ज्या रुग्णांना नैराश्याचा विकार आहे. त्यांच्या मेंदूत पेसमेकर इलेक्ट्रोडस् बसवले असता त्यांच्यातील नैराश्याच्या सात पैकी सहा लक्षणात सुधारणा दिसून आली. जर्मनीतील बॉन विद्यापीठ रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागाचे न्यूरोसर्जन डॉ. व्होल्कर कोनेने यांनी हा प्रयोग करताना निराशाग्रस्त व्यक्तींच्या मेंदूतील पेसमेकरला इलेक्ट्रोड जोडले. त्यानंतर चेतापेशीना अत्यंत कमी तीव्रतेच्या विद्युत प्रवाहाने किंचित धक्का दिला. या प्रक्रियेस डीप ब्रेन स्टिम्युलेशन असे म्हणतात. कालांतराने या रुग्णांमधील नैराश्याच्या सातपैकी सहा लक्षणांत सुधारणा दिसून आली. बॉन विद्यापीठाच्या सायकिअ‍ॅट्री विभागाचे डॉ. थॉमस इ. शाल्पर यांच्या मते. या उपचार पद्धतीने मिळवलेले यश, मोठे आहे. ‘मेडियल फोअर ब्रेन बंडल’ हा मेंदूत अतिशय खोलवर असलेला चेतापेशींचा संच असतो. तो लिंबिक सिस्टीमपासून प्रिफंटर कॉर्टेक्स पर्यंत पसरलेला असतो. विद्युतप्रवाहाचा हलका धक्का दिल्याने या भागात परिणाम साधता येतो. हा परिणाम नेमका कसा साध्य होतो याचा उलगडा झाला नसला तरी त्यामुळे मेंदूच्या विविध केंद्रांमध्ये सुधारणा दिसून आल्या. मेंदूच्या ‘रिवॉर्ड सिस्टीम’मध्ये उत्साह वाढवणारे जे सर्किट असते त्यात बहुदा या विजेच्या सौम्य धक्क्य़ाने बदल होत असावेत. यापूर्वी मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीममधील ‘न्युक्लियस अ‍ॅक्युमबेन्स’ या भागाला इलेक्ट्रोड जोडण्यात आले होते. त्यातही नैराश्याच्या पन्नास टक्के रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आली होती. आताच्या प्रयोगात त्यापेक्षाही जास्त चांगले परिणाम दिसून आले आहेत. ८५ टक्के रुग्णांत त्यामुळे सुधारणा दिसून आली. परिणामही काही दिवस टिकला. हे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायॉलॉजिकल सायकिअ‍ॅट्री’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.