काय खाल्याने माझा मधुमेह आटोक्यात राहील?
या प्रश्नाचं थेट आणि नेमकं उत्तर देणं खूपच अवघड आहे. मी असं म्हणण्याची अनेक कारणं आहेत. खाण्याच्या बाबतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. तो रोज सकाळी उठून प्रथम आपलं अन्न शोधायची वणवण करत नाही. त्याचं सगळं आयतं असतं. दुसरं म्हणजे तो अन्न शिजवून खातो. जगातल्या इतर यच्चयावत प्राण्यांना निसर्गात जसं उपलब्ध आहे तसं कच्चंच खावं लागतं. तिसरा महत्वाचा फरक म्हणजे जिभेचे चोचले पुरवायला फक्त माणूसच तेल, मसाले, मीठ, साखर वापरतो. या पाश्र्वभूमीवर नेमकं विधान करायचं हे कठीणच होईल. एक उदाहरण ही गोष्ट एकदम स्पष्ट करील. मेथी ही पाल्याची भाजी मधुमेहाला नक्कीच चांगली. पण एखाद्यानं मलई मेथी मटार बनवून ती खाल्ली तर? थोडक्यात सांगायचं झालं तर केवळ काय खायचं हा प्रश्न मधुमेहाच्या बाबतीत पोकळ ठरतो. रुग्णाने किती खाल्लं, कोणत्या वेळी खाल्लं, कुठल्या पद्धतीत ते शिजवलं आणि शिजवत असताना त्यात काय व किती गोष्टी घातल्या हेसुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. शिवाय प्रत्येक मधुमेही माणसाची अन्न पचवायची क्षमतादेखील वेगवेगळी असते. प्रत्येक माणसाला एकाच वयात एकाच वेळी मधुमेह झालेला नसतो. मधुमेहाचा पचन संस्थेवरही परिणाम झालेला असू शकतो. मधुमेह जेवढा जुना तेवढा त्यानं शरीरातल्या इंद्रियांवर उत्पात केला असण्याची शक्यता अधिक. म्हणून काल परवा मधुमेही बनलेली व्यक्ती आणि वीस पंचवीस वर्षांपासून त्याच्याशी झुंजणारा माणूस हे समान पातळीवर कसे असतील? पुन्हा माणसागणिक रक्तातली ग्लुकोज वाढण्याची वेळ कमी जास्त होते. इतकी अवधानं पाळून मधुमेहात काय खायचं याचं ढोबळ उत्तर देणं मुश्किल आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा