प्रेम.. मानवी मनातील एक उत्कट भावना! आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याला आपण अधिकारवाणीने काहीही सांगू शकतो. प्रेमातून निर्माण होणारा अधिकार खरे तर एकमेकांना जास्त जवळ आणतो. परंतु हीच अधिकाराची भावना एकमेकांवर स्वामित्व गाजवायला भाग पाडते तेव्हा ते नाते दुरावत जाते..
सुनीलच्या प्रेमात पडलेली शांभवी त्याचे गुणगान करताना थकत नसे. आज सुनील असे बोलला, आज सुनील असे वागला वगैरेचे कौतुक करताना तिच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलचे प्रेम ओसंडून वाहताना दिसे. सहज सांगायची की, सुनीलला ना, मी केस सोडलेले आवडत नाहीत, त्यामुळे मी ते बांधायला सुरुवात केलीय. सुनीलला ना, मी जीन्स घातलेली आवडत नाही त्यामुळे मी हल्ली पंजाबी ड्रेसच घालते. सुनीलला ना, मी भेटण्याच्या वेळेत जरा उशीर केलेला आवडत नाही.. वगैरे वगैरे. सुनीलच्या प्रेमात अखंड बुडालेल्या शांभवीला हे कळलेच नाही की ती स्वत:ला काय हवंय हे विसरून फक्त सुनीलला काय हवंय तशीच वागत चालली.. पुढे त्या दोघांचे लग्न झाले आणि लग्नानंतरचा सुनीलचा पझेसिव्हनेस अधिकच वाढला.
शांभवीचे मोकळे-ढाकळे वागणे त्याला खटकू लागले. तू हे नाही करायचेस, तू ते नाही करायचेस असल्या बंधनांमुळे शांभवी हैराण झाली. तिने सुनीलशी याबाबतीत बोलण्याचा प्रयत्न केला पण शांभवी सर्वस्वी माझी आहे या भावनेतून शांभवीकडे पाहणाऱ्या सुनीलला हे कळलंच नाही की, आपण तिचे स्वातंत्र्य हिरावून घेत चाललो आहोत. तिचे व्यक्तिमत्त्व खुलण्यापेक्षा ते खुंटत चाललेय आणि एकमेकांबद्दल वाटणारी ओढ कमी होऊन एकमेकांचा जाच वाढत चालला आहे. नात्यातले प्रेम, विश्वास जाऊन त्याची जागा भीती, संशय, जाच यांनी घेतली होती. नाते जाचक बनत चालले होते. तिच्या अस्मितेला ठेच लागत होती. स्वातंत्र्य हिरावले जात होते, अशा यातना भोगण्यापेक्षा सुनीलपासून वेगळे होण्याचे विचार शांभवीच्या मनात डोकावू लागले होते.
का होते असे? एकतर लग्नानंतर जोडीदार म्हणजे आपली हक्काची व्यक्ती. ही व्यक्ती स्वत:ची मालमत्ता असल्यासारखी भावना व त्यातून निर्माण झालेली अधिकारवाणी एकमेकांना जवळ आणण्यापेक्षा दूर करण्याला जास्त कारणीभूत ठरते. प्रेमातून निर्माण होणारा अधिकार खरे तर एकमेकांना जास्त जवळ आणतो, परंतु हीच अधिकाराची भावना एकमेकांवर स्वामित्व गाजवायला भाग पाडते तेव्हा ते नाते दुरावत जाते.
एकमेकांचा सहवास, त्यातून निर्माण होणारे प्रेम, एकमेकांसाठी जगण्याची भावना, एकमेकांवर ठेवलेला विश्वास यातूनच पती-पत्नीचे नाते हळूहळू फुलत जाते. दोघांचे एक जग असले तरी प्रत्येकाला एक स्वतंत्र जगही असू शकते. विश्वासाच्या आधारावर आपण जेव्हा एकमेकांना त्यांच्या स्वतंत्र जगात वावरू देतो तेव्हा एकमेकांचे व्यक्तिमत्त्व विकासालाही जागा मिळते आणि नात्यातील वीण अधिक घट्ट व्हायला मदत होते.
शांभवीला जे सोसावे लागले ते एखाद्या सुनीलच्याही वाटय़ाला येऊ शकते. त्यामुळे पती असो वा पत्नी कोणत्याही व्यक्तीच्या मनातील असुरक्षिततेमुळे किंवा अहंभावनेमुळे किंवा न्यूनगंडामुळे ती व्यक्ती कधी ओव्हर पझेसिव्ह किंवा दुसऱ्यावर स्वामित्व गाजवणारी होऊ शकते. आपल्या वागण्यात असा अतिरेक तर होत नाही ना हे प्रत्येकाने स्वत:चे परीक्षण करून लक्षात घेतले पाहिजे व वेळीच स्वत:ला सावरले पाहिजे, तरच नातेसंबंध दृढ होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा