स्त्रियांच्या आयुष्यात काही नेमके बदल होत असतात – मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे. या टप्प्यांवर काही स्त्रियांना विशिष्ट मानसिक आजार होतात. त्यांना ‘स्त्रियांमधील मानसिक आजार’ असे म्हटले जाते. या टप्प्यांवर स्त्रियांना लहान कालावधीत मोठे शारीरिक, मानसिक व सामाजिक बदल स्वीकारावे लागतात. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते. स्त्रियांचे स्त्रीत्त्व अधोरेखित करणारे दोन हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. गर्भधारणेच्या अवयवांचे आरोग्य आणि कार्य हे हार्मोन्स पार पाडतात. अर्थातच या हार्मोन्सचे कार्य केवळ या अवयवांपर्यंत राहात नाही. शरीरातील प्रत्येक बाब मेंदूशी निगडित असल्याने या हार्मोन्सचाही मेंदूवर परिणाम होतो. त्यांचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना हे आजार होतात, असे समजले जाते.
मासिक पाळीशी संबंधित आजार
पौंगडावस्थेत मुलींमध्ये उदासीनता, भित्रेपणा यासारखे आजार मुलांच्या तुलनेने जास्त दिसून येतात. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या थोडे आधी किंवा त्या दरम्यान लहरीपणा, कंटाळा, थकवा असे त्रास होतात. काही स्त्रियांना हे त्रास तीव्रतेने होतात. त्याशिवाय शरीर बोजड वाटणे, चीडचीडेपणा, उदास- निरुत्साहीपणा, झोपेचे त्रासही होतात. हा त्रास होताना स्त्रियांमध्ये टोकाचे बदल होतात. एका पुरुषाने त्याचा अनुभव सांगितला की, या काळात मी बायकोपासून लांब राहतो, त्या काळात ती मारायलाही कमी करणार नाही. इतर वेळेला मात्र ती एक आदर्श पत्नी आहे, पण ते पाच सहा दिवस काय होते ते कळतच नाही, अगदी तिलासुद्धा.
हा त्रास आजाराचे लक्षण आहे हे माहीत नसल्याने त्याचा त्रास वर्षांनुर्वष सहन केला जातो. या स्थितीला नियंत्रणात आणले नाही तर स्त्रीला नैराश्याचा आजार होतो आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होतो.
प्रसूतीनंतरचे विकार
गर्भारपणात स्त्री आनंदी, समाधानी असणे अपेक्षित असते. पण काही स्त्रियांना अस्वस्थपणा आणि असमाधान वाटते. कधी कधी सतत उदास, भीती वाटू शकते. हे सर्व त्रास प्रसूतीनंतर वाढतात किंवा नव्याने सुरुवात होते. ८५ टक्के स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन ते सात दिवस कमी प्रमाणात त्रास होतो. सारखे रडू येते, गोंधळल्यासारखे वाटते आणि आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटते. ही लक्षणे आपोआपच कमी होतात आणि दहा दिवसांनंतर महिला अगदी सामान्य होते. याला ब्लू असे म्हणतात आणि हा आजार नाही.
साधारण दहा टक्के स्त्रियांना मात्र उदासीनता, काळजी, भ्रम, रागीटपणा यासारखी लक्षणे सुरू होतात आणि बाळाचे संगोपन करणे अशक्य होत जाते. काही स्त्रियांना स्वत:चे बाळ अपंग, विकृत किंवा आजारी आहे असे वाटत राहते. काही त्रस्त स्त्रिया या आजारामुळे इतक्या भ्रमिष्ट होतात की स्वत:चे किंवा बाळाचे बरे-वाईट करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होते. ही सर्व गंभीर आजाराची लक्षणे आहेत. अगदी क्वचीतपणे आजार एक-दोन दिवसांत एकदम वाढून स्त्रीची अस्वस्थता वाढते.
या वेळेला मानसोपचार नको किंवा त्यातील औषधे तरी नको, असे बाळंतीणीला किंवा तिच्या घरच्यांना वाटते. पण हा गैरसमज आहे. या स्थितीत आईवर लवकर उपचार केले नाही तर आईचे व बाळाचे भावनिक नाते जुळत नाही. हे नातेच बाळाच्या मानसिक व भावनिक वाढीचा पाया असतो. आईने औषध घेतले तर स्तनपान करता येणार नाही म्हणून घरचे विरोध करत असतात. पण औषध घेऊनही स्तनपान करता येईल अशी औषधे आहेत. स्तनपानाच्या बाबतीत काही पथ्य पाळता येतात. शिवाय अगदी आणीबाणीच्या स्थितीत स्तनपान न देऊन वरचे दूध देता येईल. पण आई आजारी राहिली तर तिचा लळा आणि प्रेम बाहेरून देता येईल का? या स्थितीत ईसीटी म्हणजे मेंदूला करंट देण्याची उपचारपद्धतीही सुरक्षित असते.
मासिक पाळीनंतरचे आजार
मासिक पाळी थांबण्याच्या वेळी बहुतेक स्त्रिया झोपेच्या तक्रारी अनुभवतात. वारंवार झोप नीट न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अशक्तपणा, निरुत्साह, उदासीनता, थकवा जाणवतो. त्याला डॉमिनो इफेक्ट्स म्हणतात. अशा झोपेच्या तक्रारीमुळे आणि इतर मेंदूतील बदलामुळे स्त्रियांना उदासीनतेचे आजार उलटण्याची किंवा नव्याने होण्याची शक्यता असते. अलीकडच्या संशोधनात असे आढळलेले आहे की या वयात उदासीनता विस्मृतीचे लक्षण असू शकते. या सर्व कारणांमुळे या वयातील स्त्रीने झोपेच्या त्रासाची दखल घेऊन वेळेत उपचार केले पाहिजेत.
स्त्रियांच्या आरोग्यावर आणि स्थैर्यावर तिच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते. शारीरिक त्रासासाठी जसा उपचार- सल्ला गरजेचा असतो, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजीही महत्त्वाची असते. घरातील स्त्री आजारी असल्यावर तिची कामे कदाचित इतर कोणी करू शकेल, पण तिच्यासारखे प्रेम आणि आपुलकी इतर कुठून मिळवणे कठीण- म्हणून मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा