‘सुमितला उद्यापासून तायक्वोंदोला घालतोय आम्ही..’ सुमितची आई खूप उत्साहाने सांगत होती. ‘दुपारी तो शाळेतून येऊन जेवण झालों की मी त्याला चित्रकलेच्या क्लासला सोडते. मग संध्याकाळी ५ वाजता त्याला तायक्वोंदोच्या क्लासला घेऊन जाणार आहे. आताच्या मुलांना यायला हवे ना हे सगळे..’ सुमितचे वय काय असावे असा विचार करताय?..नुकतीच पाच वर्ष पूर्ण झाली त्याला. पण थांबा; खरा ‘प्लॅन’ तर सुमितच्या आईने सांगितलाच नव्हता! चित्रकलेचा क्लास आणि ग्राऊंड याच्यामध्ये पुन्हा घरी कशाला यायचे म्हणून त्याला मधल्या वेळासाठी तिथे जवळच एका संस्कार वर्गातही घालून टाकण्याचा तिचा विचार होता! सुमितला लावलेल्या ‘क्लासेस’ची संख्या जवळपास त्याच्या वयाइतकीच होती!
आपल्या मुलांचा ‘वेळ घालवण्यासाठी’ हात धुवून मागे लागलेल्या पालकांच्या मनोवृत्तीविषयी सांगताहेत बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल.
‘क्लासेस’ची लांबच लांब यादी!
‘मुलांना जास्तीत जास्त ‘एक्सपोजर’ द्यायला हवं. हे एक्सपोजर जितकं मिळेल तितका त्यांना फायदा होईल’..अनेक पालकांचा हा ठाम समज असतो. मूल मोठं झाल्यानंतर शाळा आणि अभ्यासाचा व्याप वाढेल, मग इतर काही करायला वेळच राहणार नाही. त्यामुळे लहान वयातचजितके क्लासेस लावू तितके चांगले, असाही काहींचा विचार असतो. ‘आपल्याला लहानपणी जे-जे करायला मिळाले नाही ते सगळे मुलाने केले पाहिजे, आजच्या जगात मुलांना सर्व गोष्टी यायला हव्यात, असेही अनेक जण सांगतात. मग त्या चिमुकल्याच्या शाळेबरोबर एखादा खेळाचा वर्ग सुरू होतो, जोडीला त्याने एखादी कलाही शिकायला हवी म्हणून गाण्याचा, नाचाचा किंवा कुठलं तरी वाद्य वाजवण्याचा क्लास सुरू होतो, आपल्या सोन्याला ‘सेल्फ डिफेन्स’ आला पाहिजे म्हणून त्याचाही क्लास सुरू होतो, जोडीला शाळेतल्या एखाद्या विषयाचा क्लास असतोच..ही यादी संपतच नाही. शाळा आणि हे तितके सगळे वर्ग यांच्या ओढय़ाखाली ते चिमुरडे बाळ दबून जाते, कंटाळून जातं.     
‘एक्सपोजर’ हवं पण किती?
मुलांना फक्त शाळा आणि अभ्यास याच्या पलीकडे वेगवेगळ्या गोष्टींची ओळख व्हायला हवी. पण हे ‘एक्सपोजर’ हळूहळू मिळायला हवं. बालवाडीतल्या मुलांना बालभवनसारख्या ठिकाणी जाऊन खेळणेही पुरते. त्याने कुठलातरी विशिष्ट खेळ इतक्या लहान वयापासूनच शिकावा, असा अट्टाहास नको. एखाद्या मुलाला चित्र काढायला, रंगांशी खेळायला आवडत असेल तर त्याला ते करू द्या. पण एका वेळी एकच गोष्ट बरी! इतकी छोटय़ा मुलांचा एखादी विशिष्ट गोष्ट करायचा उत्साह पंधरा दिवस किंवा जास्तीत जास्त एक महिन्याच्या वर सहसा टिकत नाही. अनेकदा पालक विविध क्लासेसची सहा महिने किंवा वर्षभराचीही फी भरून ठेवतात. पण मूल काही दिवसांनी क्लासला जायला कंटाळा करू लागते. अशा वेळी त्याला बळजबरीने क्लासला जाण्यास भाग पाडणे बरोबर नाही. बालवाडीतल्या मुलाचा उत्साह कितपत टिकू शकेल हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. या वयातली मुले धरसोड करणार हे गृहीतच धरायला हवे. मूल स्वत:हून आनंदाने एखाद्या क्लासला सातत्याने जात असेल तर क्लास सुरू ठेवण्यात हरकत नसावी.
मुलांमध्ये खूप ऊर्जा असते, पण..
मुलांना मोकळे ठेवले तर ती टीव्ही किंवा संगणकासारख्या ‘स्क्रीन’वाल्या गोष्टींमध्ये वेळ घालवतील आणि त्यावर बंधने घालणे अवघड होऊन बसेल, असेही पालकांना वाटते. याला उत्तर म्हणून लहानपणापासूनच मुलांना कशात तरी अडकवून ठेवावे, असा उद्देश त्यांना विविध क्लासेसना घालण्यामागे दिसतो.
‘लहान मुलांमध्ये खूप ऊर्जा असते, ती कुठेतरी खर्च होणे गरजेचे असल्यामुळे त्याने सतत काहीतरी करत राहिले पाहिजे’ हा पालकांचा गैरसमज आहे.
 मुले मैदानावर खेळायला जातात, तेव्हा ती रोजच्या जीवनात थोडी शांत होतात, त्यांना विचार करण्याची सवय लागते, चांगली भूक लागते, त्यांचा ‘मूड’ही चांगला राहतो हे सगळं खरे आहे. पण हे केवळ खेळताना घडलेल्या अंगमेहनतीमुळे नसते. घालवलेल्या वेळाचा ‘दर्जा’ म्हणजे ‘क्वालिटी ऑफ टाईम’ किती चांगली आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. दोन- तीन तास एखादे छानसे पुस्तक वाचल्यावर तुमचा मूड सुधारतो, छान भूक लागते, तसेच आहे हे.
मुलांना रिकामा वेळ द्यायचा की नाही?
लहान मूल रिकाम्या वेळात काय करणार, असा प्रश्न मोठय़ांना जरी पडत असला तरी आपला वेळ आपल्या पद्धतीने घालवण्याचे प्रत्येक मुलाचे वेगळे मार्ग असतात. पाळण्यात एकटेच असलेले बाळ आपला वेळ कसे घालवते ते आठवा. बाळ कधीतरी उगाचच काहीतरी निर्थक आवाज काढत राहते, तेव्हा ते खरे तर ‘व्होकल कॉर्डस्’शी खेळत असते. कधी ते हात- पाय हलवून पाहते, सूर्यकिरणांसारखी प्रत्यक्षात पकडता न येणारी गोष्ट हातात पकडण्याचा प्रयत्न करते. बाळ त्याचा वेळ अशा प्रकारे छान घालवत असताना, काहीही गरज नसताना आपल्यापैकी कुणीतरी बाळाला खेळवण्यासाठी पुढे होते! असे करताना आपण एक प्रकारे त्याची कल्पकता मारत असतो. लहान मुलांचंही असेच आहे. त्यांना ज्या गोष्टी करायला मनापासून आवडत असेल त्या त्यांना जरूर करू द्या. त्याच्यामागे भारंभार क्लासेसचे टुमणे मात्र नको.
शब्दांकन- संपदा सोवनी 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा