मधुमेहात स्त्री गरोदर झाली तर काय प्रश्न येऊ शकतात?
मधुमेह आणि गरोदर स्त्री यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. गर्भावर परिणाम होऊ शकतो. बाळ आणि आई दोघांनाही थोडा बहुत धोका असतो. शिवाय ग्लुकोज कमी न होऊ देता काटेकोरपणे ती सांभाळायची ही तारेवरची कसरत असते. त्यामुळं गर्भार स्त्री वाढलेली शुगर घेऊन आली की डॉक्टरना धडकीच भरते.
बाळाला आणि आईला कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं?
इथं एक महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. मधुमेह असलेली स्त्री गरोदर होणं आणि गर्भारपणात पहिल्यांदाच मधुमेह झाल्याचं निदान होणं या दोन्हीत मुलभूत फरक आहे. पहिल्या गटात ज्यावेळी स्त्रीच्या उदरात बाळ तयार होतं त्या क्षणी देखील ती मधुमेही असते. म्हणजे बाळाला पहिल्या क्षणापासूनच आईच्या रक्तातल्या वाढलेल्या ग्लुकोजशी सामना करावा लागतो. साहजिकच बाळाची इंद्रियं तयार होताना आणि त्या इंद्रियांची वाढ होत असताना जर आईची ग्लुकोज नियंत्रणात नसेल तर बाळाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळं अशा स्त्रियांमध्ये बाळाला जन्मजात आजार असण्याची शक्यता बळावते. बहुदा मेंदूची जडण घडण वगरे मध्ये दोष होऊ शकतो. कित्येकदा आपण गर्भार झालोय हेच लक्षात यायला तिला वेळ लागतो तो पर्यंत तीची औषधं चालूच राहतात. या औषधांचा गर्भावर वाईट परिणाम होणारच नाही अशी ग्वाही देत येत नाही.
जेव्हा गरोदर झाल्यानंतर स्त्रीला प्रथम मधुमेह होतो तेव्हा परिस्थिती थोडी निराळी असते. कारण तोपर्यंत स्त्रीनं गरोदरपणाच्या दुसरया तिमाहीत प्रवेश केलेला असतो, बाळाची सर्व इंद्रियं या आधीच तयार झालेली असतात. त्यामुळं बाळाच्या जन्मजात आजारांची शक्यता खूपच कमी होते. अर्थात बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकत असल्यानं शेवटपर्यंत ग्लुकोज सांभाळावी लागतेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा