बाबा- डॉक्टर, याला जरा सांगा. मैत्रीण म्हणजे? ती माझ्याहून तीन वर्षांनी लहान. आमचे विचार जुळतात. बायको गेल्यापासून तिची साथ अ सते.हे सर्व कामात बिझी असतात. पण आम्हाला लग्न करायचं नाही. मुलांना त्रास नको म्हणून या गोष्टी जास्त वाढवत नाही. आम्ही दोघे सुज्ञ आहोत, कधी एकत्र वेळ घालवायचा ठरवले तर काय बिघडले? आणि यांना त्रास नको म्हणून, हे नसताना बोलावले. माझ्या घरी मी माझ्या आवडीच्या व्यक्तीबरोबर एक दिवस घालवू शकत नाही का?
मुलगा : वय झाले, आता कशाला पाहिजे?
हा संवाद माझ्या एका समुपदेशक मित्रासमोर झाला. आपल्याकडे ज्येष्ठांना साहचर्य आणि लैंगिक गरजा असतात हे नाकारले जाते. जसे वय वाढत जाते, तसे पती-पत्नी यांच्यातील सामंजस्य आणि आत्मविश्वास वाढत असल्यामुळे लैंगिक संबंधात सुधारणा होत असते. त्यामुळे म्हातारपणी लैंगिकता नसते, असे समजणे चुकीचे आहे. ज्येष्ठांमधील लैंगिकता अगदी नसíगक आणि योग्य आहे हे आपण सर्वानी मान्य केले पाहिजे.
समाजाची प्रवृत्ती बदलली पाहिजे
आपल्या समाजात इतर कुटुंबीयांच्या सोयीसाठी वृद्ध पती-पत्नींना वेगळे राहावे लागते किंवा त्यांच्यासाठी खासगी अशी जागा, वेळ मिळत नाही. त्या दोघांमधील प्रेम-संवादाची खिल्ली उडवली जाते. अर्धवट वयाच्या मुलांवर जशी मित्र-मत्रिणी करण्यावर बंदी असते, तसेच ज्येष्ठांनाही मत्री पटकन करू दिली जात नाही. या पद्धती-प्रवृत्ती बदलल्या पाहिजेत. पूर्वी पत्नी गेल्यानंतर पुरुष वृद्धपणीही पुनर्विवाह करीत होते. आताच्या काळात स्त्री-पुरुष समानता झाल्यामुळे स्त्रीही जोडीदार शोधू शकते आणि स्त्री-पुरुष आपल्या वयातल्या, विचारातल्या व्यक्तीशी जोडी साधू शकतात.
कामवासना आणि तुमचे आरोग्य
एखाद्या व्यक्तीची कामवासना आयुष्यभर सारखी राहते. ती नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त झाली असेल तर त्याची तपासणी करावी लागते. काही स्त्रियांना मासिक पाळी थांबल्यानंतर त्रास होऊ लागतो, त्यामुळे त्यांना लैंगिक इच्छा कमी होते. उदासीनतेमुळेही असे घडू शकते. पुरुषांमध्ये मधुमेह, रक्तदाब यांमुळे लैंगिक समागम होऊ शकत नाही. वेगवेगळ्या औषधांनीही लैंगिक त्रास उद्भवू शकतात. कामवासनेचे प्रमाण आणि पद्धत हे व्यक्तीच्या आरोग्याचे प्रतीक असते.
लैंगिकतेमध्ये काय फरक पडतो?
ज्येष्ठपणी लैंगिकतेमध्ये फरक पडतो. वयानुसार शरीरात बदल झाल्याने जोडीदाराला आपल्याबद्दल आकर्षण वाटत नाही, असे वाटू शकते. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. पण लैंगिक आकर्षणाचा वयाशी काहीच संबंध नाही. रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी यांसारख्या त्रासांमुळे लैंगिक संपर्क करणे कठीण जाऊ शकते. खूप वर्षांपासून पती-पत्नीमध्ये वाद असेल तर त्यामुळे लैंगिक संबंधांमध्ये बाधा येऊ शकते.
अडचणीबद्दल का बोलले जात नाही?
आपल्याला कामवासना आहे किंवा त्याबद्दल काही अडचणी आहेत, हे सांगायला ज्येष्ठ नागरिक संकोचतात. त्यांना वाटते की हा विषय त्यांच्यासाठी अयोग्य आहे आणि याबद्दल तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही. जोडीदार गमावल्यावर कुठे तरी मन गुंतवून जगण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण काही लोकांना ते शक्य नसते. कारण एका व्यक्तीची जवळीकच त्यांना हवी असते. पण जोडीदार शोधायचा आहे किंवा मिळाला आहे असे सांगायला ते घाबरतात.
यावर उपाय काय?
सर्वप्रथम आपापल्या अडचणीबद्दल आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. एकमेकांच्या जवळ जाण्याच्या नवीन काही पद्धतींचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्रियांसाठी ‘एस्ट्रोजेन क्रीम’ दिले जाते, ज्याने त्रास कमी होतो. पुरुषांमध्ये वैद्यकीय सल्ला घेता येईल. आपल्या डॉक्टरांशी याबद्दल चर्चा केली पाहिजे. ज्येष्ठांनी आपले सर्व आरोग्य चांगले ठेवले तर लैंगिक अडचणी कमीत कमी अनुभवाव्या लागतील. नियमित व्यायाम, सकारात्मक वृत्ती आणि चांगला आहार घेतल्याने हे शक्य होते.
 जीवन परिपूर्ण होण्यासाठी समाधानकारक लैंगिकता जरुरीची असते. हे ज्येष्ठांसाठीही लागू आहे. लैंगिक समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. ज्येष्ठांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लैंगिक भावनांना नाकारू नये, किंवा डिवचू नये. असे काही प्रश्न असतील तर योग्य वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन घेऊन मार्ग काढावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा