लहान मुले अशक्त असल्यास त्यांना दररोज सुक्यामेव्याचे मिश्रण खायला दिल्याने फायदा होतो. कोणकोणता सुकामेवा काय प्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण तयार करावे याची कृती प. य. वैद्य खडीवाले यांनी सांगितली
अनेक आई बाबा आपल्या लहानग्यांना घेऊन डॉक्टरांकडे जातात. ‘या मुलाला जरा जाड करा हो,’ अशी तक्रार करतात. अशा पालकांनी आपल्या मुलांना चॉकलेट, बिस्किटे, गोळ्या, मिठाई, फास्टफूड असे पदार्थ देण्यापेक्षा त्यांना दररोज सुकामेवा खायला दिल्याने फायदा होईल.
सुक्यामेव्याच्या एकत्र मिश्रणाने शरीराचे सम्यक पोषण होते. सुक्यामेव्याचे दहा ग्रॅम मिश्रण जरी खाल्ले तरी ‘इन्स्टंट एनर्जी’ मिळते. मेंदूला तरतरी मिळते. विशेषत: पोटऱ्यांवर या मिश्रणाच्या सेवनाचा चांगला परिणाम दिसतो. पोटऱ्या आणि पाय दुखणे थांबते. दिवसभराच्या धावपळीचा थकवा आणि कंटाळा जायलाही मदत होते. ५ ते ८ वर्षे या वयोगटातील कृश आणि अशक्त बालकांचे पोषण कमी असते. त्यामुळे ती लगेच दमतात. खाली दिलेल्या सुक्यामेव्याच्या मिश्रणाचा या बालकांना विशेष फायदा होऊ शकतो. हे मिश्रण घरच्या घरी तयार करून ते या मुलांना रोज थोडे- थोडे खायला देता येईल.
या मिश्रणात आवश्यक असणारे पदार्थ खालीलप्रमाणे- अक्रोडगर (५० ग्रॅम),
सुके अंजीर (५० ग्रॅम), काजू (१०० ग्रॅम), खारीक (१०० ग्रॅम), खोबरे (१०० ग्रॅम), जरदाळू (५० ग्रॅम), पिस्ता (५० ग्रॅम), बदाम (५० ग्रॅम), बेदाणा (५० ग्रॅम), मनुका (१०० ग्रॅम), शेंगदाणे भाजून (१०० ग्रॅम).
काजू गोमंतक, कोकण किंवा कारवारजवळील असावेत. खारीक किंचित मऊ, साखरी खारीक वापरावी. बदाम अमेरिकन तुलनेने स्वस्त मिळतात. ममरा बदाम खूपच महाग आहेत. काही ठिकाणी गंधकमिश्रित पाण्याचे संस्कार द्राक्षांवर करून मनुका व बेदाणे बनवले जातात. ते वापरू नयेत. दिलेल्या सर्व पदार्थाचे बारीक- बारीक तुकडे करावेत. ते एकत्र करून त्यांत अल्प प्रमाणात रावळगावच्या खडीसाखरेचे छोटे- छोटे खडे मिसळावेत. खडीसाखरेचे खडे साधारणपणे हरभराडाळीएवढे असावेत. त्यांच्या मिश्रणाने सुकामेवा खाताना कोरडे- कोरडे वाटत नाही. या पदार्थाचे अंदाजे ५० ग्रॅम मिश्रण बनवायला सुमारे ३० रुपयांचा खर्च येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा