शब्दांकन- संपदा सोवनी
‘मुलांचा डबा भरला, नवऱ्यासाठी नाष्टा बनवला, सासूबाईंचा चहाही नेऊन दिला! घरातली सग्गळी कामे झाली!..(आणि स्वत:च्या चहानाष्टय़ाचे काय?)..
करू नंतर !  आधी घरची मंडळी महत्वाची!’ घरच्या सगळ्यांचे मनापासून आणि आनंदाने करणाऱ्या गृहिणी आणि ‘वर्किंग वुमन’सुद्धा स्वत:च्या आधी नेहमी घरच्यांचा विचार करतात. अगदी स्वत:च्या आरोग्याकडेही त्या दुर्लक्षच करताना दिसतात. आजार अंगावर काढून तो अगदी असह्य़ झाल्यावरच डॉक्टरांकडे जाण्याची ही वृत्ती आता बदलायला हवी.    
स्त्रियांचा सर्वसाधारण दृष्टीकोन ‘प्रथम कुटुंबाचे आरोग्य आणि अगदीच जीवावर बेतल्यानंतर स्वत:चे आरोग्य’ असा दिसतो. गृहिणींबरोबरच काम करणाऱ्या स्त्रिया देखील आपल्या आरोग्याची सतत होळसांडच करत असल्याचे लक्षात येते. मुलांची शाळा, कॉलेजच्या वेळा, नवऱ्याच्या ऑफिसच्या वेळा सांभाळणे घरातल्या मंडळींना चांगले खाऊ घालणे, हे काम स्त्रिया आनंदाने करत असतात. पण या सगळ्या धबडग्यात स्वत:चे आरोग्य मात्र त्या पुरत्या विसरतात.
अनियमित पाळी हा स्त्रियांकडून हमखास दुर्लक्षित होणारा त्रास. अनियमित पाळीची कारणे अनेक असू शकतात. चाळिशीनंतर गर्भाशयाला गाठी येण्याचा (फायब्रॉईडस्) आजार महिलांमध्ये दिसतो. लवकर पाळी येणे, पाळीच्या वेळेस पोट खूप दुखणे, अधिक रक्तस्त्राव होणे अशी या आजाराची लक्षणे असू शकतात. अशा वेळी वेळच्या वेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. अनेक जणींना डॉक्टरांकडून तपासून घेण्यास प्रचंड संकोच वाटतो. लक्षणे स्पष्टपणे कशी सांगायची, असाही संकोच वाटतो. पुढचा त्रास टाळण्यासाठी हा संकोच मनातून काढून टाकायला हवा. अनेकींना श्वेतप्रदराचा (व्हाईट डिसचार्ज) त्रास असतो. पण त्रास खूप वाढल्याशिवाय डॉक्टरांकडे जाण्याची प्रवृत्ती दिसत नाही. हल्ली अनेक स्त्रियांना ‘पीसीओडी’ची (पालिसिस्टिक ओव्हरियन डिसिज) समस्या असते. शरीरातील स्त्रीबिज ग्रंथींमध्ये (ओव्हरीज) स्त्रीबिजे (फॉलिकल्स) साठवलेली असतात. ताण-तणाव, वजन वाढणे अशा काही गोष्टींचा परिणाम म्हणून या ग्रंथींमधील काही स्त्रीबिजे अर्धवट मोठी होतात. यालाच पीसीओडी म्हणतात. यामुळेही पाळी अनियमित होते. गर्भधारणेतही यामुळे अडचणी येऊ शकतात. ‘ओव्हरियन सिस्ट’ या आजारात ओव्हरीवर पाण्याच्या फुग्यासारखा दिसणारा सिस्ट येतो. अनियमित पाळीबरोबरच पोटात जडपणा वाटणे, पोटात गाठ लागणे अशी लक्षणे दिसत असली तरी वेळ न घालवता लगेच डॉक्टरांकडून तपासून खात्री करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी तो गंभीर आजारच असेल असे मुळीच नाही. पण योग्य वेळी आजाराचे निदान झाले तर तो वेळेत आटोक्यात नक्की आणता येतो.
रजोनिवृत्तीच्या काळात गर्भाशयाची पिशवी थोडी सैल झालेली असते. या वेळी काही जणींना ही पिशवी खाली सरकण्याचा त्रास होतो. याला बोली भाषेत ‘अंग बाहेर येणे’ असे म्हणतात. हा त्रास असणाऱ्या बहुसंख्य स्त्रिया आजार अगदी असह्य़ झाल्याशिवाय डॉक्टरांकडे जातच नाहीत. यात संकोचाचा भाग सर्वाधिक असतो. हा संकोच रुग्णाला खूप त्रासदायक ठरतो. रजोनिवृत्तीतच हॉर्मोन्सची पातळीही बदलत असते. या वेळी महिलांना एकाकीपणा वाटणे, चिडचिड होणे, नैराश्य आल्यासारखे वाटणे, अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळीही योग्य वेळी समुपदेशन मिळाल्यास प्रश्न लवकर सुटतात.  
आपल्या मानेच्या पुढच्या बाजुला फुलपाखरासारख्या आकारची थायरॉईड ग्रंथी असते. ही ग्रंथी चयापचय क्रियेवर (मेटॅबोलिझम) नियंत्रण ठेवते. या ग्रंथीचे कार्य मंदावले तर महिलांना वजन वाढणे, पाळी पुढे जाणे असे त्रास सुरू होतात. त्यामुळे एकदम वजन वाढू लागले तर ‘डाएट’च्या मागे लागण्यापेक्षा आधी थायरॉईडची काही समस्या आहे का, हे तपासून घेणे आवश्यक आहे. थायरॉईडमुळे जशी पाळी पुढे जाते तशीच अ‍ॅनिमियामुळे पाळी लवकर येऊ शकते. गर्भाशयाला काही संसर्ग होणे, गर्भाशयाच्या पिशवीला सूज येणे यामुळे पाळी लवकर येणे, पाळीच्या वेळी अधिक रक्त जाणे असे त्रास होतात. त्यामुळे पाळी अनियमित असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्याचे नेमके कारण लवकर शोधले जाणे गरजेचे आहे.
गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील लस आता उपलब्ध झाली आहे. हा कर्करोग ‘एचपीव्ही’ विषाणूच्या संसर्गातून होतो. हा संसर्ग शारीरिक संबंधांच्या वेळी होऊ शकतो. ही प्रतिबंधक लस मुलींना प्रथम शारीरिक संबंध येण्याआधीच दिल्याने हा कर्करोग टाळता येतो. अशा लसींविषयी देशात अजुन फारशी जनजागृती झालेली नाही. स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाणही आपल्याकडे मोठे आहे. योग्य प्रकारे स्वस्तन तपासणी करण्यास शिकणे आणि समस्या वाटल्यास लगेच डॉक्टरांना दाखवणे आजार बरा होण्याच्या प्रक्रियेत खूप महत्वाचे ठरते.
हल्ली बऱ्याच जणींना कामानिमित्त उशीरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावे लागते. काहीजणी अगदी रात्रपाळीच्या नोकऱ्याही करतात. अशा वेळीही खाणेपिणे, झोप हे सगळेच वेळापत्रक कोलमडते. त्यामुळेही वजन वाढणे, बद्धकोष्ठ, अ‍ॅसिडिटी, अ‍ॅनिमिया अशा तक्रारी उद्भवतात. कामाचा ताण कितीही असला तरी ‘वेळच्या वेळी सकस जेवण आणि पुरेसा व्यायाम’ हा मंत्र पाळायलाच हवा. कामाच्या वेळांनुसार जेवण आणि व्यायामाचे वेळापत्रक आपले आपणच आखायला हवे.
किशोर वयातील मुली जेव्हा हळूहळू पौगंडावस्थेत प्रवेश करत असताता तेव्हा त्यांच्यात शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही होत असतात. या मानसिक आंदोलनांमुळे या मुली अनेकदा चिडचिडय़ा होतात, कुणाचेही न ऐकता आपल्याला हवे तेच करण्याची बंडखोर वृत्तीही या वयात उफाळून येते. चेहऱ्यावर मुरूम यायला लागल्यामुळेही मुली अस्वस्थ होत असतात. ‘हल्ली  मुलगी माझे ऐकत नाही..घराबाहेर फार वेळ राहते..घरात असली की सारखा टीव्ही पाहात राहते..’अशा तक्रारी या वयातील मुलींच्या आया हमखास करताना दिसतात. पण मुलीत होणारे बदल सगळ्याच आयांच्या लक्षात येतात असे नाही. मुलींच्या शरीरातील हॉर्मोन्समध्ये होणारे बदल त्यांच्या चिडचिडीला कारणीभूत ठरत आहेत, हे आईने समजून घ्यायला हवे. मुलींना न रागावता त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधण्याची कलाच आईला या काळात शिकून घ्यावी लागते. पुढे त्रासदायक ठरू शकणाऱ्या अ‍ॅनिमियाची (रक्तक्षय) सुरूवातही वाढीच्या वयातच होत असते. बाहेरचे चमचमीत खाणे, वेळच्या वेळी जेवण न करणे या गोष्टी या वयात वाढलेल्या असतात. असंख्य शिकवण्या, दहावी- बारावीच्या परीक्षांचा ताण यामुळे अनेक विद्यार्थी खूप खातात. अर्थातच हे खाणे चविष्ट असले तरी सकस नसते. त्यामुळे योग्य पोषण न मिळता नुसतेच वजन वाढू लागते. अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी रोजचे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण वेळच्या वेळी जेवले तरी फायदा होतो.
जसे आपल्या कुटुंबियांचे आरोग्य महत्वाचे आहे तितकेच आपले स्वत:चे आरोग्यही महत्वाचे आहे हे स्त्रियांनी ध्यानात ठेवायला हवे. डॉक्टरांकडे जाण्यास, शंकांचे निरसन करून घेण्यास संकोच तर मुळीच नको! समस्यांचे वेळीच निदान होणे ही बरेचसे आजार बरे होण्यासाठीची गुरूकिल्ली असते, हे विसरता कामा नये.
अशी घ्या काळजी-
* वेळच्या वेळी चौरस आहार.
*  मधल्या वेळी राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, खजूर तोंडात टाकणे चांगले.
* गुळात लोहाचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे आहारात अल्प प्रमाणात गूळ हवा.
* स्त्रियांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे. त्यामुळे विशेषत: बांतपणानंतर डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे कॅल्शियमचा डोस पूर्ण करावा.  
*  दूध, ताक, दुधाचे पदार्थ यातूनही कॅल्शियम मिळते.  
* ऋतुनुसार मिळणारी फळे एक दिवसाआड तरी आहारात हवीत.
* रोज व्यायाम गरजेचा. लहान व तरूण वयात एरोबिक्स, सायकलिंग, टेकडी चढणे असे व्यायाम करावेत.
* मध्यम वयात चालण्याचा व्यायाम आणि प्राणायामाचा फायदा होतो.   
*  रजोनिवृत्तीच्या काळात ‘वेट बेअरिंग एक्सरसाईज’ शिकून घेऊन करावेत. हे व्यायाम हाडांना बळकटी देतात.