मधुमेही रुग्णाच्या रोजच्या जगण्यात या आजारामुळे अनेक चढउतार होत असतात. नुसते रुग्णाचेच नव्हे तर त्याच्या घरच्या मंडळींचे जीवनही मधुमेहामुळे अस्वस्थ होऊन जाते. पण म्हणून या रुग्णांनी सगळ्या आशाच सोडून द्याव्यात का? ‘त्याला’ किंवा ‘तिला’ भरभरून जगताच येणार नाही का? असे मुळीच नाही! मधुमेही व्यक्तीही मधुमेह नसलेल्या व्यक्तींइतकेच आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगू शकते. त्यासाठीच्या या काही टिप्स –
टाईप २ मधुमेह ही आता जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या झाली आहे. वेगाने होत जाणारे शहरीकरण, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारा बदल, शरीराची कमी झालेली हालचाल आणि मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या जनुकांचे प्राबल्य यामुळे भारतात आणि एकूणच आशियाई देशांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सतत वाढते आहे.
टाईप १ किंवा टाईप २ मधुमेहात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार, त्यातून मिळणारे पोषण आणि शरीराची हालचाल या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. मात्र बहुसंख्य रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात किंवा ते आहाराविहाराबाबतच्या चुकीच्या संकल्पना बाळगून असतात. मधुमेही व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची अजिबात गरज नसते. उलट या रुग्णांना गृहित धरून बनवलेले खाद्यपदार्थ घरातील इतरांनीही खाल्ले तर त्यांचे आरोग्य अधिक चांगले होण्यात मदत होते. मधुमेहींनी गोड आणि तळलेले पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याने, तेही क्वचित आणि अल्प प्रमाणात खावेत. भरपूर फळे, भाज्या, गव्हाची आणि मिश्रधान्यांची चपाती, डाळ यांचा आहारात अवश्य समावेश करावा. अर्थात आंबा, चिकू, द्राक्षे, सीताफळ अशी खूप गोड फळे, बटाटा आणि सुरण यांसारखे पिष्टमय कंद मधुमेहींनी कमीत कमी खावे. तेव्हा काय खावे आणि काय टाळावे याविषयी या रुग्णांनी आपल्या डॉक्टरांशी विस्तृत चर्चा करणे आवश्यक आहे. आज माणसाच्या खाण्यापिण्यात साखरेचा जेवढा वापर होतो तेवढा पूर्वीच्या काळी नक्कीच होत नव्हता. त्यामुळे अतिरिक्त साखर टाळण्याचे दु:ख का बरे मानून घ्यावे! ‘आज खाऊ मिठाई’, ‘एवढय़ाने काय होते’, असा मोह तर नकोच!     
मधुमेही व्यक्तींना स्नायू मजबूत होण्यासाठीचे आणि लवचिकतेसाठीचे व्यायाम , एरोबिक्स असे तीनही प्रकारचे व्यायाम फायदेशीर ठरू शकतात. पण ज्या रुग्णांना मधुमेहाबरोबरच हृदय, फुफ्फुसे आणि किडनीशी संबंधित आजारही असतात त्यांनी व्यायामापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी धावणे, पोहणे, नाचणे, बॅडमिंटनसारखे खेळ खेळणे, जिममध्ये जाऊन वर्कआऊट करणे असे व्यायाम करावेत. पण चालण्याचा साधा व्यायामही या व्यायामांइतकाच उपयुक्त ठरतो आणि तो करण्यासाठी खर्चही येत नाही. एकाच प्रकारचा व्यायाम केल्यानेही त्याचा कंटाळा येतो. अशा वेळी व्यायामात बदल करावा. ग्रुपने मिळून व्यायाम केला तर ते नियमित करण्यासाठी आपोआपच प्रोत्साहन मिळते. एकाच वेळी व्यायामासाठी फार वेळ देणे शक्य नसले तर दिवसात दोन- तीन वेळा अशी वीस- वीस मिनिटे व्यायामासाठी काढावीत. महत्त्वाचे म्हणजे हे व्यायाम रडतखडत, करायचे म्हणून न करता ते मजा घेत करणे आवश्यक आहे.
