मधुमेहात स्त्री गरोदर झाली तर काय प्रश्न येऊ शकतात?
मधुमेह आणि गरोदर स्त्री यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. गर्भावर परिणाम होऊ शकतो. बाळ आणि आई दोघांनाही थोडा बहुत धोका असतो. शिवाय ग्लुकोज कमी न होऊ देता काटेकोरपणे ती सांभाळायची ही तारेवरची कसरत असते. त्यामुळं गर्भार स्त्री वाढलेली शुगर घेऊन आली की डॉक्टरना धडकीच भरते.
बाळाला आणि आईला कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं?
इथं एक महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. मधुमेह असलेली स्त्री गरोदर होणं आणि गर्भारपणात पहिल्यांदाच मधुमेह झाल्याचं निदान होणं या दोन्हीत मुलभूत फरक आहे. पहिल्या गटात ज्यावेळी स्त्रीच्या उदरात बाळ तयार होतं त्या क्षणी देखील ती मधुमेही असते. म्हणजे बाळाला पहिल्या क्षणापासूनच आईच्या रक्तातल्या वाढलेल्या ग्लुकोजशी सामना करावा लागतो. साहजिकच बाळाची इंद्रियं तयार होताना आणि त्या इंद्रियांची वाढ होत असताना जर आईची ग्लुकोज नियंत्रणात नसेल तर बाळाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळं अशा स्त्रियांमध्ये बाळाला जन्मजात आजार असण्याची शक्यता बळावते. बहुदा मेंदूची जडण घडण वगरे मध्ये दोष होऊ शकतो. कित्येकदा आपण गर्भार झालोय हेच लक्षात यायला तिला वेळ लागतो तो पर्यंत तीची औषधं चालूच राहतात. या औषधांचा गर्भावर वाईट परिणाम होणारच नाही अशी ग्वाही देत येत नाही.
जेव्हा गरोदर झाल्यानंतर स्त्रीला प्रथम मधुमेह होतो तेव्हा परिस्थिती थोडी निराळी असते. कारण तोपर्यंत स्त्रीनं गरोदरपणाच्या दुसरया तिमाहीत प्रवेश केलेला असतो, बाळाची सर्व इंद्रियं या आधीच तयार झालेली असतात. त्यामुळं बाळाच्या जन्मजात आजारांची शक्यता खूपच कमी होते. अर्थात बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकत असल्यानं शेवटपर्यंत ग्लुकोज सांभाळावी लागतेच.
आईची ग्लुकोज नियंत्रणात आणायला काय करावं लागतं?
या काळात गर्भावर विपरीत परिणाम होईल अशी कुठलीही औषधं वापरता येत नाहीत. अगदी शंभर टक्के खात्रीलायक औषध म्हणजे इंश्युलीन. अर्थात काही डॉक्टर मेटफोर्मीन किंवा ग्लायक्लाझाईड सारख्या तोंडाने द्यायच्या औषधांनी बाळाला काहीही होत नाही असं सांगतात. त्यात बरयापकी तथ्यही आहे. पण अजून तरी अशा प्रकारची भलामण आमच्या संस्था करत नाहीत. म्हणून विषाची परीक्षा न पाहणं चांगलं. सर्वात सुरक्षित असं इंश्युलीन वापरलेलं बरं.
इथं हेदेखील नमूद करायला हवं की खाणं पिणं सुद्धा काटेकोरपणे सांभाळायला हवं. बाळाची वाढही नीट व्हायला हवी आणि आईची ग्लुकोजही नियंत्रित राहायला हवी अशा प्रकारचं आहाराचं नियोजन केलं जायला हवं. त्यासाठी प्रसंगी आहारतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
इतर काय काळजी घ्यावी?
प्रथम निदानापासून सुरुवात करावी. गर्भारपणातल्या मधुमेहाचे निदानाचे निकष वेगळे आहेत, इतर लोकांमध्ये असलेल्या निकषांपेक्षा गर्भार स्त्रियांचं निदान कमी पातळीवर होतं हे लक्षात ठेवावं. बरयाच मधुमेही स्त्रियांना रक्तदाब असतो, त्यांचं कोलेस्टेरॉल वाढलेलं असू शकतं. त्या गरोदर झाल्या म्हणजे त्यांनी त्वरित आपली मधुमेहाची औषधं बदलून इंश्युलीन सुरू करण्यासोबत रक्तदाबाची औषधंसुद्धा बदलली पाहिजेत. कोलेस्टेरॉलची औषधं तर पूर्णपणे बंद केली जावी. इतर कुठलीही अगदी आयुर्वेदिक किंवा होमियोपथिक औषधं घेत असतील तरी ती डॉक्टरांच्या नजरेस आणून द्यावीत. त्यानंतर डॉक्टर सांगतील त्या सूचना काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. यात बाळावर, त्याच्या वाढीवर बारीक लक्ष ठेवावं लागतं. त्यासाठी वेळच्या वेळी सोनोग्राफी करणं, आपली ग्लुकोज चोवीस तास नियंत्रणात आहे हे पाहणं, आवश्यक ठरतं. घरी ग्लुकोज तपासायची सोय असणं उत्तम. कारण कधी कधी दिवसातून सात सात आठ आठ वेळा ग्लुकोज तपासावी लागते.
शेवटी एका गोष्टीची जाणीव ठेवावी की जस जसे दिवस वाढत जातात तस तसा इंश्युलीनचा डोस वाढत जातो. म्हणून नियमितपणे ग्लुकोज तपासणं आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणं तितकंच महत्वाचं आहे.
बाळंत झाल्यावर आईला किंवा जन्मलेल्या बाळाला भविष्यात मधुमेह व्हायची शक्यता कितपत असते?
ज्या स्त्रियांना आधी पासून मधुमेह आहे त्यांचा मधुमेह कायम राहतो. ज्यांना गर्भारपणात प्रथमच मधुमेह झालाय त्यांची ग्लुकोज बाळाच्या जन्मासोबत नॉर्मलला येते. परंतु त्यांना भविष्यात मधुमेह मधुमेह होऊ शकतो. यासाठी त्यांनी दर सहा महिन्यांनी आपली ग्लुकोज तपासून घ्यावी. बाळांना पुढं मधुमेह होणार की नाही ते त्यांच्या पुढच्या वाटचालीवर अवलंबून असतं. आहार विहार नीट राखला तर कदाचित त्यांना मधुमेह होणारही नाही.
डॉ. सतीश नाईक – dr.satishnaik.mumbai@gmail.com