आपण स्वत:, आजूबाजूची परिस्थिती, भविष्यकाळ या सगळ्याबाबत नकारात्मक विचार करणे आणि सातत्याने तो करतच राहणे, या परिस्थितीत दीर्घकाळ वावरणे, त्यामुळे उदासवाणे वाटणे, झोपेचे तंत्र बिघडणे, टोकाचे विचार करणे, रडायला येणे, हळवेपणा ही सगळी नैराश्याची लक्षणे. त्याच्या तीव्रतेनुसार (उदा. सातत्याने येणारे, दीर्घकाळ टिकणारे नैराश्य) त्या व्यक्तीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा विचार करावा लागतो. मेंदूमध्ये भावनांचे नियंत्रण जसे होते तसेच काही रासायनिक द्रव्यांची निर्मिती देखील होत असते. या रसायनांच्या कमी-जास्त होण्यावर देखील नैराश्य भावना अवलंबून असते आणि हेच कारण असेल तर मानसोपचारतज्ज्ञांचाच सल्ला घ्यावा लागतो. अन्यथा समुपदेशकाची किंवा तज्ज्ञांची मदत पुरेशी होऊ शकते.
डॉ. रोहन जहागीरदार (मानसोपचारतज्ज्ञ)
स्वातीला आयुष्यात जे काही पाहिजे, ते परिश्रमान्ती तिने सगळं मिळवलं. आयुष्यात सुख-सुख म्हणजे काय असतं, याचा अनुभव ती आता घेऊ लागली. महाविद्यालयीन शिक्षणात अनेकदा या ना त्या कारणाने येणाऱ्या अपयशानंतर देखील तिने उच्चपदवीही प्राप्त करून घेतली आणि ती उच्चपदस्थ अधिकारी देखील झाली. मस्त दिवस चालले होते. सारी सुखं पायाशी लोळण घेत होती, तिच्या स्वप्नातला राजकुमारही तिच्या आयुष्यात आला होता. आता काय हवं होतं? पण झालं भलतंच, तिचा आजचा प्रियकर आणि उद्याचा नवरा, तिला धुडकावून निघून गेला. त्याच्या जाण्यामागची कारणं देखील तिला समजली नाहीत, हे दु:ख कमी होते म्हणून की काय तिच्या आई-वडिलांचं अपघाती निधन झालं. स्वातीवर दु:खाचं आभाळंच कोसळलं, तिला नैराश्याने पुरतं घेरलं..
जॅकी निराश झाला, की त्याला भूक पछाडायची. त्याला वारंवार येणारे नैराश्याचे झटके, त्यामुळे वाढणारी भूक, व्यायामाच्या बाबतीतील निराशा, शरीराचे बेढब होणे, त्यातून पुन्हा येणारे नैराश्य या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असून देखील त्याला या क्षेत्रापासून अनेक मैल लांब राहावे लागले होते..
जाहिरात संस्थेत कॉपीरायटर म्हणून काम करणारी रागिणी उत्तम कॉपीरायटिंग करत असूनही अनेकदा ती आपल्याच कामावर नाखूश असायची. कॉपी क्लायंटने फायनल केली, जाहिरात रीलिज झाली, तरी देखील त्या कॉपीमध्ये उगाचच चुका काढण्याची सवय तिला लागली होती आणि या सवयीतून ती स्वत:हूनच निराशेच्या गर्तेत जात होती..
स्वाती, जॅकी, रागिणी यांच्यासारखी नैराश्याने ग्रासलेली अनेकानेक मंडळी आपल्या अवतीभोवती असू शकतात. हे दुखणं तसं छुपं असल्यामुळे अवतीभोवतीच्या सगळ्यांनाच याबाबत कळू शकत नाही. कधी-कधी कुटुंबीय देखील यापासून अनभिज्ञ असू शकतात, पण काही जण मात्र अगदी फोनवरच्या संभाषणातून, एसएसएमसमधून देखील एखाद्याला आलेले नैराश्य ताडू शकतात.
नैराश्य, औदासीन्य, डिप्रेशन अशा विविध शब्दांमधून व्यक्त होणारी भावना एकच, मात्र व्यक्तिनुरूप त्याची तीव्रता बदलू शकते. अल्पकाळ, दीर्घकाळ किंवा वारंवार येणाऱ्या या भावनेतून बाहेर पडणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक आणि ‘हो’ असेच आहे. स्वत:चे प्रयत्न, स्वत:ची इच्छा, आजूबाजूच्या परिस्थितीत जाणून-बुजून केलेले बदल, निराशेवर मात करण्यासाठी केलेला मनाचा व्यायाम यातून या नैराश्याच्या भावनेतून बाहेर पडता येऊ शकते. प्रयत्नांबरोबरच ‘इच्छा’ हा शब्द अशासाठी वापरला की अनेकदा त्या निराशेच्या गर्तेतच राहण्याची आणि सहानभुती मिळविण्यासाठी म्हणून वातावरणात बदल न करण्याकडेच अनेकांचा कल असल्याचे दिसून येते. उत्तम चालले असून देखील नैराश्याच्या गर्तेत जाण्याची तसेच एखादा समारंभ यशस्वीपणे पार पडल्यानंतर देखील यशाचा आनंद उपभोगण्यापेक्षाही निराशाच अनुभवत राहण्याची सवय अनेकांना असते. अनेक कारणांनी अनुभवयाला येणारी निराशा. अपेक्षित यश न मिळण्यापासून अपयशी होण्यापर्यंत आणि भूतकाळातील दु:खद प्रसंगांच्या आठवणीने देखील अनेकदा नैराश्य येतं. प्रियजनांचे निधन, एखादा आजार, विभक्तपणा असे एक ना अनेक कमी-अधिक गंभीर प्रसंग एखाद्याच्या आयुष्यात मोठी खळबळ माजवू शकतात, कधी-कधी हे नैराश्य व्यसनाधीनतेच्या वाटेवर देखील घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे वेळीच उपाययोजना झाल्यास पुढे होणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या त्रासापासून मुक्ती मिळवता येऊ शकते. तात्पुरत्या स्वरूपाचं नैराश्य आपण अनुभवातून, छंदांच्या आधारातून दूर करू शकतो, पण दीर्घकाळ राहणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे अधिक इष्ट.