संशोधक सांगत आहेत. मदा आणि साखर यांमुळे होणारा आरोग्याचा घात कमी होता म्हणून की काय, त्यात पुन्हा आपण गेल्या काही वर्षांमध्ये माव्याच्या मिठाया दिवाळीला खाऊ लागलो आहोत. जो मावा चार-पाचशे जोरबठका मारणाऱ्यांनी खावा, ही अपेक्षा, तिथे घरीदारी एकाच जागेवर बसून राहाणाऱ्यांना तो मावा कसा काय पचणार? गंमत म्हणजे ‘मला मावा पचतो’ असं ज्यांना वाटतं त्यांनासुद्धा पुढे जाऊन तो मावा मधुमेह-हृदयरोग-स्थुलत्त्व आदी रोगांना आमंत्रण देतोच.
दिवाळीआधीचे शेतीचे कष्ट-परिश्रम, केवळ थंडीमध्ये अन्नाची मुबलक उपलब्धी, ग्रीष्म-वर्षां या ऋतूंमध्ये अन्नाचे दुíभक्ष्य आदी गोष्टी  २१व्या शतकामध्ये आपल्याला लागू होतात का? अन्नाचा सुकाळ नाही, अशी परिस्थिती येणार आहे का? अन्नाशिवाय राहावे लागणार नसेल तर कशाला हवा एवढा पौष्टिक आहार?  मग एवढय़ा अतिमात्रेमध्ये, इतक्या अधिक ऊर्जेने ठासून भरलेला पौष्टिक आहार काय करेल? निश्चितच आजारांना आमंत्रण देईल! त्यामुळे साखर-मदा-मावा या अनारोग्यकर पदार्थानी बनलेल्या खाद्यपदार्थाची आपल्याला गरज आहे का, याचा विचार गंभीरतेने करण्याची वेळ आली आहे. थंड हवामानामध्ये पौष्टिक खाणे योग्य म्हणावे तर हल्ली दिवाळीमध्ये थंडी असते कुठे? दिवाळीच्या दिवसांमध्ये तर चक्क उकाडा असतो. उष्म्याच्या दिवसांमध्ये कशाला हवा हा तळलेला-गोडधोड-पचायला जड असा आहार? पृथ्वीच्या कालचक्रामध्ये बदल होत आहे, मग आपणसुद्धा आपल्या आहारामध्ये बदल नको का करायला? मग ते बदल सण-उत्सवाशी संबंधित असले तरी ते करणे भाग आहे.
मैद्याशिवाय फराळ!
 २१व्या शतकात स्थूलत्त्व आणि तत्संबधित आजार ही भारतासमोरील सर्वात गंभीर आरोग्य समस्या होणार आहे. या समस्येचे निराकरण करायचे तर सर्वगामी बदल करावे लागतील. आरोग्याला पोषक असा दिवाळी फराळ बनवायचा तर तो मद्याशिवाय बनला पाहिजे. मद्याऐवजी तांदूळ, नाचणी, गहू, मूग आदी धान्यांचा वापर करा. साखर तर अजिबात नको, त्याऐवजी अर्थातच गुळाचा वापर करा. तळलेले पदार्थसुद्धा नकोच आणि महत्त्वाचे म्हणजे हा फराळ कष्ट-परिश्रम करणाऱ्यांसाठी आहे, हे विसरू नका. मुळात आपल्याला परिश्रम होत नाहीत. त्यामुळे ज्यांना व्यायाम होत नाही, ज्यांना कष्ट-परिश्रम करावे लागत नाहीत, जे  दिवसभरातून एक हजार पावलंसुद्धा चालत नाहीत, त्यांनी पौष्टिक दिवाळफराळ खाऊ नये. ‘आरोग्यदायी दिवाळीच्या अनेक शुभेच्छा.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा