स्वदेशी बनावटीची रोटाव्हायरस प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून तिची किंमत एका डोससाठी ५० रुपये इतकी कमी आहे. रोटाव्हायरसमुळे डायरिया होतो व त्यात भारतामध्ये दरवर्षी पाच वर्षांखालील वयोगटात असलेली एक लाख मुले दगावतात. रोटाव्हायरस लस हा गेल्या २८ वर्षांतील परिश्रमांचा परिपाक असून लहानपणीच ही लस दिली तर तिचा ५६ टक्के परिणाम होतो असे तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष सादर करणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितले.जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव एम.के.भान यांनी १९८५ मध्ये रोटाव्हायरस वेगळा काढण्यात यश मिळवले होते त्या वेळी भान हे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत संशोधन करीत होते. भान यांनी सांगितले, की रोटाव्हॅक लशीने रोटाव्हायरस डायरियाचे प्रमाण कमी होते.भारत बायोटेक ही कंपनी ही लस विकसित करण्यात मदत करीत होती. त्या कंपनीचे अध्यक्ष कृष्णा एम एला यांनी सांगितले, की ही लस १ डॉलर म्हणजे ५४ रुपये ७० पैसे या दराने उपलब्ध होत आहे. बाजारात इतर कंपन्यांची ही लस ८०० ते ९०० रुपयांना आहे.

मधुमेहावर उपयोगी संप्रेरके
हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मधुमेहाच्या उपचारात उपयोग होईल अशी नवी संप्रेरके शोधून काढली आहेत. ही संप्रेरके मेदपेशीत असतात. त्यांचा उपयोग रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करण्यासाठी होतो. या संबंधित प्रथिनाला निष्प्रभ केले तर यकृतात होणाऱ्या ग्लुकोजच्या निर्मितीवर बरेच नियंत्रण प्राप्त करता येते. टाइप २ मधुमेहात व चयापचयाशी संबंधित रोगांवरही या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो. टाइपर प्रकारच्या मधुमेहामध्ये यकृतात अनियंत्रित प्रमाणात ग्लुकोजची निर्मिती होत असते. वरील संशोधनातील वैज्ञानिक गोखन एस. होस्तमी स्लिगील यांनी सांगितले की, आम्ही एपी २ हे संप्रेरक शोधून काढले आहे. जे मेदपेशीतून बाहेर पडते तेच ग्लुकोजची निर्मिती नियंत्रित करीत असते. यातही यकृत आणि अ‍ॅडीपोज ऊती यांच्यात एक प्रकारचा संवाद असतो. त्यामुळेच शरीराला पोषणमूल्ये मिळत नसतील, तुम्ही बराच काळ उपाशी असाल तर ग्लुकोज जास्त सोडले जाते. लठ्ठपणात मेदपेशींचे नियंत्रण सुटते व एपी २ या संप्रेरकाचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे ग्लुकोजची चयापचय क्रिया बिघडत जाते. जर या संप्रेरकाचे प्रमाण कमी केले तर ग्लुकोजची पातळी योग्य प्रमाणात राहते. थोडक्यात संबंधित प्रथिनाचे कार्यान्वित होणेच बंद केले तर टाइप-२ मधुमेहावर चांगल्या पद्धतीने उपचार करता येतील, असे मत डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स अँड कॉम्प्लेक्स डिसीजेसचे प्रा. होमिंग काव यांनी व्यक्त केले आहे. ‘सेल मेटॅबोलिझम’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

‘मनस्थितीचे चढउतार नोंदणारे नवे अ‍ॅप’
वैज्ञानिकांनी अलीकडेच स्मार्ट फोनचे असे ‘अ‍ॅप’ तयार केले आहे, ज्यात तुमचे बदलणारे मूड्स टिपले जातील. ‘इमोशन सेन्स अ‍ॅप’ हे त्याचे नाव असून ते केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधक चमूने तयार केले आहे. मानसशास्त्रीय उपचारासाठी या अ‍ॅपचा उपयोग होऊ शकतो. यात तुमच्या फोनमधील सेन्सर (संवेदक) तुम्ही कुठे आहात, तुम्ही किती कृतिशील आहात, तुम्ही कुणाशी बोलता आहात ही सगळी माहिती यात नोंदवली जाते. मग ही माहिती फोनमध्ये असलेल्या भावभावनांविषयीच्या संदर्भ माहितीशी ताडून पाहिली जाते. लोकांचे मूड्स कसे बदलतात, याची संदर्भ माहिती सर्वेक्षणातून गोळा करताना सुख, दु:ख, संतप्त अशा अनेक भावभावनांचा विचार केला. त्यामुळे आम्ही तयार केलेले सॉफ्टवेअर विशेष असे आहे. असे केंब्रिज विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जॅसन रँटफ्रो यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीची भावस्थिती चांगली व वाईट केव्हा असते याचा उलगडा या अ‍ॅपच्या वापरातून होतो. केंब्रिज विद्यापीठाच्या संगणक प्रयोगशाळेचे संशोधन सहायक डॉ. नील लथिया यांच्या मते, आता स्मार्ट फोनचा उपयोग आरोग्यपूरक साधन म्हणून होत आहे. त्यातील विविध प्रकारचे सेन्सर्स (संवेदक) तुम्हाला तुमच्याविषयीची माहिती संकलित करून देत असतात. तिचा वापर वैद्यकीय निदानासाठी करता येतो.

प्रयोगशाळेत बनवल्या मानवी मेंदू पेशी
कंपवात (पार्किन्सन), फेफरे व स्मृतिभ्रंश या विकारातील उपचारात सुधारणा घडवणारे संशोधन वैज्ञानिकांनी केले आहे. मानवी मेंदूच्या प्रयोगशाळेत वाढवलेल्या पेशींची वाढ उंदरांमध्ये प्रत्यारोपित केल्यानंतर त्यांची निकोप वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सॅनफ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामुळे मेरुरज्जूत जखमा झालेल्या रुग्णांनाही फायदा होऊ शकेल. एका प्रकारच्या पेशीपासून मेंदूच्या विकासासाठी लागणाऱ्या पेशी तयार करण्यात यश येईल, असा विश्वास या शोधनिबंधाचे सहलेखक अरनॉल्ड क्रेगस्टेन यांनी व्यक्त केली आहे. मेडियल गँग्लिऑनिक एमिनन्स नावाच्या मेंदूतील पेशी संशोधकांनी तयार केल्या असून त्या उंदरांमध्ये प्रत्यारोपित केल्या. मेडियल गँग्लिऑनिक एमिनन्स पेशी या चेतामंडलांच्या नियंत्रणासाठी उपयोगी आहेत. काही मेंदू रोगात मेंदूतील चेता मंडले (नव्‍‌र्ह सर्किट्स) अतिक्रियाशील होत असतात. विशेष म्हणजे प्रयोगशाळेत बनवलेल्या मानवी मेंदूपेशी उंदरांमध्ये सहज स्वीकारल्या गेल्या व नंतर त्यापासून मेंदूच्या विकासात कारणीभूत ठरणाऱ्या विविध पेशींची निर्मिती झाली. मानवी चेता संस्थेत ज्या भागातील चेता मंडले अतिसक्रिय आहेत, तिथे या पेशी टोचल्या तर त्यांचे नियंत्रण योग्य प्रकारे होऊ शकेल, असे एक संशोधक कॉरी निकोलस यांचे मत आहे.

आरोग्य पानासाठी माहितीपर लेख पाठविण्याचा पत्ता- निवासी संपादक, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट क्र.१२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे ४११००५ अथवा sampada.sovani@expressindia.com