जगात सर्वात उत्तम यंत्र कोणते असा प्रश्न केला तर उत्तरात एकवाक्यता येण्याची शक्यता कमीच! यंत्र सतत चालणारे, कमी इंधन वापरणारे, कमी देखभाल लागणारे आणि अतिशय कार्यक्षम असावे. खरे तर याचे उत्तर अगदी सोपे आहे! असे यंत्र तुमच्या- आमच्या प्रत्येकातच आहे. आपल्या शरीराइतके कार्यक्षम, इतके अथक व अचूक कार्य करणारे यंत्र कृत्रिमरित्या निर्माण करताच येणार नाही. मानवी यंत्र निर्मितीनंतर वाढत राहते, शिकत राहते, विचार करून कृती करू शकते, स्वसंरक्षण आणि नवीन निर्मितीही करू शकते. पण जेव्हा या यंत्राचा एखादा विशिष्ट भाग निकामी होतो किंवा काम करणे बंद करतो तेव्हा? इथे मानवी अवयव रोपणाच्या संकल्पनेचा जन्म होतो!
गणपतीच्या जन्माची पौराणिक कथा आठवते? भगवान शंकरांना एका लहान मुलाने अडवल्यामुळे त्यांनी संतापून त्या मुलाचा शिरच्छेद केला. नंतर तो मुलगा म्हणजे पार्वतीनेच निर्माण केलेला पुत्र आहे हे समजल्यावर शंकराने एका हत्तीच्या पिलाच्या शिराचे त्या मुलाच्या धडावर रोपण केले, आणि त्याला जीवंत केले. तोच गजाचे मुख असलेला ‘गजानन’ अर्थात गणपती! ही दंतकथा असली तरी त्यात अवयव रोपणाचा कल्पनाविलास दिसतो. अगदी ‘हत्तीचे तोंड माणसाला’ असे घडणे शक्य नसले तरी शल्यचिकित्साशास्त्राच्या विकासाबरोबर अवयव प्रत्यारोपणाची संकल्पना प्रत्यक्षात आली. इतकेच नव्हे तर या शस्त्रकिया यशस्वी होण्याच्या शक्यताही वाढल्या.  
मानवी अवयव रोपणाच्या शस्त्रक्रियांचा इतिहास मोठा रंजक आहे. ख्रिस्तपूर्व काळात आयुर्वेदाचार्य सुश्रुत यांनी कातडीचे रोपण करून कापलेल्या नाकाला आकार देण्याची शस्त्रक्रिया केली असल्याचे उल्लेख सापडतात. सुरूवातीच्या प्राण्यांवरील प्रयोगांनंतर मानवी शरीरात किडनी, हृदय, फुफ्फुस, यकृत, स्वादुपिंड, त्वचा,  डोळ्यांचा पारदर्शक पडदा (कॉर्निया) आणि इतरही अवयवांचे रोपण करण्यास सुरुवात झाली. प्राणी किंवा माणसांमधील असाध्य रोगांवर मात करण्याच्या दृष्टीने अवयव रोपणाची सुरूवात झाली. माणसांचे अवयव मिळण्यात अनंत अडचणी असल्याने सुरूवातीला इतर प्राण्यांचे अवयव वापरण्याचाही प्रयत्न झाला. मात्र तो यशस्वी झाला नाही. मग एखाद्या मृत किंवा मृत्यूच्या उंबरठय़ावर असलेल्या माणसाच्या काम करणाऱ्या अवयवाचे रोपण दुसऱ्या गंभीररित्या आजारी माणसात करून पाहिले गेले. काही काळासाठी या रोपण करण्यात आलेल्या अवयवांचा उपयोग होत असे. नंतर मात्र ते निकामी होऊ लागले. अशा घटनांमधून ज्याच्या शरीरात दुसऱ्याचे (परके) अवयव रोपण केले आहेत ते शरिराच्या प्रतिकारशक्तीमुळे नष्ट होतात हे हळुहळू तज्ज्ञांच्या लक्षात आले. मग असे अवयव टिकावेत म्हणून ज्याच्या शरीरात अवयवारोपण करायचे त्याची प्रतिकार शक्ती रेडिएशन किंवा प्रतिकार शक्तीला मारक औषधे वापरून कमी करायचा उपाय करण्यास सुरूवात झाली. हे प्रयोग यशस्वीही होऊ लागले.
आता रोपण केलेली किडनी किंवा यकृत पुढची ३०-४० वर्षे टिकवण्यात शास्त्रज्ञांना यश लाभले आहे. रुग्ण व अवयव दाता यांचे रक्तगट, पेशींची समानता अशा तपासण्या शक्य झाल्याने अवयव रोपणानंतर ते टिकण्याची शक्यता बरीच वाढली आहे. तसेच अवयव दानासाठी काढलेले अवयव जतन करण्याच्या आधुनिक पद्धतींमुळे तसेच शस्त्रक्रियेतील भूलतंत्रातल्या असामान्य सुधारणांमुळेही अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया अधिकाधिक यशस्वी होऊ लागल्या आहेत.
कॉर्निया, अस्थी, त्वचा असे अवयव अधिक काळ टिकवण्यासाठी बँकांची स्थापनाही झाली आहे. असे अवयव, विशेषत: रक्तवाहिन्या -४० ते -१८० अंश सेल्सियसला काही वर्षे टिकून राहू शकतात व जरूर पडेल तेव्हा त्यांचा वापर करता येतो.
पण ज्या रुग्णांना अवयवांची गरज आहे अशा रुग्णांची प्रतिक्षा यादीही खूप मोठी आहे. त्यामानाने अवयव दात्यांची यादी मात्र फारच तोकडी आहे. सर्वसाधारणपणे ज्या रुग्णाच्या मेंदूवर गंभीर आघात होऊन मेंदू मृत झाला आहे पण हृदयक्रिया सुरू आहे, श्वसन यंत्राद्वारे चालू आहे असे रुग्ण नातेवाईकांच्या परवानगीने अवयव दानास पात्र ठरतात. क्वचित प्रसंगी हृदयक्रिया बंद झाल्यावरही लवकर अवयव काढून योग्य तऱ्हेने टिकवले तर काही तासांत वापरता येतात. अलिकडे लोकांनी आपल्या प्रिय नातेवाईकांसाठी म्हणजेच आई-वडील, मुले, भावंडे यांच्यासाठी अवयवदान- विशेषत: किडनी दान करण्याच्या उदाहरणांत वाढ झालेली दिसते. प्रत्येक मनुष्याला दोन किडन्या असतात. एका किडनीचा एक तृतीयांश भाग सुद्धा आयुष्यभर काम देऊ शकतो.
 त्यामुळे दोनपैकी एक किडनी दान करणे शक्य असते. तसेच यकृताचा काही भागही स्वकियांना जीवनदान देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यकृताची ‘स्पेअर कपॅसिटी’ आणि झीज भरून निघण्याची क्षमता असामान्य असते. असे असूनही रुग्णांची प्रतिक्षा यादी मोठी आणि दात्यांची नगण्य हे आजचे वास्तव आहे.
मूळ पेशी (ऐम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स) आणि माणसांच्या क्लोनिंगचाही अभ्यास जोरशोर से सुरू आहे. न जाणो नजिकच्या भविष्यात यातून किंवा इतर काही मार्ग निघून अवयव रोपणासाठीच्या अवयवांसाठीची प्रतिक्षा यादी कमी होईल किंवा संपुष्टातही येईल. जनुकांच्या अभ्यासाने रोगास कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांमध्ये बदल , आरोग्यदायी जनुकांचे संवर्धन हादेखील एक पर्याय होऊ शकेल.
पौराणिक काळात कल्पनाविलासाने अवयव रोपणाची काल्पनिक सुरूवात झाली. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोक्यावरील केसांपासून थेट पायाच्या अंगठय़ापर्यंत बऱ्याच अवयवांचे रोपण यशस्वी झाले आहे. मेंदूचे रोपण मात्र आजमितीस तरी शक्य झालेले नाही. मूळ पेशींच्या अधिक संशोधनानंतर तेही अशक्य राहणार नाही अशीच चिन्हे आहेत! 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Limb implantation from head top hair to foot finger
Show comments