मधुमेहावर तोंडावाटे घ्यायची सहा प्रकारची औषधे वापरली जातात. इन्शुलिन मात्र इंजेक्शनवाटेच घ्यावे लागते. ही इंजेक्शने साधारणपणे सूक्ष्म सुयांद्वारे किंवा इंजेक्शन टोचण्याच्या पेनासारख्या दिसणाऱ्या साधनाद्वारे घेतली जातात. या पेनांद्वारे इंजेक्शने घेणे जवळजवळ वेदनारहित असते. इन्शुलिन घेण्याविषयी रुग्णांमध्ये अनेक गैरसमज असल्याने ती वापरण्यास काही रुग्ण तयार नसतात. आपल्या सर्व समज-गैरसमजांविषयी डॉक्टरांशी बोलून ते स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे. इन्शुलिन पंप वापरल्यामुळे तर रुग्णाचे रोजचे जीवन खूपच सुकर झाल्याचे दिसते.
मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्यांचा सल्ला ऐकणे आवश्यक आहे. डॉक्टरांची प्रत्येक चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) एका फाईलमध्ये लावून स्वत:कडे जपून ठेवावी. डॉक्टरांची भेट घ्यायला जाताना ही फाईल बरोबर न्यावी. डॉक्टरांबरोबरचे रुग्णाचे विश्वासाचे नाते रुग्णाच्या मनातील भीती दूर करते. डॉक्टरांना न विचारता स्वत:हूनच औषधे घेणे बंद करणे, औषधांत आपणहूनच बदल करणे, सतत डॉक्टर बदलणे या गोष्टी टाळाव्यात. रोज नवीन डॉक्टरांकडे गेल्यामुळे आरोग्य सुधारेल असे नाही. उलट नवीन डॉक्टरांना रुग्णांची पूर्ण परिस्थिती माहीत करून घेण्यास वेळ लागतो. त्यामुळे सतत डॉक्टर बदलणे घातक ठरू शकते. आपल्या मनाने केमिस्टकडून औषधे आणणे अगदी चूक. मधुमेहींनी तर ते टाळावेच. आपल्या किडन्या आणि हृदय हे दोन अवयव खूप संवेदनशील असतात हे नेहमी लक्षात ठेवावे.
मधुमेही व्यक्तींनी आजाराबाबतची आपली माहिती वाचनाद्वारे वाढविणे गरजेचे आहे. आजारातील गुंतागुतीची स्थिती टाळण्यासाठी या गोष्टीचा फार उपयोग होतो. मात्र या वाचनाचा स्रोत अधिकृत हवा. त्या अफवा किंवा दंतकथा नकोत. इंजेक्शने कशी घ्यायची इथपासून ‘हायपोग्लायसेमिया’ अर्थात रक्तातील साखर कमी होणे म्हणजे काय, इथपर्यंतची माहिती रुग्णाला हवी.
मधुमेही रुग्णांना रक्तातील साखरेच्या म्हणजेच ग्लुकोजच्या पातळीवर सतत लक्ष ठेवून राहावे लागते. किडनीचे आणि हृदयाचे कार्य तपासणे, कोलेस्टेरॉल तपासणे या गोष्टी मधुमेहींसाठी आवश्यक असतात. रुग्णांनी थोडे अधिक धैर्य दाखवून ‘ग्लुकोमीटर’च्या साहाय्याने घरच्या घरीच रक्तातील साखरेची तपासणी करणे शिकून घ्यावे. ही उपकरणे सहज आणि रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध असतात. या लहानशा उपकरणामुळे मधुमेहींच्या जीवनाच्या गुणवत्तेत नक्कीच सकारात्मक बदल होतो.
यानंतर मुद्दा येतो मानसिक आरोग्याचा. आपण निरोगी आहोत ही जाणीव मनापासून येणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना या आजाराबरोबर जुळवून घेताना अनेकदा नैराश्य येते. त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या, मित्रमैत्रिणींच्या, सहकाऱ्यांच्या आधाराची गरज असते.
आध्यात्मिक आरोग्यही महत्त्वाचे. अध्यात्म म्हणजे धार्मिक श्रद्धा आणि परंपरा नव्हेत. आपल्या भावना योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता विकसित करणे आणि रोजच्या जीवनातील ताण स्वत:चा स्वत: कमी करता येणे, असा अर्थ इथे अभिप्रेत आहे.
चांगले जीवन जगण्यासाठी मधुमेह किंवा इतर कोणताच आजार अडसर ठरत नसतो. अडसर वाटतच असल्यास तो दूर करणेही केवळ तुमच्याच हातात आहे!          
डॉ. आरती शहाडे
मधुमेहविषयक तज्ज्ञ
शब्दांकन- संपदा सोवनी 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा