फळांच्या गरात फायबरचे प्रमाण चांगले असते. तसेच ‘ए’, ‘बी’, ‘सी’ ‘ई’ आणि ‘के’ ही जीवनसत्वे आणि खनिजेही फळांमधून मिळतात. पण या गराबरोबर सालीचे असलेले महत्व अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. झाडावर लगडलेल्या फळांच्या सालीत सूर्यकिरणांमुळे वेगवेगळी पिगमेंटस् तयार होत असतात. या नैसर्गिक पिगमेंटस्मुळे फळांना त्यांचे विशिष्ट रंगही प्राप्त होतात. ‘कॅरोटिनॉइड’ आणि ‘फ्लॅवेनॉइड’ या नावांची ही पिगमेंटस् फळांचे संरक्षण करतात. ते फळ खाल्ल्यावर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कामही ही पिगमेंटस् करत असतात. फळ खाल्ल्यावर त्यातली कॅरोटिनाईडस् शरीरात जाऊन ‘ए’ जीवनसत्वात परिवर्तित होतात. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ए जीवनसत्व मदत करते. फ्लॅव्हेनॉईडस्ही रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्यामुळे दमा किंवा हृदयविकारासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ती फायदेशीरच ठरतात. फळांच्या सालीत फायबर म्हणजे तंतूमय पदार्थही पुष्कळ असतात. संत्र्याच्या वरची साल काढून टाकल्यावर आतले पांढरे सालही आपण सोलून खातो. पण या पांढऱ्या सालीत भरपूर फ्लॅव्हेनॉइडस् आणि फायबर असतात, तर आतल्या रसदार गरात सी जीवनसत्वे असतात. त्यामुळे ज्या फळांची साले खाण्याजोगी आहेत ती फळे जरूर सालासकटच खाल्लेली चांगली. सफरचंद आणि पेर ही फळे सालासकटच खावीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा