अल्झायमर म्हणजे स्मृतीभ्रंशास कारणीभूत ठरणारा जनुकीय घटक शोधण्यात यश आले असून त्यामुळे हा रोग होण्याची शक्यता आधीच लक्षात येणार आहे. सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेच्या संशोधकांनी हा जनुकीय घटक शोधण्यात यश मिळविले आहे. एखाद्या व्यक्तीला स्मृतीभ्रंश होतो तेव्हा तिच्या मेंदूत ताऊ प्रथिन सापडते. त्याच्याशी निगडित असे हे जनुकीय घटक आहेत. अ‍ॅलिसन एम. गोट व एस. लुडविग यांनी मेंदूतील द्रवात असणारे ताऊ प्रथिनाचे प्रमाण मोजले तसेच त्याचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत असलेली अनेक जनुकेही त्यांना सापडली आहेत. यातील किमान तीन जनुके ही ‘अमायलॉइड बिटा’वर परिणाम करीत नाहीत. याचा अर्थ त्यांचा मेंदूवर परिणाम करण्याचा मार्ग वेगळा आहे. ‘एपीओइ’हे जनुक स्मृतीभ्रंशास कारण ठरते. परंतु त्याचा संबंध मात्र ‘अमायलॉइड बिटा’शी आहे. या जनुकामुळे ताऊ प्रथिनाचे प्रमाण वाढते. हे जनुक एकापेक्षा जास्त मार्गानी मेंदूच्या कार्यावर परिणाम करते. ‘ताऊ’ प्रथिनाचे प्रमाण वाढल्याने डिमेन्शियाचे अनेक प्रकार उद्भवतात. कालरेस क्रचगा या संशोधिकेच्या मते अमायलॉइडचे थर हे अल्झायमर म्हणजे स्मृतीभ्रंशाचे मुख्य कारण आहे. काही व्यक्तींमध्ये अमायलॉइड बिटाचे प्रमाण जास्त असूनही त्यांना अल्झायमर होत नाही. याचे कारण समजले नसले तरी त्या व्यक्तींमध्ये ताऊ प्रथिनाचे प्रमाण वाढत नसावे. असा अंदाज आहे. ‘ताऊ’ प्रथिनास अटकाव करणारी औषधे तयार केल्यास अल्झायमरची वाढ रोखता येऊ शकते.