शर्करायुक्त पेयांमुळे जगभरात दरवर्षी एक लाख ऐशी हजार लोक मृत्युमुखी पडतात, असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह इतर काही वैज्ञानिकांनी केला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या न्यूऑरलिन्स येथे झालेल्या बैठकीत हा शोधनिबंध सादर करण्यात आला असून त्यात म्हटले आहे, की शर्करायुक्त सोडा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, फळांपासून बनवलेली पेये, यामुळे जगात दरवर्षी १,८०,००० जणांचा मृत्यू होतो. शर्करायुक्त पेयांमुळे वजन फार वाढते, त्यामुळे मधुमेह, हृदयविकार व कर्करोगाची शक्यता वाढते. २०१०च्या ग्लोबल बर्डन डिसीजेस अभ्यासात जमवलेल्या माहितीचे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. शर्करायुक्त पेयांमुळे १,३३००० मधुमेही, ४४००० हृदयरूग्ण व ६ हजार कर्करोगरुग्ण यांचा मृत्यू झाला आहे. साखरयुक्त पेये जास्त प्रमाणात सेवन केल्याने कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत २०१०मध्ये शर्करायुक्त पेयांमुळे २५००० जणांचा मृत्यू झाला आहे, असे बोस्टनमधील हार्वर्ड पब्लिक स्कूलच्या गीतांजली एम. सिंग यांनी इतर वैज्ञानिकांसह सादर केलेल्या या शोधनिबंधात म्हटले आहे. संशोधकांनी शर्करायुक्त शीतपेयांमुळे वय व लिंगानुसार मृत्यूचे प्रमाणही तपासले असून त्याचे लठ्ठपणा व मधुमेही रुग्णांवर होणारे परिणाम तपासले आहेत. लॅटिन अमेरिका व कॅरेबियन भागात शर्करायुक्त पेयांनी २०१०मध्ये ३८००० मधुमेहींचा मृत्यू झाला. पूर्व व मध्य युरेशियात शर्करायुक्त पेयांनी ११००० हृदयरुग्णांचा मृत्यू झाला. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या पहिल्या पंधरा देशांत असलेल्या मेक्सिकोत दरडोई शर्करायुक्त पेयांचा वापर सर्वात जास्त आहे. तेथे १० लाखांत ३१८ प्रौढांचा शर्करायुक्त पेयांमुळे मृत्यू झाला आहे. जपानमध्ये शर्करायुक्त पेये म्हणजे बिव्हरेजेसचे सेवन सर्वात कमी असून तेथे १० लाखांत १० जणांचा मृत्यू शर्करायुक्त पेयांमुळे झाला आहे. अमेरिकन बिव्हरेजेस असोसिएशनने या संशोधनावर असे म्हटले आहे, की या पेयांमुळे मधुमेह, हृदयरोग किंवा कर्करोग होतो असे दिसून आलेले नाही. ज्यांना अगोदरच असे आजार आहेत त्यांच्यात जर असे मृत्यू दिसून आले असतील तर बिव्हरेजेसचा दोष आहे असे म्हणता येणार नाही.
एनर्जी ड्रिंकमुळे वाढतो रक्तदाब
ऊर्जा पेये म्हणजे एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करण्याने रक्तदाब वाढतो तसेच हृदयाची लय बिघडते असा धोक्याचा इशारा संशोधनात देण्यात आला असून हे संशोधन करणाऱ्यात भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाचा मोठा वाटा आहे. अमेरिकी संशोधकांनी अगोदरच्या अभ्यासात वापरण्यात आलेल्या आकडेवारीचा उपयोग एनर्जी ड्रिंकचा हृदयाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामावर अभ्यास केला आहे. त्यात एक ते तीन कॅन इतकी एनर्जी ड्रिंक घेणाऱ्या ९३ जणांचा समावेश करण्यात आला होता. यात क्यूटी इंटरव्हल हे एनर्जी ड्रिंक सेवन करणाऱ्यांमध्ये १० मिलिसेकंदांनी अधिक होते. अपेक्षित क्यूटीपेक्षा जर कालावधी ३० मिलिसेकंदांनी वाढला तर ते धोक्याचे लक्षण मानले जाते, असे कॅलिफोर्नियातील युनिव्हर्सिटी ऑफ पॅसिफिक या संस्थेतील वैज्ञानिक सचिन ए. शाह यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे. क्यूटी वाढल्याने प्राणघातक अशी अ‍ॅरिदमियस ही स्थिती निर्माण होऊन हृदयाची स्थिती कमकुवत बनते. एनर्जी ड्रिंकमुळे क्यूटी वाढतो. एनर्जी ड्रिंकमुळे सिस्टॉलिक रक्तदाब हा १३२ रुग्णालयात ३.५ अंकांनी वाढलेला दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा