नव्या मार्गिकेवरील शाळांच्या बस, खासगी वाहनांचा तळ हटला; ‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्ताचा परिणाम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग असलेल्या पोखरण रस्त्यावर रुंदीकरणानंतर चार नव्या मार्गिका सुरू झाल्यानंतरही त्यातील अडथळे कायम होते. ‘लोकसत्ता ठाणे’ याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून नव्या मार्गिकेवरील शाळांच्या बस, खासगी वाहनांचा तळ हटविण्यात आला आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून या भागात वाहतूक सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. अखेर पोखरण रस्त्याने मोकळा श्वास घेतला, अशी प्रतिक्रिया येथील रहिवासी देत आहेत.

ठाण्यातील पोखरण रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळच्या काळात मोठय़ा प्रमाणामध्ये वाहनांची गर्दी असते. पूर्वी अरुंद असलेल्या पोखरण रस्त्याचे महापालिकेकडून रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा होती. मात्र वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी त्यात अधिकच भर पडत होती. परिसरातील शाळेच्या बसगाडय़ांनी नव्या रुंद रस्त्यावर अतिक्रमण सुरू केले होते, तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांच्या गाडय़ांनीही रस्ता अडवला होता. रुंदीकरणाच्या अपुऱ्या कामांमुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत होती. या समस्येस ‘लोकसत्ता ठाणे’च्या गुरुवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील अडथळे हटवण्यास सुरुवात केली, तर वाहतूक पोलिसांनीही परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांवरील कारवाईला सुरुवात केली.

बेशिस्त वाहनचालकांचा फटका

सकाळच्या वेळेत या भागात मोठय़ा प्रमाणात बेशिस्त वाहतूक होत असून त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. हे वाहनचालक चारही मार्गिकांवर वाहतूक करण्याचा प्रयत्न करत होते, तसेच येथील वळणावरील वाहतुकीचा फटकाही या वाहतुकीला बसत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी विनंती येथील रहिवाशांनी केली आहे.

पोखरण रस्त्यावरील शाळेच्या बसच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असून या बसवर शुक्रवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. सहा शाळेच्या गाडय़ांवर कारवाई करण्यात आली असून या भागात अधिकच्या वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

– संदीप पालवे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

 

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pokhran road cleared due to loksatta impact