बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जीवनमान बदलले आहे. त्याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना?

हल्ली बऱ्याचदा असे रुग्ण येतात की ज्यांनी इतर कोणत्या तरी कारणांसाठी पोटाची सोनोग्राफी केली असताना त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असे निदान केले गेलेले असते. म्हणूनच आपण हे खडे का व कसे तयार होतात, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो, हे टाळता येणे शक्य आहे का व त्यावर काय उपाय उपलब्ध आहेत हे समजावून घेऊ या.
पित्ताशयात खडे का होतात?
आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नामक एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते, जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडणे. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान आतडय़ात सोडला जातो. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण (Oily food) जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं (fibre) प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. हे खडे तीन प्रकारचे असतात
१. कोलेस्टेरोल (Cholesterol)
२. पिगमेंट pigment (बिलिरुबीनचे घटक)
३. मिश्र.
७०-८० टक्केरुग्णांमध्ये ते मिश्र असतात. अगदी लहान खडे पित्तनलिकेवाटे पित्तरसाबरोबर लहान आतडय़ात निघून जातात. पण त्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात व पित्ताशयाला सूज येऊन जंतूचा प्रादुर्भाव होतो.
हा त्रास कुणाला होऊ शकतो?
वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, फीमेल ऑफ फोर्टी म्हणजे स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे शिकवले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. पाश्चात्त्य देशात व उत्तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन दशकांत भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हे खडे सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळतात.
हा त्रास कसा ओळखावा?
सुरुवातीची लक्षणे अ‍ॅसिडिटीच्या त्रासासारखीच असतात. सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅसेस होतात. मळमळ सुटते, जळजळ होऊ लागते, त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडय़ात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृत (लिव्हर)मध्ये साचू लागतो त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ (Obstructive Jaundice) असे म्हणतात. पित्तखडय़ांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते. पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंडदाहही होऊ शकतो.
पित्ताशयातील खडय़ाचे निदान
सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी व एण्डोस्कोपी करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इत्यादी गोष्टींविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.
उपाय
एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ती तज्ज्ञ, अनुभवी सर्जनकडून करणे. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फारशी गुंतागुंत निर्माण होत नाही व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यामध्ये खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकतात. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित प्रमाणात येत राहतो.
जर एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, दुर्बिणीद्वारे एक छोटेसे छेद करून पित्तनलिकेतील खडे काढता येतात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित ठरते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतडय़ास जोडली जाते.
टाळण्यासाठी काय करावे?
१) जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.
२) तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.
३) जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.
४) चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.
५) रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.
खडे विरघळण्यासाठी औषधे ?
पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध आहेत खरी, पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात. बरीच खर्चीक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत, असे सांगता येत नाही.
त्रास न होणारे खडे (Silent or asymptomatic stones)
पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७०-८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खडय़ांना सायलेंट खडे म्हणतात. जर खडय़ांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून ते काढावेत हे गरजेचे नाही. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे. सोनोग्राफीच्या रिपोर्टने घाबरून न जाता जर खडय़ामुळे त्रास होत असेल तरच त्यावर शस्त्रक्रियेची गरज असते.
डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com

GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ
Sant Nivruttinath yatra utsav Trimbakeshwar nashik district
त्र्यंबकेश्वरात उद्यापासून संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव
Chemical container accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनरचा अपघात
Story img Loader