आपल्याकडे विविध निमित्तांनी केल्या जाणाऱ्या उपवासाला महत्त्व आहे. त्याने मनास शांती लाभते हेही खरे आहे. उपवास आरोग्यास हितकारक आहे हे ढोबळमानाने माहित असले तरी त्याची वैद्यकीयदृष्टय़ा पुष्टी मिळाली नव्हती. १९३० च्या दरम्यान शास्त्रज्ञांच्या एका गटाने उंदरावर एक प्रयोग केला होता. या ‘प्रयोगात काही उंदरांना दररोजचा आहार कमी देण्यात आला. त्यामुळे त्यांचे आयुष्य वाढले.
तसेच म्हातारपणी कॅन्सर किंवा दुसरे रोग होण्याचे प्रमाणही त्यांच्यात कमी झाल्याचे दिसून आले. परंतु ज्या उंदरांना अधिक आहार देण्यात आला होता त्यांचे आयुष्यमान कमी झाले. ते इतर रोगांना बळी पडण्याची शक्यताही वाढल्याचे आढळले. १९४५ मध्ये शिकागो विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका गटाने उंदरांना एकाआड एक दिवस उपवास घडवला. त्या उंदरांचे आयुष्यही वाढल्याचे आढळले. नंतरच्या दशकात आयुष्यवृद्धी होण्यासाठी आहारात कोणते बदल करणे आवश्यक आहे यावर वेगवेगळ्या ठिकाणी बरेच संशोधन करण्यात आले.
 एका अभ्यासात उंदीर आणि खारी यांना एक दिवस अधिक अन्न देण्यात आले आणि नंतरच्या दिवशी उपाशी ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना सरासरी कमी कॅलरी पोहचत असत. त्यांच्या आहारातही कॅलरी कमी ठेवण्यात आल्या होत्या. डाएट केल्याने जो फायदा मिळतो तोच फायदा आठवडय़ातून एक किंवा दोन वेळा उपवास केल्याने मिळतो असे दिसले. असे असले तरी अती कमी कॅलरीचे सेवन करणे सर्वानाच दीर्घायुषी होण्यासाठी उपयोगी पडेल असे नाही. पण उपलब्ध माहितीच्या आधारे आपण असे नक्कीच म्हणू शकतो की गरजेइतकेच अन्नाचे सेवन केल्यास म्हातारपणी आजारांना बळी पडण्याचे प्रमाण बरेच कमी होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहून आयुर्मान वाढते.
एक शास्त्रज्ञ मॅटसन आणि त्यांच्या चमूने आठवडय़ाला एक दिवस उपवास केल्याने मेंदूचे विकार होण्याची शक्यता कमी होते हे दाखवून दिले. ताणतणावामुळे न्यूरॉन खराब होऊ शकतात. त्यांना संरक्षित करण्याचे काम या उपवासाने होते. परिणामी न्यूरॉन्सचा ऱ्हास होण्याचे प्रमाण कमी होते.
हे निष्कर्ष उंदीर आणि खारी यांच्याबाबतीत लागू होत असल्याचे दिसले. अलीकडे त्यांच्या संशोधनातून उंदरांना एकाआड एक दिवस अन्न दिले तर त्यांचा मेंदू विषारी द्रव्यांना प्रतिकार करतो असे आढळले.
२००३ मध्ये उंदरांवरच आणखी एक प्रयोग करण्यात आला होता. त्यात उंदराला सातत्याने उपाशी ठेवण्यात आले. त्यामुळे सुरूवातीला त्याचे आरोग्य चांगले राहिले. पण नंतर त्याच्या रक्तातील इन्शुलिन आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले. उपवासाचा परिणाम इन्शुलिन स्त्रवण्यावर होत असतो. इन्शुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. इन्शुलिन स्त्रवण्याचा परिणाम लठ्ठपणावर होतो. मधुमेह आणि हृदयरोगाला इन्शुलिनच्या स्त्रवणातील बदल कारणीभूत ठरू शकतो.
उपवासाचे फायदे पडताळून पाहण्यासाठी केल्या गेलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये दीर्घकालीन उपवासाचे म्हणावे असे फायदे शास्त्रज्ञांना आढळून आले नाहीत. पण उपवास केल्याने काही प्रमाणात आरोग्य चांगले राहते हे मात्र विविध हे मात्र विविध अभ्यासांच्या निष्कर्षांवरून नक्कीच नाकारता येत नाही.