पावसाचे दिवस म्हणजे गॅलरीत होणारा पाण्याच्या थेंबांचा शिडकावा. मातीच्या कुंडय़ांमध्ये नवीन झाडे लावण्यासाठी अगदी योग्य दिवस! या दिवसांत आपण काही औषधी वनस्पती आपल्या घरी लावू शकतो. या वनस्पती फारशा उंच वाढणाऱ्या नाहीत. त्या वाढवण्यासाठी फारशी मेहनतही लागत नाही. पण डोके दुखणे, सर्दी, ताप, घसा धरणे, अपचन अशा छोटय़ा आजारांमध्ये प्रथमोपचार म्हणून त्यांचा उपयोग मोठा आहे.
अश्वगंधा
निद्रानाश, झोप न येणे, मुका मार लागणे, सूज येणे यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठीही अश्वगंधेचा उपयोग सांगितला जातो. अश्वगंधेच्या पानांची चटणी सुजलेल्या भागावर लावल्यास सूज उतरण्यास मदत होते. तसेच दिवसातून तीन वेळा, जेवण्यापूर्वी अश्वगंधेची दोन ताजी पाने चावून खाल्ल्यास भूक नेहमीपेक्षा कमी लागते आणि शरीरातील साचलेला मेद कमी होण्यास मदत होते. निद्रानाशावर उपाय म्हणूनही अश्वगंधेच्या वाळवलेल्या मुळ्यांचे चूर्ण घेण्याचा सल्ला दिला जातो.
वेखंड
खूप सर्दी झाल्यास वेखंडाचे ताज्या मुळाचा लेप कपाळावर लावल्यास लवकर आराम पडतो. याच प्रकारे वेखंडाची पाने वाटून घेऊन त्यांच्या चटणीचाही लेप कपाळावर लावता येतो. नैराश्य येण्यासारख्या मानसिक समस्यांवरही वेखंडाच्या मुळांचा रस मधाबरोबर घ्यायला सुचवले जाते. तर वजन कमी करण्यासाठी वेखंडाच्या मुळांची चटणी व गरम पाणी नियमित घेण्याचा फायदा होत असल्याचे सांगितले जाते. वेखंडाचा वास उग्र असतो. या वासामुळे बागेच्या आसपास साप फिरकत नाहीत.
अडुळसा
ऋतुबदलांमुळे होणाऱ्या कफ, दमा, खोकला आणि सर्दीसारख्या विकारांवर अडुळसा उपयोगी ठरतो. अडुळशाची ५-६ पिवळी पाने एक कप पाण्यात घालून ते पाणी अर्धा कप होईपर्यंत उकळून हा काढा घेतल्यास सर्दी-खोकला बरा होण्यास मदत होते. कफ सुटण्यासाठी अडुळशाच्या पानांचा रस किंवा वाळलेल्या पानांचे चूर्ण दिवसांतून तीन वेळा एक-एक चमचा घेण्यास सांगितले जाते. दम्याचा त्रास असलेल्यांसाठीही अडुळशाचा रस मधाबरोबर नियमितपणे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.
पिंपळी
एक कप दूध आणि एक कप पाण्यात दोन पिंपळ्या घालून हे मिश्रण अर्धा कप होईपर्यंत उकळले जाते. याला पिंपळीने सिद्ध केलेले दूध असे म्हणतात. जुनाट खोकला, दमा यांसारख्या विकारांवर हे दूध घेणे फायदेशीर ठरू शकते. अपचन किंवा भूक न लागण्याच्या विकारात पिंपळी, मिरी आणि सुंठीचे चिमूटभर चूर्ण घेणेही उपयुक्त ठरते.
शतावरी
शक्तिवर्धक म्हणून शतावरी कल्पाचे दुधाबरोबर सेवन अनेक जण करतात. शतावरी कल्पाप्रमाणेच शतावरीची मुळे वाळवून त्याचे चूर्ण करता येते. असे ५०० मिलिग्रॅम चूर्ण एक कप दुधातून घेतले तरी तोच फायदा मिळतो. याच प्रकारे शतावरीच्या ताज्या मुळांचा रस एक चमचा घेऊन तो देखील दुधाबरोबर घेता येतो.
गुळवेल
गुळवेलीलाच ‘गुडुची’ देखील म्हणतात. आम्लपित्त, घशाशी येणे, तिखट-मसालेदार पदार्थामुळे होणारा दाह या समस्यांमध्ये गुळवेलीचे कांड (काडी) ठेचून त्याचा रस काढून हा एक चमचा रस मधाबरोबरच सलग सात दिवस घेतल्यास बरे वाटते. तापाच्या विकारावर दोन कप पाण्यात गुळवेलीची एक काडी ठेचून घालून हे पाणी कपभर होईपर्यंत उकळवून केलेला काढा उपयुक्त ठरू शकतो.
ब्राह्मी
ब्राह्मी आणि माका केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या दोन्ही वनस्पतींचा प्रत्येकी १०० मि.ली. रस काढावा. हे दोन्ही रस एक लीटर खोबरेल तेलात उकळावेत. रस आटेपर्यंत उकळल्यानंतर ब्राह्मी आणि माक्याने सिद्ध तेल तयार होते. हे तेल डोक्याला लावल्यास केस गळायचे थांबते तसेच दगदगीने डोके दुखत असेल तर शांत वाटते.
जास्वंद
जास्वंद आणि कोरफड या दोन्ही वनस्पती केसांची वाढ चांगली होण्यासाठी चांगल्या आहेत. पाच पाकळ्यांच्या लाल जास्वदीची ८-१० फुले आणि कोरफडीचा २५ मि.ली. गर खोबरेल तेलात उकळून त्याचे केसांना लावण्यासाठी तेल तयार करता येते. या तेलामुळे केसांचा पोत सुधारतो.
मधुपर्णी (स्टिव्हिया)
या वनस्पतीची पाने चवीला गोड लागतात. त्यामुळे तिला मधुपर्णी म्हटले जाते. ज्यांना साखर जास्त खायची नसेल, त्यांनी चहा करताना त्यात साखरेऐवजी मधुपर्णीच्या वाळवलेल्या पानांचा चुरा घालून चालू शकेल. मधुमेह असलेल्यांनी या वनस्पतीच्या वापरापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे इष्ट.
आजीबाईंचा बटवा अडीनडीच्या वेळी उपयोगी पडतो खरा. पण तेच एकमेव औषध नव्हे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे आजीच्या बटव्यातल्या वनस्पतींचा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. त्यामुळे लहान आणि नेहमीच्या आजारांसाठी या वनस्पती जरूर वापराव्यात. गंभीर आजारांत मात्र त्यांचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
दीपक परांजपे,  वनस्पती लागवड सल्लागार
शब्दांकन- संपदा सोवनी        

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader