पावसाळा म्हटले की निसरडे रस्ते, खड्डे, शेवाळ हे आलेच. पावसाळ्यात घसरून पडण्याचे प्रमाण यामुळे खूपच वाढले आहे. रस्त्याने चालताना नकळत पाय घसरतो आणि होत्याचे नव्हते होते. अगदी सायकल, मोटारसायकल, स्कूटर निसरडय़ा रस्त्यांमुळे घसरतात आणि अपघात होतात. खड्डेमय रस्त्यांमधून दुचाकी चालवताना पाठदुखीचे प्रमाणही वाढते. या घसरगुंडीमुळे शरीरावर परिणाम होतात आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास विकार बळावू शकतात.
सध्या रस्त्यावरून पाय घसरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पाय घसरल्यामुळे सांधा निखळू शकतो किंवा सांधेदुखीचे विविध विकार होऊ शकतात. या विकारांना तीन कारणे कारणीभूत आहेत.
१. रस्त्यांची दुर्दशा : आपल्याकडील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. निकृष्ट आणि खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळते. आपल्या शरीरातील कंबर आणि मान यांना मणक्यांद्वारे रबरबँडसारख्या लवचीक तंतूंनी जोडले जाते. पाय घसरून पडल्यास किंवा दुचाकीचा अपघात झाल्यास हे लवचीक तंतू दुखावले जातात. त्यांकडे लक्ष दिले नाही, तर आजार वाढू शकतो.
२. वाहनांची स्थिती : परदेशातील वाहने आणि आपल्याकडील वाहने यांमध्ये खूप फरक आहे. आपल्याकडील वाहने सुमार दर्जाची आहेत. धक्का शोषून घेण्याची क्षमता त्यांमध्ये नाही. त्यामुळे दुखापतीचे प्रमाण वाढते.
३. शारीरिक कष्टाची कमतरता : सध्याच्या तरुण पिढीकडे शारीरिक कष्टाची कमतरता आढळते. आपल्या शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे. हालचाल जर कमी झाल्यास शरीर दुबळे होते. सध्या तरुणांची हालचाल कमी होत असल्याने आणि शारीरिक व्यायामाचा अभाव असल्याने त्यांना पाठदुखीसारखे आजार होतात. जर एखादा छोटासा अपघात घडला तरी त्यांचे स्नायू, सांधे दुखावू शकतात.
परिणाम – लवचीक तंतू दोन हाडांना जोडण्याचे काम करतो. या तंतूंचा चिवटपणा कमी झाला तर दुखापत होऊ शकते. जोरदार हालचालींमुळे या तंतूंचा चिवटपणा कमी होऊ शकतो. अपघात झाल्यास किंवा पाय घसरून जोराने पडल्यास या तंतूंना दुखापत होते. त्यामुळे स्नायू दुखावतात किंवा मणक्यांना क्रॅक जाऊ शकतो. सध्या पाठदुखीमुळे तरुण त्रस्त असतात. मार्केटिंग, डिलिव्हरी बॉय, ऑफिस बॉय आदी कामे करणाऱ्या तरुणांना पाठदुखीचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. व्यायामाचा अभाव असल्याने हे त्रास दिसून येतात.
मेंदूकडून हाता-पायांसह शरीरातील सर्व भागांकडे मज्जारज्जूद्वारे संवेदना आणि शक्ती पुरविले जाते. मेंदूचे आदेश स्नायू पाळतात, त्याचे कारण मज्जारज्जू. मज्जारज्जूवर दाब पडल्यास दुखापत वाढते.
उपचार – पाठदुखी किंवा स्नायू दुखावल्याने त्यावर विविध उपचार करावे लागतात. सध्या अनेक वैद्यकीय केंद्रांवर इंडोस्कोपी (बिनटाक्याची) शस्त्रक्रिया केली जाते. त्याशिवाय शस्त्रक्रियाविना काही रुग्णांना विविध व्यायाम आणि औषधांद्वारे उपचार करता येतात. अनेक व्यायामतज्ज्ञांकडून (फिजिओथेरपिस्ट) विविध व्यायाम किंवा योगासने करवून घेतली जातत. फिजिओथेरपिस्टकडून विविध यंत्रांद्वारेही उपचार केले जातात. घरीही प्रथमोपचार करता येतील. दुखावलेल्या स्नायूवर शेकल्याने वेदनेची सूच कमी होऊ शकते.