अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मांस यात असलेली अमायनो आम्ले ही मेंदूच्या वाढीस आवश्यक असतात असे वैज्ञानिकांचे मत आहे. आतापर्यंत नैसर्गिक रीत्या तयार होत असलेले अॅस्परागाइन हे अनावश्यक मानले जात होते. माँट्रियल विद्यापीठातील संशोधकांच्या मते मेंदूचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी अॅस्परागाइनचे संश्लेषण महत्त्वाचे असते, त्याचा मेंदूतील पेशींच्या वाढीसाठी फायदा होत असतो. शरीरातील पेशी अॅस्परागाइनशिवाय चालवून घेऊ शकतात कारण त्यांना आहारातून ते मिळत असते पण काही अवरोधांमुळे ते मेंदूपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मेंदूचा विकास नीट होत नाही, असे डॉ. जॅकस मिशॉद यांचे मत आहे. एप्रिल २००९ मध्ये एका कुटुंबातील मुलगा वयाच्या पहिल्या वर्षांतच मरण पावला, त्या कुटुंबात सेरेब्रल अॅट्रोफी, मायक्रोएफॅली यामुळे वारलेला तो तिसरा बालक होता, त्या मुलांच्या मृत्यूचे कारण शोधताना मिशॉद यांनी मेंदूचा विकास न होण्यास अॅस्पेरागाइन सिंथेज या विकराच्या उत्परिवर्तन संकेतावलीत बदल झाल्याने हे घडून आल्याचे स्पष्ट केले. या उत्परिवर्तनाने अॅस्परागाइन या अमायनो आम्लाचे संश्लेषण नीट होत नाही असे दिसून आले. आरोग्यवान व्यक्तीत अॅस्परागाइन सिंथेजची पातळी पुरेशी असते, त्यामुळे न्यूरॉन्स म्हणजे मेंदूतील पेशींना त्याचा पुरवठा होत राहतो. ज्या मुलांच्या मेंदूचा विकास होत नाही त्यांच्यात ते पुरेशा प्रमाणात तयार होत नाही, त्यामुळे मेंदूतील पेशी मरू लागतात असे मिशॉद यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा