गेली साठ वर्षे गूढ मानल्या गेलेल्या व्हेल या मानवी रक्तगटाचे गूढ उलगडले आहे. या रक्तगटास कारणीभूत असलेले जनुक सापडले असून यामुळे जगात हजारो लोकांसाठी सुरक्षित रक्त मिळण्यास मदत होणार आहे. एका विशिष्ट जनुकातील काही घटक नष्ट होण्याच्या कारणास्तव काही व्यक्तींमध्ये हा रक्तगट असत नाही. साधारण पाच हजार व्यक्तींमध्ये एकाचा रक्तगट हा व्हेल निगेटिव्ह असतो. साधारण रक्त या रुग्णांना दिल्यास व्हेलविरोधी प्रतिपिंडामुळे मूत्रपिंड निकामी होणे व प्रसंगेी मृत्यू येणे असे धोके संभवतात. व्हेल रक्तगटामागचा जनुक शोधून काढल्याने आता ज्यांच्यात हा रक्तगट नाही अशांची अधिक विश्वासार्ह डीएनए चाचणी करता येणे शक्य होणार आहे. जनुकीय आधारावर एकूण ३४ गट रक्तगट असल्याचे शतकभरातील संशोधनात दिसून आले आहे. व्हेल रक्तगटाचा शोध ६० वर्षांपूर्वी लागला तेव्हापासून त्यामागचा जनुक ओळखण्यात यश आले नव्हते. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज व द वेल्कम ट्रस्ट सँगर इन्स्टिटय़ूटचे प्रा. विलेम ऑहँड यांनी सांगितले की, जनुकीय शास्त्रातील या शोधामुळे रुग्णांना लाभ होणार आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट व्हेल हा नाही अशा ६५ व्यक्ती निवडण्यात आल्या. त्यानंतरच्या प्रयोगांमध्ये असे दिसून आले की, व्हेल निगेटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांमध्ये एसएमआयएम१ या जनुकाचे काम योग्यप्रकारे होत नव्हते. हे जनुक गुणसूत्र क्रमांक १ वर आढळते व ते साधारण मानवी प्रथिनापेक्षा पाच पटींनी लहान असते. हिमोग्लोबिनच्या पातळीशी संबंधित असे ७५ जनुकीय भाग आतापर्यंत ज्ञात आहेत. आता व्हेल निगेटिव्हशी संबंधित असलेला जनुकही याच भागातील आहे असे ग्रॉनिनगेन विद्यापीठाचे डॉ. पिम व्हॅडर हार्स्ट यांनी सांगितले.