काय खाल्याने माझा मधुमेह आटोक्यात राहील?
या प्रश्नाचं थेट आणि नेमकं उत्तर देणं खूपच अवघड आहे. मी असं म्हणण्याची अनेक कारणं आहेत. खाण्याच्या बाबतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. तो रोज सकाळी उठून प्रथम आपलं अन्न शोधायची वणवण करत नाही. त्याचं सगळं आयतं असतं. दुसरं म्हणजे तो अन्न शिजवून खातो. जगातल्या इतर यच्चयावत प्राण्यांना निसर्गात जसं उपलब्ध आहे तसं कच्चंच खावं लागतं. तिसरा महत्वाचा फरक म्हणजे जिभेचे चोचले पुरवायला फक्त माणूसच तेल, मसाले, मीठ, साखर वापरतो. या पाश्र्वभूमीवर नेमकं विधान करायचं हे कठीणच होईल. एक उदाहरण ही गोष्ट एकदम स्पष्ट करील. मेथी ही पाल्याची भाजी मधुमेहाला नक्कीच चांगली. पण एखाद्यानं मलई मेथी मटार बनवून ती खाल्ली तर? थोडक्यात सांगायचं झालं तर केवळ काय खायचं हा प्रश्न मधुमेहाच्या बाबतीत पोकळ ठरतो. रुग्णाने किती खाल्लं, कोणत्या वेळी खाल्लं, कुठल्या पद्धतीत ते शिजवलं आणि शिजवत असताना त्यात काय व किती गोष्टी घातल्या हेसुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. शिवाय प्रत्येक मधुमेही माणसाची अन्न पचवायची क्षमतादेखील वेगवेगळी असते. प्रत्येक माणसाला एकाच वयात एकाच वेळी मधुमेह झालेला नसतो. मधुमेहाचा पचन संस्थेवरही परिणाम झालेला असू शकतो. मधुमेह जेवढा जुना तेवढा त्यानं शरीरातल्या इंद्रियांवर उत्पात केला असण्याची शक्यता अधिक. म्हणून काल परवा मधुमेही बनलेली व्यक्ती आणि वीस पंचवीस वर्षांपासून त्याच्याशी झुंजणारा माणूस हे समान पातळीवर कसे असतील? पुन्हा माणसागणिक रक्तातली ग्लुकोज वाढण्याची वेळ कमी जास्त होते. इतकी अवधानं पाळून मधुमेहात काय खायचं याचं ढोबळ उत्तर देणं मुश्किल आहे.
मी कारल्याचा रस घेतो, सकाळी कडूिनब खातो, हे चांगलं का?
कडू हे गोडाच्या विरुद्ध असावं या गरसमजातून असा विचार तुमच्या मनात डोकावू शकतो. प्रत्यक्ष पाहायला गेलं तर चव ही जीभेपुरती मर्यादित आहे. घास गळयाखाली उतरला की याला कुठलाच अर्थ उरत नाही. शिवाय या विषयाचा नीट अभ्यास होत नाही. झाडा-झाडा मध्ये फरक असतो. उदाहरणार्थ हापूस आंबा आणि तोतापुरी आंबा किती वेगळे आहेत. यातली नेमकी कोणती जात फायदेशीर हे ठरवणं महत्वाचं नाही का? त्यामुळं आताच्या अपुऱ्या शास्त्रीय माहितीच्या आधारावर कुठलाही सल्ला देणं उचित होणार नाही. नाही म्हणायला मेथी बियांचा बराच अभ्यास झाला आहे. त्याचा नक्कीच फायदा होतो असं दिसून आलं आहे. थोडं अधिक संशोधन या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकेल.
याचा अर्थ आहाराचा सल्ला देताच येणार नाही का?
असं नाही. मधुमेहाचा खाण्याशी जवळचा संबंध असल्यानं आहाराचा सल्ला द्यावाच लागणार. फक्त तो देत असताना रुग्णाची आणि औषधांची सांगड घालावी लागते. रुग्ण काय खातो, कधी खातो, रुग्ण किती शिकलाय, आम्ही सांगतो ते समजून घेण्याची त्यांची कितपत तयारी आहे, स्वतच्या उपचाराविषयी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सामील व्हायला तो तयार आहे का अशा अनेक गोष्टींची चाचपणी आम्ही करतो. त्यानुसार काय खायचं याबद्दल रुग्णाला माहिती देतो. मग ही माहिती कोण देणार हे ठरतं. आहारतज्ज्ञ (डायेटिशियन) सर्वात विस्तृत माहिती देते. तुमची आहाराची पद्धत, नेहमीचा आहार, आवडीनिवडी, रुग्णाला वजन कमी करण्याची गरज आहे किंवा कसे, मधुमेहासोबत दुसरा कुठला आजार आहे का, त्यासाठी कोणतं पथ्य असावं अशा अनेक बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देऊन ती आहाराचा तक्ता बनवते. परंतु अनेक जण ही सेवा नाकारतात. कारण त्यासाठी पसे मोजावे लागतात. दुसरा मार्ग असतो डायबेटिक नर्स एज्यूकेटरचा. ती तुम्हाला औषध कसं घ्यायचं. पायाची काय काळजी घ्यायची, स्वतची ग्लुकोज कशी तपासायची याबद्दल सांगताना खाण्याबद्दल माहिती देते. तिला रुग्णाला बरंच काही समजावायचं असतं. त्यामुळं इतर माहितीसोबत खाण्याचं थोडंबहुत ज्ञान ती देते. अनेक क्लिनिक्समध्ये ही सेवा फुकट असते. काही क्लिनिक्स मात्र त्यासाठी थोडासा आकार घेतात. ज्यांना हेदेखील परवडत नाही त्यांना समजावून सांगायचं काम स्वत डॉक्टर करतात. त्यांच्या वेळेचं गणित व्यस्त असलं तर जुजबी माहिती देऊन पेशंटची बोळवण करण्यात येते. पेशंटला नुसता सल्ला देण्याचे दिवस आता गेले. पेशंटच्या गरजा आणि त्यांच्या मनातले विचार उपचारात सामावून घेण्याचा विचार आता बळावतो आहे. त्यानुसार प्रत्येक मधुमेहतज्ज्ञ रुग्णाला विचारून त्याला उपचाराचा भाग बनवून घेतो.
तुम्ही सोपा सल्ला काय द्याल?
अगदीच थोडक्यात बोलायचं झालं तर थोडं खा, वेळेवर खा, ताजं खा आणि भरपूर भाज्या व फळं खा अशी चार सूत्र तुमच्यासमोर ठेवता येतील. आपण पिष्टमय पदार्थ खूप खातो. त्यावर थोडं नियंत्रण असलेलं बरं. ढेकर दिला म्हणजे पोट नीट भरलं ही संकल्पना कालबाह्य़ करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. वजन नियंत्रणात राहील असा आहार घेतलात की झालं. एकप्रकारे तुम्हाला अर्धपोटी जेवणावरून उठावं लागेल असा काहीसा विचार हळूहळू जोर धरतो आहे.