रक्तदात्याच्या शरीरातून काढलेले रक्त रुग्णाला देणे याला रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्सफ्यूजन) असे म्हणतात. रक्त देताना ते लाल रक्तपेशी, प्लेटलेटस्, प्लाझमा अशा वेगवेगळ्या रक्तघटकांसाठी दिले जाते. रुग्ण बरा होण्यासाठीच्या उपचारांमधील रक्त देणे महत्त्वाचा भाग असू शकतो. पण एचआयव्ही, हिपेटायटिस- बी, हिपेटायटिस- सी, मलेरिया, सिफिलिस (गुप्तरोग) हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याचे जे विविध मार्ग आहेत त्यातील रक्त हा एक प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे रक्त देण्यापूर्वी आवश्यक काळजी घेतली नसल्यास रक्ताबरोबर हे आजारही रुग्णाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रक्त देण्यापूर्वी दात्याचा आणि रुग्णाचा रक्तगट तपासला जातो, शरीराबाहेर रक्त साकळत असल्यामुळे त्यामध्ये ‘अँटि-कोअ‍ॅग्युलंट’ या प्रकारचा घटक मिसळला जातो. दात्याच्या आणि रुग्णाच्या रक्ताची जुळवणीही केली जाते. या जुळवणी प्रक्रियेत दात्याच्या आणि रुग्ण्याच्या रक्ताचा नमुना एकत्र करून दात्याच्या लाल रक्तपेशी रुग्णाच्या रक्तात सुरक्षित राहून आपले ठरलेले कार्य व्यवस्थित करू शकत आहेत का, याची तपासणी केली जाते. या सर्व गोष्टी केल्यानंतरही वर उल्लेख केलेले आजार दात्याच्या रक्तात नाहीत ना, हा प्रश्न उरतोच. याचे उत्तर ‘एलायझा’ या रक्त चाचणीद्वारे शोधले गेले. सध्या दात्याचे रक्त रुग्णाला देण्यापूर्वी या रोगांसाठी त्याची एलायझा चाचणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. ही चाचणी हळूहळू प्रगत होत गेली आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जनरेशन अशा रुपांत एलायझा चाचणीत सुधारणा घडत गेल्या. सध्या थर्ड आणि फोर्थ जनरेशन एलायझा चाचणीचा उपयोग केला जातो. परंतु ही चाचणीदेखील शंभर टक्के सुरक्षित म्हणावी अशी नाही हे आता लक्षात आले आहे. नियमित रक्त भरून घेणाऱ्या रुग्णांमध्ये एचआयव्ही, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी या रोगांचा संसर्ग झाल्याच्याही काही घटना देशपातळीवर उघडकीस आल्या आहेत. या घटना तुरळक असल्या तरी आपल्याला जे रक्त दिले जात आहे ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री मिळणे आवश्यक आहे हेच यातून समोर आले.
रक्तात रोगांचा संसर्ग आहे का, हे कसे शोधतात?
रोगाचा विषाणू जेव्हा आपल्या शरीरात शिरतो तेव्हा आपले शरीर त्याचा सामना करण्यासाठी प्रतिकारकांची निर्मिती करते. या प्रतिकारकांना ‘अँटिबॉडीज’ असे म्हणतात. पण प्रत्यक्ष संसर्ग झाल्यानंतर या अँटिबॉडीज शरीरात तयार व्हायला काही कालावधी लागतो. हा कालावधी त्या विषाणूचे वर्तन आणि शरीराची प्रतिकारशक्ती या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतो. या कालावधीला ‘विंडो पिरियड’ म्हणतात. हा विंडो पिरियड प्रत्येक रोगाचा वेगळा असतो, तो प्रत्येक रुग्णाच्या प्रतिकारशक्तीनुसार बदलतो. रक्ताच्या एलायझा चाचणीत शरीरात विशिष्ट रोगाविरूद्ध शरीरात तयार केल्या गेलेल्या अँटीबॉडीज शोधल्या जातात. त्यामुळे व्यक्ती जर वर उल्लेख केलेल्या रोगांच्या विंडो पिरियडमध्ये असेल तर शरीरात रोगाचा संसर्ग तर असतो, पण एलायझा चाचणीत तो दिसून येत नाही.
‘एलायझा’च्या मर्यादेवर उपाय- रक्ताची ‘नॅट’ चाचणी
एलायझा चाचणीच्या मर्यादांवर उपाय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर झालेल्या संशोधनांमधून ‘नॅट’ या आणखी आधुनिक चाचणीचा शोध लागला. ‘नॅट’ म्हणजे ‘न्यूक्लिक अ‍ॅसिड टेस्टिंग’. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर ही एक ‘रीअल टाईम पॉलिमरेझ चेन रिअ‍ॅकशन’ असते. विषाणू शरीरात गेल्यानंतर त्याच्याविरोधात शरीराने अँटिबॉडीज तयार करायची वाट न बघता विषाणू शोधून काढायला ही चाचणी सक्षम असते.
नॅट चाचणी कशी काम करते?
विषाणूत डीएनए असतो किंवा आरएनए असतो. डीएनए आणि आरएनए ही न्यूक्लिक अ‍ॅसिडस् आहेत. नॅट चाचणीत रक्ताच्या नमुन्यातून ‘प्लाझमा’ (रक्तरस) वेगळा काढला जातो. हा प्लाझमा नॅट चाचणी मशीनमध्ये ‘लोड’ केला जातो. प्रथम प्लाझमामधील नको असलेले घटक नष्ट करून त्यात वरून काही आवश्यक ‘रीएजंटस्’ मिसळले जातात. हे रीएजंटस् विषाणूच्या डीएनए किंवा आरएनएचे साचे तयार करतात आणि या साच्यांमुळे न्यूक्लिक अ‍ॅसिडस् वेगळी काढली जातात. त्यानंतरच्या प्रक्रियेत वेगळ्या काढलेल्या डीएनए किंवा आरएनएची संख्या वाढवली जाते, जेणे करून विषाणू शोधणे सोपे होते. एकदा केलेल्या प्रक्रियेत विषाणूचा डीएनए किंवा आरएनए मिळाला नाही, तर तो शोधण्याची प्रक्रिया पुन:पुन्हा केली जाते. जोपर्यंत रक्ताच्या नमुन्यात विषाणू नसल्याची खात्री पटत नाही तोपर्यंत चाचणीची प्रक्रिया सुमारे तीस- चाळीस वेळा परत- परत केली जाते. नंतरच दात्याचे रक्त पूर्णपणे विषाणूमुक्त असल्याचे निश्चित केले जाते.
‘नॅट’ची गरज का?
सध्याचा काळ रक्तघटकांच्या संक्रमणाचा आहे. रक्तदात्याने दिलेल्या रक्तापासून लाल रक्तपेशी, प्लाझमा आणि प्लेटलेटस् हे रक्तघटक वेगळे काढले जातात. यांतील प्रत्येक रक्तघटक वेगवेगळ्या परिस्थितींत वापरला जातो. नेहमीची आणि सर्वाधिक मागणी लाल रक्तपेशींना असते तर डेंग्यूसारख्या आजारात प्लेटलेटस्ना मागणी वाढते. पण याचाच अर्थ एका दात्याने दिलेले रक्त तीन वेगळ्या रुग्णांना जाण्याची शक्यता असते. म्हणजे दात्याच्या रक्ताच्या एलायझा चाचणीत रक्तातील विषाणू सापडला नसेल तर ते रक्त तीन वेगळ्या रुग्णांना जाऊन त्या तिघांनाही त्या विषाणूचा संसर्ग व्हायची शक्यता निर्माण होते. आपल्याकडे एलायझा चाचणी कायद्याने बंधनकारक असल्याने रक्तपेढीतील प्रत्येक रक्त पिशवीतील रक्ताची एलायझा चाचणी तर केली जातेच. त्या जोडीने केलेली नॅट चाचणी रक्तात कोणत्याही विषाणूचा संसर्ग नसल्याची पूर्ण खात्री देते. ‘दिल्ली स्टेट ब्लड ट्रान्सफ्यूजन काऊन्सिल’चे संचालक डॉ. भारत सिंग यांनी केलेल्या एका पाहणीच्या अहवालानुसार एलायझा टेस्टने ‘निगेटिव्ह’ ठरवलेल्या रक्ताच्या पाचशे नमुन्यांची नॅट चाचणी केल्यावर त्यातील एक नमुना ‘हिपेटायटिस बी’ने ‘पॉझिटिव्ह’ असलेला आढळतो. अशा इतरही काही पाहण्या उपलब्ध आहेत.       
देशात सुमारे आठ-दहा वर्षांपूर्वी नॅट चाचणीचा वापर सुरू झाला. पूर्वी ही चाचणी स्वयंचलित पद्धतीने होत नसे. आता मात्र नॅट चाचणीचे पूर्णत: स्वयंचलित मशीन उपलब्ध आहे. या स्वयंचलित मशीनची किंमत सुमारे दीड ते दोन कोटी रुपये आहे. चाचणीला लागणारे रीएजंटस्ही महाग आहेत. त्यामुळे प्रत्येक चाचणीमागे सुमारे एक हजार रुपयांचा खर्च येतो. अर्थात ज्या रक्तपेढय़ांमध्ये या चाचणीची सोय आहे तिथून रक्त पिशवी घेताना प्रत्येक पिशवीमागे काही सवलती देऊन ग्राहकावर फार भार पडू नये याची काळजी घेता येते. सध्या देशात रक्त संक्रमणापूर्वी नॅट चाचणी करून घेणे बंधनकारक नाही. पूर्णत: स्वयंचलित नॅट चाचणीची सोय राज्यात मुंबई, औरंगाबाद आणि पुण्यात उपलब्ध आहे.   
(लेखक हे पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक आहेत)
शब्दांकन- संपदा सोवनी